सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे
वणी : 28 सप्टेंबर माहिती अधिकार दिनाच्या निमित्ताने माहितीच्या अधिकाराचा वापर, सामाजिक जनजागृती आणि जनहिताच्या प्रश्नांवर कायदेशीर मार्गाने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, वणी शाखेच्या पदाधिकारी व सदस्यांनी केली आहे.
यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक, यवतमाळ, उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी, वणी यांना निवेदन देण्यात आले. नागरिकांना माहितीच्या अधिकाराबाबत मार्गदर्शन करणे, शासकीय कामकाजात पारदर्शकता व उत्तरदायित्वासाठी पाठपुरावा करणे, तसेच जनहिताच्या समस्या व गैरप्रकारांबाबत सक्षम प्राधिकरणाकडे कायदेशीर पद्धतीने तक्रारी करणे, असे काम संघटनेमार्फत केले जात असल्याचे निवेदनात नमूद आहे.
या कामादरम्यान काही कार्यकर्त्यांवर दबाव, धमकी किंवा त्रास निर्माण होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने त्यांच्या सुरक्षिततेबाबत दक्षता घ्यावी. भविष्यात कोणत्याही पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याच्या जीवितास, सुरक्षिततेस अथवा मालमत्तेस धोका निर्माण झाल्यास तातडीने निष्पक्ष चौकशी करून आवश्यक कायदेशीर संरक्षण व मदत द्यावी, तसेच धमकी किंवा त्रासाच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन कायद्यानुसार कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.
निवेदनावर फैयाज अली खान, कवडू वडस्कार, धनंजय भोयर, मोहम्मद इम्रान शेख महेबूब, शेख शकील शेख कय्युम, नितीन काकडे, जितेंद्र डाबरे आणि लहानु सालुरकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


