वणी- कायर मार्गावर ठेवलेली दुचाकी लंपास

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : वणी परिसरात दुचाकी चोरट्यांनी धुडगूस घातला असून रस्त्याच्या कडेला ठेवलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबवली. वणी- कायर मार्गावर बुधवार (दि. 25) जून रोजी दुपारी दिड ते दोन वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. याबाबत दुचाकी चोरीची तक्रार वणी पोलिसात दिली आहे. 

फिर्यादी सुनील सुभाष वाघडकर (वय 32), रा. गोकुळ नगर वणी हे शेती व्यवसाय करतात. ते नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी दहा वाजता आपली दुचाकी क्रमांक MH-29 AV- 6362 घेऊन वाघदरा परिसरात असलेल्या आपल्या शेतात गेले होते. वणी - कायर मार्गावरील खामणकर यांच्या शेताजवळ रस्त्याच्या कडेला त्यांनी आपली डीलक्स कंपनीची मोटारसायकल ठेवून आपल्या शेतात गेले. शेतातील कामे आटोपून दुपारी दिड ते दोन वाजता घराकडे जाण्यासाठी निघाले असता त्यांना आपली दुचाकी दिसून आली नाही. 

आजुबाजूला शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने शेवटी सुनील वाघडकर यांनी वणी पोलिस स्टेशन मध्ये कोणीतरी अज्ञात इसमाने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन शोध घेत आहे.

विशेष म्हणजे वणी परिसरात दुचाकी चोरट्यांनी धुडगूस घातला असून पोलिसांनी चोरट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.