सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे
मारेगाव : तालुक्यातील मार्डी–मच्छिन्द्रा-नांदेपेरा मार्गाची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असतानाही संबंधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
मार्डी, शिवणी, पार्डी, मुकटा, कानडा, हिवरा, वनोजा देवी, लाखापूर, मच्छिन्द्रा, गोरज, दांडगाव, आपटी, डोल, फेफरवाडा,परिसरातील नागरिकांसाठी हा मार्ग महत्त्वाचा असून, या मार्गावरून दररोज दुचाकी, चारचाकी तसेच इतर वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. मात्र, रस्त्यावर निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
पावसामुळे अनेक ठिकाणी खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांची खोली लक्षात येत नाही. त्यामुळे दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका निर्माण झाला असून, वाहनांचेही नुकसान होत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करणे अधिक धोकादायक ठरत आहे.
रस्त्याची तातडीने पाहणी करून खड्डे बुजविण्यासह आवश्यक ती दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने आणखी किती दिवस दुर्लक्ष करायचे, असा सवालही नागरिक उपस्थित करीत आहेत.