सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
यवतमाळ : अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक श्री. कुमार चिंता यांनी जिल्हा पोलीस दलातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री मदत निधीत स्वेच्छेने योगदान देण्याचे भावनिक आवाहन केले.
या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांनी एकूण 27,11,111 रुपयांचे स्वेच्छेने योगदान मुख्यमंत्री मदत निधीस दिले. हा धनादेश औपचारिकपणे माननीय मुख्यमंत्री महोदयांना सुपूर्द करण्यात आला.
कृषीप्रधान असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील बहुतेक अधिकारी व कर्मचारी स्वतः शेतकरी कुटुंबातून आलेले असल्याने शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींची त्यांना जाणीव आहे. त्यामुळेच या कठीण काळात जिल्हा पोलीस दलाने पुढाकार घेतला आहे.
माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या योगदानाबद्दल यवतमाळ जिल्हा पोलीस दलाचे, सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व धन्यवाद मानले आहेत.