टॉप बातम्या

आदिवासी आरक्षण बचावासाठी वणी शहरात भव्य मोर्चा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील हजारो आदिवासी बांधवांनी रविवार, दि. 29 सप्टेंबर रोजी वणी शहरात एकत्र येत आरक्षण बचावाचा भव्य आक्रोश मोर्चा काढला. आदिवासी हक्क व आरक्षण बचाव कृती समितीच्या आयोजनाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला.

आदिवासी समाजाला भारतीय संविधानात सामाजिक व ऐतिहासिक पार्श्वभूमीवर अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात आले आहे. मात्र अलीकडेच बंजारा, वंजारी, कैकाडी, हटकर, धनगर आदी समाजांना अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी होत असून, त्याविरोधात हा मोर्चा निघाला.

मोर्चाची सुरुवात वणीतील शासकीय मैदानातून झाली. समाजातील विचारवंतांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर मोर्चेकऱ्यांनी घोषणाबाजी करत वणी शहरातील प्रमुख मार्गाने उपविभागीय कार्यालयावर धडक देत महाराष्ट्र शासनाला लेखी निवेदन सादर केले.

निवेदनात कोणत्याही जातीला अनुसूचित जमातीचे आरक्षण देऊ नये, अशी ठाम मागणी करण्यात आली. अन्यथा सरकारने जर सत्तेच्या राजकारणासाठी आदिवासींच्या हक्कांवर गदा आणली तर समाज पेटून उठेल आणि तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा देण्यात आला.

या मोर्चात आदिवासी बांधवांसह युवक-युवती, डॉक्टर, वकील, पत्रकार व विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चाच्या यशस्वी आयोजनासाठी समितीचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();