सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : शहरातील रंगनाथनगर परिसरातील स्वप्नील किशोर राऊत (वय २६) या युवकाची अनैतिक संबंधातून निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या खळबळजनक घटनेनंतर वणी पोलिसांनी अवघ्या काही तासांत गुन्ह्याचा छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ठेकेदाराकडून पैसे आणायचे असल्याचे सांगून स्वप्नील घराबाहेर पडला. रात्री उशिरापर्यंत तो परतला नाही आणि फोनही बंद लागल्याने नातेवाईकांनी शोध सुरू केला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गजानन नगरी परिसरात त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. गळा आणि डोक्यावर गंभीर वार करून त्याची हत्या करण्यात आली होती. या घटनेची माहिती मिळताच वणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
फिर्यादी चेतन किशोर राऊत (मृतकाचा मोठा भाऊ) यांच्या तक्रारीवरून वणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुदाम आसोरे व त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. अखेर पोलिसांनी या प्रकरणातील दोन आरोपींना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले आरोपी म्हणजे सुमेश रमेश टेकाम (वय २४) आणि सौरभ मारोती आत्रम (वय २७, दोघे रा. वडजापूर, ता. वणी). प्राथमिक चौकशीत हत्येच्या मागे अनैतिक संबंधातून निर्माण झालेला वैमनस्याचा वाद असल्याचे उघड झाले आहे. वणी पोलिसांनी अत्यंत कौशल्याने आणि तत्परतेने तपास पूर्ण करत गुन्ह्याचा खुलासा केला असून, या घटनेमुळे परिसरात संताप आणि धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.