सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : दुष्काळाच्या झळांनी आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांसह समाजातील गरजू घटकांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद फुलविण्यासाठी शिवसेना (शिंदे गट) यांच्या वतीने मारेगाव तालुक्यात दिवाळी शिधा वाटपाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. सणासुदीच्या काळात गरजू कुटुंबांच्या घरातही आनंदाचा दिवा प्रज्वलित व्हावा, या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
'मदतीचे तोरण हेच शिवसेनेचे धोरण' या ब्रीदवाक्याला अनुसरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी दुष्काळग्रस्त शेतकरी, विधवा महिला, दिव्यांग व्यक्ती आणि आर्थिकदृष्ट्या गरजू कुटुंबांना दिवाळी शिध्याचे किट वितरित करण्यात आले. या किटमध्ये खाद्यतेल, साखर, रवा, मैदा, डाळ, गूळ, चहा पावडर तसेच फराळासाठी आवश्यक साहित्याचा समावेश होता.
दिवाळी हा आनंदाचा आणि प्रकाशाचा सण असला, तरी आर्थिक विवंचनेमुळे अनेक कुटुंबांना सण साजरा करताना अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत मदतीचा हात पुढे करणे हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याची भावना या उपक्रमातून व्यक्त झाली. शिवसेना ही केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नसून सामान्य माणसाच्या सुख-दुःखात सहभागी होणारी संघटना आहे. संकटाच्या काळात शेतकरी आणि गरजूंच्या पाठीशी उभे राहणे, हेच खरे हिंदुत्व असून, बाळासाहेब ठाकरे यांची शिकवणही हीच असल्याचे पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
तालुकाध्यक्ष विशाल किन्हेकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या उपक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेनेचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी संजय आवारी, धनराज भट, प्रवीण बालकी, सुनील गेडाम, उज्वला चंदखेडे, कल्पना गावंडे, पिंपळ शेंडे, विजय मेश्राम, गणेश आसुटकर, प्रशांत भंडारी, अतिल राऊत, प्रशांत राऊत, गोपी बावने, मुकुंद निवल, हरीभाऊ रामपुरे, दिगंबर नावडे, शंकर नागोसे, शुभम ठावरी, विलास रायपुरे आणि गजानन चंदनखेडे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

