टॉप बातम्या

हायमस्ट लाईट कामात दिरंगाई; १४ एप्रिलपूर्वी काम न झाल्यास नगर पंचायतसमोर अर्धनग्न आंदोलन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव :मारेगाव शहरातील अतिसंवेदनशील व प्रमुख ठिकाण असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक परिसरात हायमस्ट लाईट बसविण्याच्या कामात होत असलेल्या दिरंगाईबाबत संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करून तातडीने हायमस्ट लाईट बसविण्यात यावे, अशी मागणी करत १४ एप्रिलपूर्वी ही मागणी पूर्ण न झाल्यास नगर पंचायत कार्यालयासमोर अर्धनग्न घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

याबाबतचे निवेदन प्रभारी मुख्याधिकारी सचिन गाडे यांना देण्यात आले आहे. या निवेदनाची प्रत खासदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार संजयभाऊ देरकर, जिल्हाधिकारी यवतमाळ, उपविभागीय अधिकारी वणी, तहसीलदार मारेगाव, पोलीस निरीक्षक मारेगाव तसेच नगरसेवक हेमंत नरांजे यांना पाठविण्यात आली आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, शेतकरी आत्महत्याग्रस्त व मागास क्षेत्र असलेल्या मारेगाव ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतर होऊनही शहरवासीयांना अपेक्षित मूलभूत सुविधा मिळत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. नगर पंचायतच्या कामकाजातील दिरंगाई व वेळकाढूपणामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

मारेगाव नगर पंचायतमार्फत सुमारे ५ कोटी रुपयांच्या निधीतून शहरात ५०० पेक्षा अधिक स्ट्रीट लाईट व संवेदनशील ठिकाणी हायमस्ट लाईट बसविण्याची योजना जाहीर करण्यात आली होती. शहर प्रकाशमय करण्याचे आश्वासन देत या योजनेचा मोठा गाजावाजा करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी काम अर्धवट राहिल्याने ही योजना रखडल्याचे चित्र दिसत आहे.

मारेगाव शहराचे हृदयस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक परिसरात अद्याप हायमस्ट लाईट बसविण्यात आलेली नाही. साधा हायमस्टचा पोलही उभारण्यात आलेला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई करून तातडीने हायमस्ट लाईट बसविण्याची मागणी करण्यात आली आहे.
१४ एप्रिलपूर्वी या ठिकाणी हायमस्ट लाईट बसविण्यात न आल्यास नगर पंचायत कार्यालय मारेगावसमोर अर्धनग्न घंटानाद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विलास रायपुरे, आकाश खामनकर व गजानन चंदनखेडे (रा. मारेगाव) यांनी दिला आहे.

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();