टॉप बातम्या

श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेची आर्थिक भरारी!

सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे

वणी : श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २० सप्टेंबर २०२६ रोजी वसंत जिनिंग हॉल, वणी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. संस्थेच्या आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील उल्लेखनीय कामगिरीचा आढावा यावेळी सभासदांसमोर मांडण्यात आला. सभेला संस्थेचे बहुसंख्य सभासद उपस्थित होते.

आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये संस्थेने ३.०८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदविला असून, संस्थेला ‘अ’ ऑडिट वर्ग प्राप्त झाला आहे. संस्थेची आर्थिक वर्षातील एकूण उलाढाल ६,४९१ कोटी रुपये झाल्याची माहिती सभेत देण्यात आली. संस्थेच्या आर्थिक प्रगतीबरोबरच भविष्यातील विकासाच्या दृष्टीने विविध विषयांवर सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर सभेपुढील विषयांना सभासदांनी मंजुरी दिली.

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेचा विस्तारही सातत्याने होत असून, संस्थेची सभासद संख्या ९८ हजारांहून अधिक झाली आहे. महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्रात संस्थेच्या २१ शाखा व मुख्य कार्यालय कार्यरत आहेत. संस्थेकडे ९४० कोटी रुपयांच्या सभासद ठेवी असल्याने सभासदांचा संस्थेवरील वाढता विश्वास अधोरेखित होत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, कायदे व नियमांचे पालन तसेच सामाजिक बांधिलकी यांना संस्थेने प्राधान्य दिले आहे. सभासदांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून संस्थेची वाटचाल सुरू असून, भविष्यातही अधिक सक्षम आणि विश्वासार्ह सेवा देण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे सभेत स्पष्ट करण्यात आले.
संस्थेचे उपाध्यक्ष विवेकानंद मांडवकर यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या कार्याचा व आर्थिक प्रगतीचा आढावा सभासदांसमोर मांडला. सभेचे अध्यक्ष ॲड. देविदासजी काळे यांनी अहवालाचे वाचन करून सभासदांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. सभेपुढील विषयांचे वाचन व सभेचे संचालन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दोरखंडे यांनी केले. समारोपीय आभार प्रदर्शन संस्थेचे संचालक सुरेशराव बरडे यांनी केले.

यावेळी संस्थेचे संचालक सुधीर दामले, हरिशंकर पांडे, रमेश भोंगळे, सुरेशराव बरडे, परीक्षित एकरे, ॲड. घनश्याम निखाडे, डॉ. भूपाळराव पिंपळशेंडे, चिंतामण आगलावे, पुरुषोत्तम बद्दमवार, उदय रायपुरे, लिंगारेड्डी अंडेलवार, अरविंद ठाकरे, सुनील देठे, सौ. छायाताई ठाकूरवार, सौ. निमाताई जीवने यांच्यासह सभासद, कर्मचारी व अभिकर्ता वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();