31 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : एका युवकाने मृत्यूला कवटाळल्याची घटना वणी शहरात घडली आहे. शहरातील भोईपुरा (टागोर चौक) येथील रहिवासी असलेल्या युवकाने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज 3 फेब्रुवारी ला पहाटे उघडकीस आली. गणेश विजय राखुंडे (31) असे या गळफास घेतलेल्या युवकाचे नाव आहे. त्याने मध्यरात्री गळफास लावल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

वणी शहरात आत्महत्यांचे सत्र सुरूच असून सतत होणाऱ्या आत्महत्यांनी चिंता वाढविली आहे. नैराश्येतून आत्महत्या करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. जीवनातील आव्हाने व संकटांना सामोरे न जाता आत्महत्येचा मार्ग निवडला जात असल्याने मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. जीवन जगण्याची आस सोडून आणखी तालुक्यात आत्महत्या होऊ लागल्याने यावर प्रशासननाने जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहेत.

मृतक गणेश हा नळ जोडणी तथा दुरुस्तीचे (प्लम्बर) काम करायचा. त्याचा सात महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. पत्नी बाळंतपणासाठी माहेरी गेली होती. आई व भाऊ रात्री झोपी गेल्यानंतर त्याने आपल्या खोली मध्ये गळफास लावून आत्महत्या केली.

वन विभागाचे विविध पथक व रेस्क्यू टीम सुकनेगावात

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : ग्रामीण परिसरात वाघ वावरत असल्याच्या चर्चा बातम्या आपण वाचत असतो.वाघ दिसून आला,वाघाने हल्ला केल्याच्या घटना सुद्धा घडल्या आहेत. वणी तालुक्यातील सुकनेगाव शिवारात असलेल्या तलावाजवळ 31 जानेवारी व 1 फेब्रुवारी या दोन दिवसाच्या काळात आई पासून विभक्त झालेल्या वाघाचे दोन पिलं वेगवेगळ्या ठिकाणी मृतावस्थेत आढळल्याने परीसरात एकच खळबळ उडाली होती. 

दरम्यान,परिसरात आणखी वाघ असल्याची चर्चा कायम सुरूच असल्याने आता वाघीण सुकनेगाव परिसरात तर नाही ना.. मग या पिलांचा मृत्यू कसा झाला असावा... काही वेगळे कारण तर नाही ना? असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते. त्या छाव्यांचा मृत्यू भूकबळीने झाला असावा असा कयास वर्तविला होता. दरम्यान उत्तरीय तपासणी अहवाल प्राप्त झाला असुन त्यात या छाव्यांचा मृत्यू हा त्यांच्या पोटात काही नसल्याने भूकबळीमुळेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असुन वन विभागाच्या विविध पथकासह सर्च ऑपरेशन सुरु आहे. या रेस्क्यूत वणी, झरी, मारेगाव, पांढरकवडा येथील वन विभागाच्या पथक काम करित असून यात किरण जगताप भावसे उपवनसंरक्षक, पांढरकवडा वनविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली शंकर हटकर सहा. वनसंरक्षक, प्रभाकर सोनडवले वनपरिक्षेत्र अधिकारी वणी, टि.एन. सांळुंके, वंदना धांडे, पवार साहेब, वनपरिक्षेत्र अधिकारी पारवा यांच्या संयुक्त विद्यमाने वणी, मारेगाव, मुकुटबन वनपरिक्षेत्रातील वन कर्मचारी अधिकारी तसेच मा.श्याम जोशी मानद वन्यजीव संरक्षक यवतमाळ यांची टीम, रेस्क्यु टीम पांढरकवडा इत्यादी वनकर्मचारी सुकनेगावात दाखल झाले असुन 10 दल व 40 लेबर सह पुढील शोध मोहीम सुरु आहे.

महिला कबड्डी स्पर्धेत नवयुवक क्रिडा मंडळ नागपूर विजयी.

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील मार्डी येथील येथे न्यू फ्रेंड्स क्रिडा मंडळ व मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आयोजित केलेल्या कब्बडी स्पर्धेत नवयुवक क्रीडा मंडळ नागपूर या महिला संघाने विजेतेपद प्राप्त केले. तर उपविजेतेपद जय भवानी महिला क्रिडा मंडल ढोरवासा यांनी तर तृतीय पुरस्कार संघर्ष क्रिडा मंडल नागपूर यांनी चतुर्थ पुरस्कार उडता हनुमान क्रिडा मंडल मुंबई यांनी पटकावीला. अंतिम सामान्यकरिता मॅन ऑफ दि मॅच चा बहुमान सुनीता बांगर या नागपूर संघाच्या महिला खेळाडूंने प्राप्त केला.बुधवार दि.31 जानेवारीला महिला व पुरुष कबड्डी सामन्याचे उदघाट्न झाले. या उदघाट्निय सामन्याचे उदघाटक युवक महिला काँग्रेस च्या सरचिटणीस शिवानीताई वडेट्टीवर तर कार्यक्रमाचे अध्यक्ष वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार वामनराव कासावार साहेब, आणि प्रमुख पाहुणे जेष्ठ नेते नानाजी खंडाळकर, पणन महासंघाचे संचालक नरेंद्र ठाकरे, यवतमाळ जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बाल कल्याण सभापती अरुणाताई खंडाळकर, मार्डीचे सरपंच रविराज चंदनखेडे, पुसद अर्बन बँकेचे उपाध्यक्ष राकेश खुराणा,  मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौरीशंकर खुराणा, हबीब खा पठाण, देविदास बोबडे, शांतीलालजी दुगड, यवतमाळ अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष भाऊसाहेब मारोडकर, मारेगाव शहर अध्यक्ष शंकरराव मडावी साहेब, अध्यक्ष तालुका युवक काँग्रेस नगरसेवक आकाश भाऊ बदकी, वसंत जिनिंग संचालक अंकुश माफूर,चिचमंडळ उपसरपंच प्रफुलभाऊ विखणकर,पोलिस पाटील प्रशांतजी पाटील, माजी सरपंच भास्करराव धानफुले, रामकृष्णजी चौधरी, श्रीमती तानेबाई सोयाम, ग्रामपंचायत सदस्य सुरेश चांगले, सुरज पंडीले, गणेश कनाके, छायाताई पुसाटे, शोभाताई कालर, मनीशाताई चौधरी, बेबीताई मोहूर्ले, मंगलाताई टिपले, माजी उपसरपंच प्रफुल झाडे, माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मंगेशराव देशपांडे, विजयजी धानोरकर, मंडळाचे अध्यक्ष अक्षय सराटे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भास्करराव धानफुले यांनी तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश नाखले यांनी व आभार प्रदर्शन मारोती गौरकार यांनी मानले.

भर रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला तरुणाचा मृतदेह, पांढरकवडा येथील खुन प्रकरणी दोघांना अटक

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

पांढरकवडा : केळापूर तालुक्यातील मागूर्डा ते वाई रोडवर एका तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने शहरात चांगलीच खळबळ उडाली असून सचिन तुकाराम कुणघाटकर (23) रा.चंद्रशेखर वार्ड,सावतेली पुरा, पांढरकवडा असे मृतदेह आढळून आलेल्या तरुणाचे नाव आहे.

सचिन हा पांढरकवडा येथील रहिवासी असून तो एका लग्नाच्या रिसेप्शन मध्ये रात्री 10 वाजेपर्यंत होता. त्या नंतर त्याचा संपर्क होत नव्हता. दरम्यान, सकाळी मागूर्डा ते वाई  रोड वर एक मृतदेह पडून असल्याची माहिती अशोक कोहचाडे (पोलीस पाटील) गवराई यांनी पोलीस चौकीत दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असता, मृतदेहाच्या डोक्यात मारून त्याचा खून केला असावा असे निदर्शनास आले. तसेच चेहऱ्यावर चार, पाच ठिकाणी शस्त्रा चे घावही दिसून आले. घटनेची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकारी रामेश्वर व्यंजने, पोलीस निरीक्षक अमोल माळवे यांना मिळताच घटनास्थळी दाखल होऊन तपासाच्या सूचना दिल्या. याबाबत मृतकाचे काका रमेश मारोती कुणघाटकर (53 ) रा. बेतवार ले आउट,पांढरकवडा यांनी पांढरकवडा पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली. त्यावरून पांढरकवडा पोलीसांनी अति शिग्र तपास करीत या प्रकरणी पांढरकवडा येथून दोघांना ताब्यात घेतले. सय्यैद अरबाज अली सय्यद मन्सुर अली (25) रा. मस्जिद वार्ड व अब्दुल रहेमान अब्दुल जब्बार (29) रा. मोबीनाबाद काॅलनी,पांढरकवडा अशी संशयितांची नावे आसून पोलीस त्यांची कसून चौकशी करित आहेत.

पांढरकवडा येथील खळबळजनक खुन प्रकरणी दोघांना अटक केली असून वरिष्ठ पोलिस अधिकारी रामेश्वर व्यंजने, पोलीस निरीक्षक अमोल माळवे यांच्या सूचने नुसार पुढील तपास पांढरकवडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष गजभिये पो.हे.का प्रमोद जुनुनकर पो. का छंदक मनवर, पो. का राजु गेडाम, पो. का. राजु बेलेवार,पो. का.राजु मुत्यलवार पो. हे. का. राजेश सुरोशे करीत आहेत.




आरोपी ला ताबडतोब अटक करा व पांढरकवडा शहरात शांतता व सुव्यवस्था राहावी अशी मागणी घेऊन नातेवाईकांची व वार्डातील नागरिकांची पोलीस स्टेशन ला शुक्रवारी मोठी गर्दी उसळली होती. आरोपी लवकर अटक करून आम्हाला न्याय द्यावा असे ठाणेदार अमोल माळवे यांना सांगितले. तणावपूर्ण वातावरण व जमलेल्या नागरिकांना शांत करून धीर दिला व आरोपीला लवकर अटक करू अशी ग्वाही दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक अमोल माळवे यांनी आपल्या टीमला तपासाच्या सूचना देत या प्रकरणातील पांढरकवडा येथूनच तत्काळ दोघांना अटक केली.

एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेचा निकाल जाहीर

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : कला संचालनालयामार्फत शालेयस्तरावर आयोजित शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड) परीक्षा २०२३ चे निकाल जाहीर झाले आहेत. एलिमेंटरी परीक्षेचा निकाल ९५.५७ टक्के तर इंटरमिजिएट परीक्षेचा ९५.४४ टक्के निकाल जाहीर झाला आहे.

इंटरमिजिएट डॉइंग ग्रेड परीक्षेचा निकाल ३१ जानेवारी २०२४ रोजी www.doa.maharashtra.gov.in, / https://dge.doamh.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असून, लिमेंटरी डॉइंग ग्रेड परीक्षेचा निकाल ५ फेब्रुवारीला जाहीर करण्यात येणार आहे.

या दोन्ही परीक्षांमध्ये २०२३ या वर्षी एकूण आठ लाख १५ हजार १२९ विद्यार्थ्यांची नावे नोंदविलेली होती. एलिमेंटरी परीक्षेस ४ लाख ४६ हजार ७२९ विद्यार्थ्यांनी नोंद केली होती प्रवीष्ट विद्यार्थी ४ लाख २३ हजार ६०७ तर, अनुपस्थित विद्यार्थी २३ हजार १२२ यापैकी एकूण उत्तीर्ण विद्यार्थी ४ लाख ४ हजार ८५७ आहेत.

इंटरमिजिएट परीक्षेस ३ लाख ६८ हजार ४०० विद्यार्थ्यांनी नोंद केली होती. त्यापैकी ३ लाख ५९ हजार १९ प्रविष्ठ झाले तर ९ हजार ३८१ अनुपस्थित होते. यापैकी ३ लाख ४२ हजार ६७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती कला संचालनालयाचे परीक्षा नियंत्रक नागेश वाघमोडे यांनी दिली आहे. अधिक माहितीसाठी २२६२०२३१/३२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.