टॉप बातम्या

अनधिकृत कापूस बियाण्यांवर कारवाई; १.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या अनधिकृत कापूस बियाण्यांची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कृषी विभाग आणि वणी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तब्बल १ लाख १५ हजार ७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पळसोनी (ता. वणी) येथे ६ मे रोजी रात्री करण्यात आली.

या प्रकरणी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्या फिर्यादीवरून आरोपी अरुण शंकर भट (वय ४५, रा. पळसोनी ता. वणी) यांच्याविरुद्ध बियाणे अधिनियम १९६६ व १९६८ तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आपल्या राहत्या घरी भारत सरकारने प्रतिबंधित केलेले अनधिकृत हायब्रीड कापूस बियाणे साठवून त्यांची विक्री करत असल्याचे निदर्शनास आले. कारवाईदरम्यान विविध कंपन्यांच्या नावाने विक्रीस ठेवलेली एकूण ८१ पाकिटे जप्त करण्यात आली. यात R-659 RR 5G, PUSHA 5G, माऊली-5, SILVER 5G, KAVERI SEEDS 5G, GALAXY HYPER, JUMBO 5G PREMIUM, SURAKSHA तसेच DHOOM-2 आणि HARYALI 702 यांसारख्या बियाण्यांचा समावेश आहे.

जप्त करण्यात आलेल्या बियाण्यांपैकी काही नमुने बीज परीक्षण प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून ते लाखेने सीलबंद करण्यात आले आहेत. संबंधित बियाण्यांची एकूण किंमत १,१५,०७० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार अविनाश चिकराम, पोलीस स्टेशन वणी करीत आहेत.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();