उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण व योग्य मोबदला मिळाला नाही. अनेक विस्थापितांच्या पुनर्वसनाची समस्या कायम आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांसमोर गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. येत्या आठवड्यात मागण्या मान्य न झाल्यास उकणी येथील पीडित शेतक-यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारी पासून चंद्रपूर जिल्ह्यातील ऊर्जाग्राम टाडाळी येथील क्षेत्रिय महाप्रबंधक कार्यालयासमोर ते आमरण उपोषण करणार आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. पीडित शेतक-यांच्या आंदोलनाला कामगार व शेतकरी नेते संजय खाडे यांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे.

मौजा उकणी, बेलसणीसह परिसरातील शेकडो एकर जमीन वेकोलिने संपादित केली. त्यातील उकणी या गावाची पुनर्वसन प्रकिया शेवटच्या टप्पात आहे. मात्र बांधकाम विभागाने घरांचे मुल्यांकन करताना जो दर लावला आहे तो 10 वर्षांपूर्वीचा आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना अतिशय अल्प मोबदला मिळत आहे. या मोबदल्यात घरं बांधणं अशक्य आहे. त्यामुळे 2025 च्या सीएसआर रेट नुसार घरांचे मुल्यांकन करावे. तसेच सेक्शन 11 निघालेल्या दिवसपासून बांधकाम मूल्यांकन जोडून 12% व्याज दर लावून मूल्यांकन करण्यात यावे. उकणी, खंड नं.1 मधील उर्वरित जमीन विनाअट निलजई डीप विस्तारीकरणासाठी तत्काळ संपादित करावी, तसेच भुधारकांना मोबदला व नोकरी द्यावी. अशी मागणी वेकोलिच्या क्षेत्रीय मुख्य महाप्रबंधक यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. 

शेतक-यांच्या लढ्यासाठी आम्ही सज्ज - संजय खाडे
जमीन म्हणजे शेतकऱ्यांचा प्राण आहे. आपल्या परिसरातील नागरिकांची उपजिविका ही शेतीवरच अवलंबून आहे. शेतक-यांनी वेकोलिला आपली जमीन व घरं दिलीत. मात्र प्रशासन योग्य मोबदला न देता सुळावरची पोळी खात आहे. लोकप्रतिनीधी देखील मूग गिळून गप्प आहेत. जगाच्या पोशिंद्याला असे अगतिक होऊ देणार नाही. त्यासाठी कोणत्याही लढ्यासाठी आम्ही सिद्ध आहोत.

यापूर्वी पुनर्वसन व योग्य मोबदल्यासाठी अनेकदा लेखी निवेदन देण्यात आलीत. मात्र त्यांच्या निवेदनाला केराची टोपली दाखवण्यात आली. त्यामुळे अखेर शेतक-यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. निवेदनावर पुरुषोत्तम भुसारी, मंगेश खापणे, सुरेश वी, विलास खापने, अर्जुन खापने, कैलास खरवडे, सुरेश जोगी, नानाजी ढवस, किसन पारशिवे, पद्माकर झाडे, पराग तुराणकर, बालाजी वाढई, विकास लालसरे, संजय बांदुरकर आदींच्या स्वाक्षरी आहेत.

उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण Reviewed by सह्याद्री चौफेर on February 04, 2025 Rating: 5
Powered by Blogger.