सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे
वणी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वणी नगरपालिकेत राजकीय वातावरण तापू लागले आहे. या वेळी अनेक प्रभाग महिला राखीव ठरल्यामुळे महिला उमेदवारांना राजकारणात संधी मिळणार आहे. परंतु या राखीव जागांवरही चुरशीची लढाई होण्याचे संकेत दिसू लागले आहेत. प्रत्येक पक्षातून प्रभावशाली महिलांची नावे पुढे येत असून नगरपालिकेचा रणसंग्राम रंगू लागला आहे.
महिला राखीव जागांमुळे स्थानिक राजकारणात नवा उत्साह निर्माण झाला आहे. अनेक वर्षे पती, कुटुंबीयांच्या माध्यमातून राजकारणाशी निगडीत असलेल्या महिलाही आता थेट मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. काही ठिकाणी तर नव्या उमेदवारांनी घराघरात जाऊन जनसंपर्क सुरू केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत महिला मतदारांचा प्रभाव निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राजकीय पक्षांनीही आपल्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधत प्रभावी महिलांना संधी देण्याची चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे वणी नगरपालिकेची निवडणूक केवळ पक्षीय नव्हे, तर प्रतिष्ठेची ठरणार आहे. महिला राखीव जागा असली तरी प्रत्येक प्रभागात जिंकण्यासाठी राजकीय डावपेच, आघाड्या आणि रणनीतीचा खेळ सुरू झाला असून, वणी नगरपालिकेचा रंगलेला राजकीय मेळा आता खरी रणधुमाळी निर्माण करणार आहे.