सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : रंगपंचमी म्हटलं की रंगांची उधळण आणि आनंदाचे वातावरण असे चित्र सर्वत्र पाहायला मिळते. मात्र मारेगाव तालुक्यातील देवाळा येथे यंदा होळीचा सण एका वेगळ्या आणि सामाजिक संदेश देणाऱ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या पुढाकारातून गावात रंगमुक्त होळी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
होळीच्या पावन पर्वावर मंडळाच्या वतीने ध्यान-पाठ, सामुदायिक प्रार्थना तसेच गावातील प्रमुख मार्गावरून प्रदक्षिणा काढण्यात आली. यावेळी रंगांचा वापर टाळून शांतता, स्वच्छता आणि पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचा संदेश गावकऱ्यांना देण्यात आला.
विशेष म्हणजे हा उपक्रम देवाळा गावात पहिल्यांदाच राबविण्यात आला असून गावकऱ्यांनी त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सण साजरा करताना अतिरेकी रंगांचा वापर टाळावा, पाणी वाचवावे आणि सणामागील अध्यात्मिक व सामाजिक मूल्य जपावे, असा संदेश यावेळी देण्यात आला.
या उपक्रमामुळे गावात एक वेगळी सकारात्मक भावना निर्माण झाली असून भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असे मंडळाच्या उपासकांनी सांगितले.
या सामाजिक उपक्रमात सुक्रीराम सोनटक्के, भाऊरावजी चहाणकर, मधुकर गाडगे, रमेश मत्ते, तुळशीराम बुरडकर, गजानन बुरडकर, विजय अवताडे, बबन बावणे, सचिन बोकडे, शंकर बोढे, नामदेव बोढे, पंढरी गाणफाडे, सुनील सोमलकर, विठ्ठल सोनेकर, विजय बोढे, मनोहर निखाडे, बाबा बावणे, लखन सोनटक्के, गजानन बोढे, मेघशाम बुरडकर, प्रतीक अवताडे, युवराज रोगे, हिमांशू, तन्वी, रुपाली, देवश्री, आरुषी, युगा, हर्षाली, श्रावणी, मयंक,परी, यांच्यासह श्री गुरुदेव सेवा मंडळाचे अनेक उपासक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.
गावातील या अभिनव उपक्रमामुळे इतर गावांनीही अशा प्रकारे रंगमुक्त, पर्यावरणपूरक आणि समाजप्रबोधन करणारी होळी साजरी करावी, असा आदर्श देवाळा गावाने घालून दिला आहे.
