सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : दिवाळी" प्रकाशाचा सण, आनंदाचा सण! पण यंदा जिल्ह्यातील सर्वसामान्यांसाठी तो ‘उजेडा’ नव्हे तर ‘उजाड’ ठरला आहे. राज्य सरकारकडून दरवर्षी दिवाळीपूर्वी दिला जाणारा ‘आनंदाचा शिधा किट’ यंदा उपलब्ध न झाल्याने अनेकांना ज्वारीच्या भाकरीवरच दिवाळी साजरी करावी लागली. गरीब आणि मध्यमवर्गीय जनतेत तीव्र नाराजीची लाट पसरली असून प्रशासनाच्या निष्काळजीपणावर लोकांनी संताप व्यक्त केला आहे.
यंदा यवतमाळ जिल्ह्यातील गोरगरिबांना गव्हाऐवजी ज्वारीवर भागवावे लागले आहे. राज्य शासनाने रास्त भाव दुकानांतून यंदा गव्हाचा पुरवठा न करता ज्वारीचे वाटप सुरू केल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. सणासुदीच्या काळात गहू न मिळाल्याने अनेकांना ज्वारीच्या भाकरीवर दिवाळी साजरी करावी लागत असून, “गव्हाचा गोडवा हरवलेल्या दिवाळी”ची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
पूर्वी सणासुदीच्या काळात शासनाकडून गहू, तांदूळ, डाळ, साखर, रवा, तेल अशा जीवनावश्यक वस्तूची किट पुरवल्या जात होत्या. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून आनंदाचा शिधा बंद झाला आहे. विशेष म्हणजे अंनतोदय कार्डधारकांना मिळणारी साखर देखील बंद झाल्याने नागरिकांचा रोष वाढला आहे. शासनाच्या या निर्णयावर टीकेची झोड उठली असून, “राजकारण्यांना गोरगरिबांच्या अडचणींचे काहीही देणेघेणे नाही” अशी प्रतिक्रिया लाभार्थ्यांकडून येत आहे.
अतिवृष्टी आणि आर्थिक संकटामुळे जनतेवर आधीच ओझं वाढलं असताना सणासुदीला तरी गहू व आवश्यक वस्तू पुरवाव्यात, अशी अपेक्षा होती. मात्र, गव्हाऐवजी ज्वारी दिल्याने शासनाच्या अन्नवाटप धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हमीभाव योजनेत खरेदी केलेल्या ज्वारीचा साठा वापरण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात असले, तरी नागरिकांच्या मते या धोरणामुळे दिवाळीचा आनंद आणि गोडवा दोन्ही हरवले आहेत.
________________________________________केंद्र व महाराष्ट्र सरकार यांचे निर्दयीपणामुळे शेतकरी, शेतमजूरांची दिवाळी अंधारात. शेतकऱ्यांना साधे स्वस्त धान्य दुकानात गहू ऐवजी ज्वारी वाटप. आनंदाचा शिधा तर हद्दपार झाला. सोयाबीनचा भाव इतिहासातील सर्वात कमी दर असून कापसाला भाव नाही हे शासनाचे फेलीवर आहे.-संजय रामचंद्र खाडेप्रदेश सचिव काँग्रेस कमिटी महाराष्ट्र राज्य________________________________________