सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : तालुक्यातील ३१७ क्रमांकाच्या राज्यमार्गावर मार्डी–मच्छिंद्रा दरम्यान फिसकी जंगल परिसरात बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास कारचा अपघात झाला. या अपघातात एका बालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून इतर काही जण किरकोळ जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील एक कुटुंब बोरी (गदाजी) येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते. भेट आटोपून ते परत आपल्या गावी जात असताना मार्डी–मच्छिंद्रा मार्गावरील फिसकी जंगलात त्यांच्या कारचा समोरील टायर अचानक फुटला. त्यामुळे कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या पळसाच्या झाडाला जोरदार धडकली. या अपघातात कारमधील एका बालकाच्या पायाला मोठी दुखापत झाली तर इतर काही जण किरकोळ जखमी झाले. जखमींना तात्काळ उपचारासाठी वणी येथे नेण्यात आले असून पुढील उपचारासाठी त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
अपघातग्रस्तांना मिळाली तत्काळ मदत
दरम्यान, भाजप अनुसूचित जमाती मोर्चाचे नवनिर्वाचित पदाधिकारी मनोज केळकर व त्यांचे सहकारी महेश आत्राम हे मार्डी येथे भाजप तालुका सचिव अमोल कुमरे यांची भेट घेण्यासाठी आले होते. भेट आटोपून ते वणीकडे परत जात असताना त्यांना मार्गात हा अपघात झाल्याचे दिसून आले. त्यांनी तात्काळ अमोल कुमरे यांच्याशी संपर्क साधून मदतीची विनंती केली.
अमोल कुमरे यांनी क्षणाचाही विलंब न करता सुनील सोमलकर यांच्या मदतीने चारचाकी वाहन घटनास्थळी पाठवले. अपघातग्रस्तांना नाकारिकांनी वाहनात बसवून पुढील उपचारासाठी वणीच्या दिशेने रवाना करण्यात आले.
ठप्प वाहतूकही केली सुरळीत
दरम्यान, मार्डी बाजार करून गावाकडे परत येत असताना अमोल कुमरे यांना फिसकी जंगल परिसरात वाहतूक मोठ्या प्रमाणात खोळंबलेली दिसून आली. वनविभाग कर्मचारी व होमगार्डचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. मात्र वाहनांची मोठी रांग लागल्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत होता.
यावेळी अमोल कुमरे यांनी पुढाकार घेत वाहनधारकांना सूचना देत अवघ्या दहा मिनिटांत ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर या राज्यमार्गावरील वाहतूक पुन्हा पूर्ववत सुरू झाली.

