टॉप बातम्या

मारेगाव परिसरातील टेकडीवरील माळावर गायगोधनाचा पारंपरिक सोहळा उत्साहात


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : अनेक वर्षांची परंपरा जपणारा यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील टेकडीवरील माळावरील (मोठा देव मंदिर) येथील गायगोधनाचा सामूहिक सोहळा यंदा बलिप्रतिपदेच्या दिवशी, बुधवार दिनांक 22 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 1.30 या वेळेत हजारो नागरिकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. वणीवरून सुमारे 15 किलोमीटर आणि मारेगाववरून 9 किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणी चिंचाळा, वरुड, आकापूर, नेत, पाथरी, पारधी वस्ती, पिसगाव व पहापळ या गावांतील गुराखी व शेतकऱ्यांनी शेकडो सजविलेल्या गायी वाजतगाजत आणून पूजेसाठी उपस्थित केल्या.

मंदिराचे पुजारी श्री. अंकुश गेडाम यांनी मोठा देवाची पूजा-अर्चा, आरती केली, त्यानंतर सजविलेल्या गायींची मंदिराभोवती प्रदक्षिणा करण्यात आली. या प्रसंगी गुराखी बांधवांनी पारंपरिक वादन-गायन सादर करून गायगोधनाच्या गाणी व आरत्या सादर केल्या.

भारतीय कृषी अर्थव्यवस्थेत पशुधनाचे आणि त्यामधील गुराख्यांचे महत्त्व लक्षात घेऊन 2022 पासून प्राध्यापक सुरेंद्र गोविंद नावडे यांच्या संकल्पनेतून या सोहळ्यात गुराखी मंडळींचा सत्कार करण्याची परंपरा सुरू करण्यात आली. यावर्षी श्री. प्रज्योत भाऊराव खंडरे (चिंचाळा), श्री. शंकर गोविंदा नागोसे (वरुड), श्री. राम घोरपडे व श्री. वैभव ढवळे (नेत), श्री. नंदू पोतू कोरझरे (सालेभट्टी), श्री. संदीप मरसकोल्हे (गौराळा), श्री. आशिष वाढई (आकापूर) तसेच बालगुराखी व वादक चिरंजीव विशाल रामभाऊ चाहारे (चिंचाळा) यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ‘ग्रामगीता’ ग्रंथ देऊन गौरव करण्यात आला. महिला गुराखी आणि बालवादकांची उपस्थिती या सोहळ्याचे खास आकर्षण ठरली.

यवतमाळ जिल्ह्यात अनेक ठिकाणी गायगोधनाचे सामूहिक सोहळे साजरे केले जात असले तरी माडावरील हा सोहळा टेकडीसदृश परिसरात होत असल्याने दूरवरूनही तो पाहता येतो. त्यामुळे दरवर्षी भाविकांची उपस्थिती वाढताना दिसते. मोठा देव मंदिराची जीर्णावस्था लक्षात घेता भाविकांकडून शासनाने मंदिराचा जीर्णोद्धार करावा, तसेच भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून बोअरवेल खोदण्याची मागणीही करण्यात आली.

या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी प्राध्यापक सुरेंद्र गोविंद नावडे, शशिकांत तावाडे (उपसरपंच, चिंचाळा ग्रामपंचायत), देविदास भट (उपसरपंच, वरुड ग्रा.पं.), चंद्रकांत ढोबे (उपसरपंच, गौराळा ग्रा.पं.), संदीप कारेकर (सरपंच, आकापूर-नेत ग्रा.पं.) आणि दिवाकर रिंगोले यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमस्थळी मद्यपान करून येणे, मद्यपान करणे तसेच फटाके फोडणे यास सक्त मनाई होती. आमदार श्री. संजयजी देरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी (वणी), पोलीस निरीक्षक मारेगाव आणि वनविभाग मारेगाव यांच्या सहकार्याने ठेवलेल्या काटेकोर बंदोबस्तामुळे हा सोहळा अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्धतेने पार पडला.

बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या या पारंपरिक सोहळ्याला नवचैतन्य देण्यासाठी 2022 पासून प्राध्यापक सुरेंद्र गोविंद नावडे, शशिकांत तावाडे, देविदास भट, चंद्रकांत ढोबे, संदीप कारेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न करून या परंपरेला पुन्हा उर्जितावस्था प्राप्त करून दिली आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();