सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : तालुक्यातील ऐतिहासिक राजूर भूमिगत कोळसा खाण पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अनेक वर्षांपासून बंद असलेल्या या खाणीबाबत दिनांक २९ सप्टेंबर रोजी नवा करार झाला.
ब्रिटिश काळात सुरू झालेली आणि नंतर इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात राष्ट्रीयीकरण झालेली ही खाण कोळशाच्या उच्च दर्जामुळे विशेष ओळखली जाते. येथे पूर्वी हजारो कामगार कार्यरत होते. मात्र तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींमुळे खाण बंद झाली होती.
आता पुन्हा एकदा वे.को.लि. (WCL) आणि त्रिवेणी राजूर कोल माईन्स प्रा. लि. यांच्यात करार होऊन या खाणीचे नवे पर्व सुरू होणार आहे.
वे.को.लि. मुख्यालयात झालेल्या या करार समारंभाला अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक जे.पी. द्विवेदी, संचालक (तांत्रिक) आनंदजी प्रसाद, तसेच त्रिवेणी राजूर कोल माईन्स प्रा. लि. चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आणि वे.को.लि. संचालक (प्रकल्प) कमलकांत शुक्ला उपस्थित होते.
लवकरच या खाणीतील कामकाज सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, त्यामुळे या परिसरातील रोजगाराच्या संधींना नवसंजीवनी मिळणार आहे.