टॉप बातम्या

एकाच रात्री तीन घरफोड्या; वागदऱ्यात भीतीचे सावट!

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : शहरालगतच्या वागदरा गावात १८ सप्टेंबरच्या रात्री चोरट्यांनी एकाच वेळी तीन घरांना लक्ष्य केल्याने गावात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, एका घरात कुटुंबातील सहा सदस्य झोपलेले असतानाही घरफोडी करून चोरी करण्यात आली. अन्य दोन बंद घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील ऐवज लंपास केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वागदरा येथील माजी सरपंच शीतल जयपाल गौरकार यांच्या घरात कुटुंबातील सहा सदस्य झोपलेले असताना चोरट्यांनी प्रवेश केला. कपाट उघडून त्यातील सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे सांगण्यात येत आहे. सकाळी कुटुंबीय जागे झाल्यानंतर घरातील साहित्य अस्ताव्यस्त असल्याचे तसेच कपाटाचे दार उघडे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, घरातील कोणत्याही सदस्याला चोरीची चाहूल लागली नाही. घरातील पाळीव कुत्र्यानेही भुंकले नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्यामुळे या घटनेबाबत परिसरात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, या बाबींची सत्यता तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, स्वप्नील पोथले यांच्या बंद घरालाही चोरट्यांनी लक्ष्य केले. त्यांचा मुलगा चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचार घेत असल्याने ते त्याला भेटण्यासाठी गेले होते, तर त्यांची पत्नी शेजारी झोपण्यासाठी गेली होती. ही संधी साधून चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरातील ऐवजावर डल्ला मारला. सकाळी घरी परतल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या पत्नीच्या लक्षात आले.

तिसऱ्या घटनेत गावातील एका महिलेच्या बंद घराचेही कुलूप तोडण्यात आले. संबंधित महिला काही दिवसांपासून बाहेरगावी असल्याने घर बंद होते. याचाच फायदा घेत चोरट्यांनी घरफोडी केली. या घरातून नेमका किती मुद्देमाल चोरीला गेला, याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

एकाच रात्री तीन घरांमध्ये चोरीच्या घटना घडल्याने वागदरा गावातील नागरिकांमध्ये सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. गावात रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांचा तातडीने शोध घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

घटनेची माहिती मिळताच वणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. चोरीला गेलेल्या मुद्देमालाची नेमकी किंमत आणि इतर तपशील तपासानंतर स्पष्ट होणार आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू असून, पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();