टॉप बातम्या

जि.प. शाळेपासून थेट ब्रिटनच्या ब्रिस्टल विद्यापीठापर्यंत!

सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे 

वणी : ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतून सुरू झालेला शिक्षणाचा प्रवास आता थेट इंग्लंडमधील University of Bristol या जागतिक स्तरावरील विद्यापीठापर्यंत पोहोचला आहे. वनोजादेवी येथील शिक्षक संदीप संजय गोहोकार यांची विद्यापीठाच्या Master of Development Studies (MSc) या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या नामांकित परदेशी शिष्यवृत्ती सन २०२६-२७ अंतर्गतही त्यांची निवड झाली असून, ग्रामीण भागातून जागतिक शिक्षणाच्या दिशेने झेप घेणारा हा प्रवास प्रेरणादायी ठरत आहे.

महाराष्ट्र शासनाकडून विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांची निर्धारित निकषांनुसार परदेशातील उच्च शिक्षणासाठी निवड केली जाते. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून गोहोकार यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील विकास अभ्यासाचे शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.

शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण युवकांना दिशा
पदवी शिक्षणाच्या काळापासूनच संदीप गोहोकार यांनी सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. मार्गदर्शक रामटेके सर यांच्या क्लासेसमधून महापुरुषांच्या विचारांची प्रेरणा घेत त्यांनी मित्रांच्या सहकार्याने शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून शैक्षणिक जागृती आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे उपक्रम सुरू केले.

याच कार्यातून सामाजिक जाण असलेल्या युवकांचा समूह उभा राहिला आणि पुढे तो ‘युवाशक्ती’ म्हणून ओळखला जाऊ लागला. शैक्षणिक समानता, बेरोजगारी, कौशल्य विकास आणि युवकांच्या प्रश्नांवर गावागावांत जनजागृती करण्यात आली. युवकांसाठी कौशल्य विकास शिबिरे घेण्यात आली.
ग्रामीण विद्यार्थ्यांना देश-विदेशातील उच्च शिक्षणाच्या संधींची माहिती मिळावी, या उद्देशाने Chevening Scholar ॲड. दीपक चटप यांच्या सहकार्याने महाविद्यालयांमध्ये ‘शिक्षण यात्रा’ हा उपक्रमही राबविण्यात आला.

सहकारातून आर्थिक सक्षमीकरणाचा प्रयत्न
संत तुकाराम महाराजांच्या ‘एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ’ या विचारातून प्रेरणा घेत गोहोकार यांनी आदर्श क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या स्थापनेत पुढाकार घेतला. शेतकरी, बचतगट आणि युवकांना आर्थिक आधार मिळावा तसेच रोजगार व आर्थिक संधी निर्माण व्हाव्यात, या उद्देशाने सहकाराच्या माध्यमातून काम करण्यात आले.
ग्रामीण विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, उच्च शिक्षण, रोजगाराच्या संधी आणि व्यक्तिमत्त्व विकास याबाबत मार्गदर्शन मिळावे, यासाठीही त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.

इंडोनेशियातील आंतरराष्ट्रीय परिषदेत युवकांचे प्रतिनिधित्व
सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत गोहोकार यांची Universal Youth Leadership Summit, Indonesia या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड झाली. या माध्यमातून त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर युवकांचे प्रतिनिधित्व केले.

‘स्टुडंट स्टडी रूम’ची BBC मराठीकडून दखल
शिक्षक म्हणून जिल्हा परिषद शाळा, वनोजादेवी येथे कार्यरत असताना त्यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांच्या दैनंदिन अनुभवांना शिक्षणाशी जोडण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी आणि शिक्षण अधिक आनंददायी व्हावे, या उद्देशाने त्यांनी ‘Student Study Room’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला.
या उपक्रमाची दखल BBC मराठीकडून घेण्यात आली होती. ग्रामीण शाळेतील प्रयोगशील शिक्षणपद्धतीला मिळालेली ही दखल त्यांच्या शैक्षणिक कार्यातील महत्त्वाचा टप्पा ठरली.

जागतिक विकासाचे ज्ञान ग्रामीण समाजासाठी वापरण्याचा मानस
University of Bristol येथील Master of Development Studies हा अभ्यासक्रम निवडताना केवळ पदवी किंवा रोजगाराचा विचार न करता विकासाच्या व्यापक संकल्पनांचा अभ्यास करून ते ज्ञान समाजाच्या उपयोगात आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, अर्थव्यवस्था, सामाजिक समानता आणि विकासाच्या जागतिक संकल्पनांचा सखोल अभ्यास करून भविष्यात हे ज्ञान ग्रामीण व वंचित समाजाच्या विकासासाठी वापरण्याचा त्यांचा मानस आहे.

“हे यश माझे एकट्याचे नाही”
आपल्या निवडीबद्दल भावना व्यक्त करताना संदीप गोहोकार यांनी या यशाचे श्रेय मित्र, मार्गदर्शक आणि युवाशक्ती संघटनेतील सहकाऱ्यांना दिले. ॲड. दीपक चटप, जयसिंग पाटील गोहोकार, स्वप्निलदादा गोहोकार, रामटेके सर, आकाश मते, ओम ढेंगळे, चंदू दोडके, रुपेशदादा ठाकरे, नितू तुरणकर, अनिकेत मोहितकर, राहुल खारकर, अमित उपाध्ये, अक्षय कवरसे, गौरव जवादे, धीरज भोयर, आशिष रिंगोले, शुभम गावंडे, सुजित गाताडे यांच्यासह युवाशक्ती संघटनेतील सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्यामुळे हा टप्पा गाठता आल्याचे त्यांनी सांगितले.

“हे यश माझे एकट्याचे नसून, सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात माझ्यासोबत खंबीरपणे उभ्या राहिलेल्या सर्व सहकाऱ्यांचे आहे,” अशी भावना संदीप गोहोकार यांनी व्यक्त केली.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आणि सामाजिक कार्याची वाटचाल करत जागतिक स्तरावरील उच्च शिक्षणाची संधी मिळविणाऱ्या संदीप गोहोकार यांच्या या यशाकडे ग्रामीण युवकांसाठी प्रेरणादायी उदाहरण म्हणून पाहिले जात आहे.

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();