टॉप बातम्या

दिव्यांग तरुणाच्या जिद्दीला ‘स्माईल’ची साथ, आत्मनिर्भर होण्यासाठी कॉम्प्युटर भेट

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : कमरेखाली अपंग असलेला, पण आत्मविश्वासाने भरलेला एक तरुण… शिक्षण आणि डिजिटल कौशल्यांच्या जोरावर स्वतःचं भविष्य घडवण्याचा निर्धार… आणि त्याच्या या प्रवासाला साथ देणारी “स्माईल फाउंडेशन” ही सेवाभावी संस्था! आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण या तीन तत्त्वांवर कार्य करणारी स्माईल फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी जपत वणीतील गुरुनगर येथील एका दिव्यांग युवकाला आत्मनिर्भरतेची दिशा दिली. संस्थेच्या उपक्रमांतर्गत या तरुणाला संगणक, टेबल आणि आवश्यक साहित्य देण्यात आले. ही मदत संस्थेचे सदस्य सुभाष आत्राम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

या तरुणाचे जीवन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुरू झाले. मोठा होताच त्याने घरी हातभार लावण्यास सुरुवात केली. मात्र कामावर असताना एक अपघात झाला आणि त्याला कमरेखाली अपंगत्व आले. मात्र त्याने हार मानली नाही. हा तरुण उत्कृष्ट चित्रकार आहे. त्यामुळे तो डिजिटल डिझायनिंग, ऑनलाइन कोर्सेस आणि विविध कौशल्ये आत्मसात करत आहे. संगणकाच्या मदतीने तो आता स्वयंरोजगाराच्या दिशेने पावले टाकत आहे. त्याचं स्वप्न केवळ स्वतःचं नाही, तर कुटुंबालाही आधार देण्याचं आहे.

या प्रेरणादायी प्रवासात स्माईल फाउंडेशनने दानदात्यांच्या सहकार्याने त्याला नवी दिशा दिली. “उज्वल भविष्यासाठीची प्रेरणा” ठरणाऱ्या या उपक्रमासाठी पीयूष आत्राम, आदर्श दाढे, विश्वास सुंदराणी, उत्कर्ष धांडे, खुशाल मांढरे, तन्मय कापसे, अनिकेत वासरिकर, कार्तिक पिदुरकर, जगदीश गिरी, कुणाल आत्राम, निकेश खाड़े, प्रसाद पिपराडे, गौरव कोरडे, तुषार वैद्य, सचिन भोयर, सचिन काळे, मयूर भरटकर आणि भूषण पारवे यांनी परिश्रम घेतले.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();