सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : मारेगाव नगर पंचायतीमध्ये मुख्याधिकारी, स्थापत्य अभियंता व विद्युत अभियंता ही महत्त्वाची पदे रिक्त असल्याने नगर पंचायतीचे प्रशासकीय व विकासकामकाज गंभीररीत्या बाधित झाले आहे. या पदांवर तातडीने नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी नगराध्यक्ष डॉ. मनिष मस्की यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
शासन आदेश क्रमांक एमसीओ-२०२५/प्र.क्र.४४०/नवि-१४, मुंबई, दि. २४ डिसेंबर २०२५ नुसार मारेगाव नगर पंचायतीचे मुख्याधिकारी (गट-अ) श्री. शशिकांत मारुती बाबर यांची नगर परिषद अकोट (जि. अकोला) येथे बदली करण्यात आली आहे. त्यानंतर मारेगाव नगर पंचायतीतील मुख्याधिकारी पद रिक्त असून कार्यालयीन कामकाज, नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण तसेच विकासकामे खोळंबली आहेत.
तसेच, मा. जिल्हा सहआयुक्त, नगरपालिका प्रशासन विभाग, यवतमाळ यांच्या आदेशानुसार श्री. अनुराग सांगोले (स्थापत्य अभियंता, न. प. पांढरकवडा) व श्री. प्रशांत बळी (विद्युत अभियंता, न. प. वणी) यांना मारेगाव नगर पंचायतीत अनुक्रमे स्थापत्य व विद्युत अभियंता पदाचा आठवड्यातून मंगळवार व बुधवार (आवश्यकतेनुसार) अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. मात्र, हे अधिकारी अद्याप नगर पंचायतीत प्रत्यक्ष रुजू न झाल्याने बांधकाम व विद्युत विभागाची कामे ठप्प आहेत.
या परिस्थितीत नगरातील विकासकामे, दैनंदिन प्रशासन व नागरिकांच्या मूलभूत समस्या प्रलंबित राहत असल्याचे नमूद करीत, मारेगाव नगर पंचायतीस कायमस्वरूपी किंवा प्रभारी मुख्याधिकारी तसेच स्थापत्य व विद्युत अभियंते यांची तातडीने नियुक्ती करावी, अशी ठोस मागणी नगराध्यक्ष डॉ. मनिष मस्की यांनी निवेदनात केली आहे.