सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : तालुक्यातील पेसा अनुसूचित क्षेत्र असलेल्या नरसाळा येथे क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या १९३ व्या जयंतीनिमित्त गुरुवार, १२ मार्च रोजी मोठ्या उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरातील गोंडवानाचे वाघ म्हणून ओळखले जाणारे थोर आदिवासी क्रांतिकारक बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांच्या कार्याला यावेळी अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच संगीत मार्सकोले होते, तर प्रमुख अतिथी म्हणून आशिष भाऊ खुलसंगे, शशिकांत भाऊ उईके गोंडवाना सग्राम परिषद तालुका अध्यक्ष मारेगाव, सुनील भाऊ नैतान, चंदन मेश्राम, अनंता भाऊ कुडमेथे उपस्थित होते. यावेळी वक्त्यांनी बाबुराव शेडमाके यांच्या जाज्वल्य इतिहासावर प्रकाश टाकत ब्रिटिश राजवटीविरुद्ध त्यांनी दिलेला सशस्त्र लढा आणि आदिवासी समाजाला संघटित करून ‘जंगम दल’च्या माध्यमातून केलेला संघर्ष आजही प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
केवळ २५ व्या वर्षी १८५८ मध्ये देशासाठी बलिदान देणाऱ्या बाबुराव शेडमाके यांच्या त्यागाचे स्मरण या निमित्ताने करण्यात आले. या कार्यक्रमाला आदिवासी जनजागृती युवा संघटना, राणी दुर्गावती महिला संघटना तसेच परिसरातील नागरिक व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने करण्यात आला.