शिवसेना अंगीकृत शिव वाहतूक सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदी अजिंक्य शेंडे यांची नियुक्ती

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आशिर्वादाने तथा शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार तसेच शिव वाहतूक सेना अध्यक्ष उपनेते मा. भाऊ कोरगांवकर यांच्या सूचनेनुसार अजिंक्य शेंडे यांची शिवसेना अंगीकृत संघटना शिव वाहतूक सेनेच्या यवतमाळ जिल्हाध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. 

सदर सोपविलेल्या पदाचा संघटनात्मक जबाबदारीचा मी वाहतूकदारांच्या न्याय हक्कांसाठी आणि त्यांचे प्रश्न - समस्या सोडविण्यासाठी यथायोग्य प्रयत्नशील करणार असल्याचे अजिंक्य शेंडे यांनी यावेळी बोलताना सांगितले. श्री.शेंडे यांनी केलेल्या व्यापक कार्याची दखल घेत पक्ष प्रमुखांनी सहमती दिल्यानंतर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार शिव वाहतूक सेनेचे उपनेते भाऊ कोरगावकर यांनी प्रजासत्ताक दिनी शिवसेना प्रणित शिव वाहतूक सेनेच्या जिल्हाध्यक्ष यवतमाळ पदी अजिंक्य शेंडे यांची निवड केल्याचे नियुक्तीचे पत्र सरचिटणीस निलेश भोसले यांच्या स्वाक्षरीने दिले. 

त्यांच्या नियुक्तीने शहर वाहतूक चालक मालक वर्ग तसेच वणी उपविभागीय क्षेत्रातील वाहक संघटनात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदनसह पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

कृषी सहाय्यक अडकला ACB च्या जाळ्यात: फवारणी पंपसाठी मागितले 1 हजार रुपये!

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वरोरा : लाच घेणे व देणे हा कायद्याने गुन्हा आहे.
परंतु महिन्याकाठी शासनाचा गलेलठ्ठ पगार उचलणा-या एका कृषी सहाय्यकला लाचेचा मोह टाळता आला नाही.अश्यातच आज तो एक हजार रुपयांची लाच घेताना अलगद चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला.

या घटनेमुळे भद्रावती कृषी विभागाच्या कार्यालयासह अन्य शासकीय कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. लाचेच्या जाळ्यात अडकणा-या या लाचखोराचे नांव सरजीव अजाबराव बोरकर असून त्याचे वय अवघे 36 वर्षाचे आहे. सदरहु लाचखोराने माजरी काॅलरी येथील एका शेतकऱ्याकडून फवारणी पंप देण्यासाठी एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक दिगंबर प्रधान, अप्पर पोलिस अधीक्षक संजय पुरंदरे व चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, वैभव गाडगे, प्रदीप ताडाम, राकेश जांभूळकर, पुष्पा काचोळे, सतिश शिडाम यांनी ही यशस्वी कारवाई केली .
लाचखोराने ही लाच विनायक लेआऊट नंदनवन चौक वरोरा येथे स्विकारली.


मंत्रिमंडळ बैठक : वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये रुपांतरणाच्या अभय योजनेस वर्षभराची मुदत वाढ

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मुंबई : शासकीय भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये रुपांतरणासाठी सवलतीच्या दराने अधिमूल्य आकारण्याच्या अभय योजनेस वर्षभराची मुदत वाढ देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.  

कृषिक, निवासी, वाणिज्यिक किंवा औद्योगिक प्रयोजनासाठी दिलेल्या शासकीय जमिनींचे किंवा भाडेपट्टयाने दिलेल्या वर्ग-२ जमिनींचे वर्ग-१ मध्ये रूपांतरण करण्यासाठी सवलतीच्या दराने अधिमूल्य भरण्यासाठीची मुदत संपली आहे. मात्र, राज्यात अशी रुपांतरणाची खूप प्रकरणे प्रलंबित असल्याने या योजनेस मुदतवाढ देण्याबाबत वारंवार मागणी करण्यात येत होती. त्यामुळे या सवलतीच्या दराने अधिमूल्य भरण्याच्या योजनेस आणखी एक वर्षांची मुदत वाढ देण्यास मान्यता देण्यात आली. यानुसार यापूर्वी प्रलंबित असलेल्या प्रकरणांना तसेच ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत दाखल होणाऱ्या अर्जांसाठी ही योजना लागू राहणार आहे. याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.


टेमघर प्रकल्पाचे मजबुतीकरण, गळती रोखण्याच्या कामांसाठी ३१५ कोटी ५ लाख रूपयांच्या खर्चास मान्यता - जलसंपदा विभाग 

पुणे जिल्ह्यातील टेमघर प्रकल्पाचे (ता. मुळशी) मजबुतीकरण व गळती रोखण्याच्या कामांकरिता ३१५ कोटी ५ लाख रूपयांच्या खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.  

टेमघर धरणातून पुणे शहराला दरवर्षी ३.४०९ अघफू पाणी पिण्यासाठी उपलब्ध केले जाते. तसेच मुळशी तालुक्यातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-याद्वारे १ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. हा प्रकल्प पुणे शहराच्या वरच्या बाजूस आहे. या प्रकल्पाला गळती लागल्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. यामुळे धरणाच्या तसेच पुणे शहराच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसा अहवाल विविध समित्यांनी दिला आहे. त्यांच्या शिफारशींचा विचार करता धरणाची गळती रोखण्यासाठी तातडीने उपाय योजना करण्याची आवश्यकता आहे. हे काम केल्याने गळती थांबणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठीही पाणी उपलब्ध होणार आहे. या सर्व बाबींचा एकत्रित विचार करता आज झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळाने टेमघर प्रकल्पाच्या गळती रोखण्यासाठीच्या उपाययोजना व धरण मजबुतीकरण कामासाठी ३१५ कोटी ५ लाख रुपयांच्या किंमतीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली. 


महाबळेश्वर, जावळी तालुक्यातील कोयना जलाशयातील बुडीत बंधारे बांधण्यासाठी १७० कोटी रूपयांची तरतूद - मृदू व जलसंधारण विभाग 

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व जावळी तालुक्यातील कोयना जलाशयामध्ये बुडीत होणारे २५ बंधारे बांधण्यासाठी १७० कोटी रूपयांची तरतूद करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.  

कोयना जलाशय परिसरातील हे २५ बंधारे बुडीत क्षेत्रात येतात. या जलाशयाची पाणी पातळी फेब्रुवारी ते मे या महिन्यांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात कमी होते. त्यामुळे या परिसरातील स्थानिक रहिवाश्यांना पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याची समस्या भेडसावते. ही समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना म्हणून या बंधाऱ्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. त्यासाठी या बंधाऱ्यांच्या बांधकामांसाठी १७० कोटी रुपयांची तरतूद करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली.

उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण व योग्य मोबदला मिळाला नाही. अनेक विस्थापितांच्या पुनर्वसनाची समस्या कायम आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांसमोर गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. येत्या आठवड्यात मागण्या मान्य न झाल्यास उकणी येथील पीडित शेतक-यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारी पासून चंद्रपूर जिल्ह्यातील ऊर्जाग्राम टाडाळी येथील क्षेत्रिय महाप्रबंधक कार्यालयासमोर ते आमरण उपोषण करणार आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. पीडित शेतक-यांच्या आंदोलनाला कामगार व शेतकरी नेते संजय खाडे यांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे.

मौजा उकणी, बेलसणीसह परिसरातील शेकडो एकर जमीन वेकोलिने संपादित केली. त्यातील उकणी या गावाची पुनर्वसन प्रकिया शेवटच्या टप्पात आहे. मात्र बांधकाम विभागाने घरांचे मुल्यांकन करताना जो दर लावला आहे तो 10 वर्षांपूर्वीचा आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना अतिशय अल्प मोबदला मिळत आहे. या मोबदल्यात घरं बांधणं अशक्य आहे. त्यामुळे 2025 च्या सीएसआर रेट नुसार घरांचे मुल्यांकन करावे. तसेच सेक्शन 11 निघालेल्या दिवसपासून बांधकाम मूल्यांकन जोडून 12% व्याज दर लावून मूल्यांकन करण्यात यावे. उकणी, खंड नं.1 मधील उर्वरित जमीन विनाअट निलजई डीप विस्तारीकरणासाठी तत्काळ संपादित करावी, तसेच भुधारकांना मोबदला व नोकरी द्यावी. अशी मागणी वेकोलिच्या क्षेत्रीय मुख्य महाप्रबंधक यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. 

शेतक-यांच्या लढ्यासाठी आम्ही सज्ज - संजय खाडे
जमीन म्हणजे शेतकऱ्यांचा प्राण आहे. आपल्या परिसरातील नागरिकांची उपजिविका ही शेतीवरच अवलंबून आहे. शेतक-यांनी वेकोलिला आपली जमीन व घरं दिलीत. मात्र प्रशासन योग्य मोबदला न देता सुळावरची पोळी खात आहे. लोकप्रतिनीधी देखील मूग गिळून गप्प आहेत. जगाच्या पोशिंद्याला असे अगतिक होऊ देणार नाही. त्यासाठी कोणत्याही लढ्यासाठी आम्ही सिद्ध आहोत.

यापूर्वी पुनर्वसन व योग्य मोबदल्यासाठी अनेकदा लेखी निवेदन देण्यात आलीत. मात्र त्यांच्या निवेदनाला केराची टोपली दाखवण्यात आली. त्यामुळे अखेर शेतक-यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. निवेदनावर पुरुषोत्तम भुसारी, मंगेश खापणे, सुरेश वी, विलास खापने, अर्जुन खापने, कैलास खरवडे, सुरेश जोगी, नानाजी ढवस, किसन पारशिवे, पद्माकर झाडे, पराग तुराणकर, बालाजी वाढई, विकास लालसरे, संजय बांदुरकर आदींच्या स्वाक्षरी आहेत.

साधनकरवाडीत मोठी घरफोडी: पोलीस यंत्रणा अलर्ट

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : शहरातील नावाजलेल्या साधनकरवाडीत एका घरात घुसून चोरट्यांनी घरातील रोख रक्कम व मौल्यवान वस्तू लांबवल्याची घटना सोमवारला पहाटे उघडकीस आली. याबाबत पोलिसात तक्रार देण्यात आली असून चोरट्यानी घरी कोणी नसल्याचा डाव साधत 15 लाख रुपयांचा मुद्देमाल लांबवला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

शहरात घरफोडीची ही मोठी घटना घडल्याने पोलिस यंत्रणाही खडबडून जागी झाली आहे. 3 फेब्रुवारी रोजी साफसफाई करणारी महिला जेंव्हा विमा प्रतिनिधी प्रदीप चिंडालियाकडे साफसफाई करायला आली,तेंव्हा तिला स्वयंपाक रूमचा दरवाजा ओपन दिसला. त्यामुळे महिलेला घरी चोरी झाल्याचा संशय आला. तिने लगेच ही माहिती घरमालक प्रदीप चिंडालिया यांना दिली. घरी कुणी नसतांना घरातील स्वयंपाक रूमचा दरवाजा उघडा असल्याची माहिती मिळताच चिंडालियांचा मुलगा तातडीने नागपूर वरून वणी पोहचला. मुलाने आत बघितल्यानंतर त्याला घरातील अवस्था पाहून घरी चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांने लगेच पोलिस स्टेशनला येऊन या घटनेबाबत तक्रार दिली. पोलीस प्रशासनाने श्वान पथक व फिंगर प्रिंट एक्सपर्टला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. 

शांतप्रिय वणी शहरातील पोलिस स्टेशनचा नुकताच पदभार ठाणेदार गोपाल उंबरकर यांनी स्वीकारला आणि रुजू होताच ठाणेदारांसमोर चोरट्यांनी आव्हान उभे केले आहे. मात्र शहर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखा पथक या घटनेचा विविधांगी तपास करत आहे.