सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
चंद्रपूर : जिल्हा पोलीस दलाची कार्यक्षमता, गतिशीलता आणि आपत्कालीन परिस्थितीत प्रतिसाद क्षमता अधिक बळकट करण्यासाठी पोलीस दलाला प्राप्त, 14 नवीन वाहनांचे लोकार्पण राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शहरातील सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज दोन ‘मोबाईल सीसीटीव्ही सर्व्हिलन्स व्हॅन’देखील सेवेत दाखल करण्यात आल्या.
कार्यक्रमाला खासदार प्रतिभा धानोरकर, विधान परिषद सदस्य सुधाकर अडबाले, आमदार किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे, करण देवतळे, जिल्हाधिकारी वसुमना पंत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, महानगरपालिका आयुक्त अकुनुरी नरेश, पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्यासह पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
*फिरत्या सीसीटीव्ही व्हॅनमधून संवेदनशील भागांवर नजर* : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे तसेच मोर्चे, सण-उत्सव, मिरवणुका आणि गर्दीच्या ठिकाणी प्रभावी निगराणी ठेवण्यासाठी दोन मोबाईल सीसीटीव्ही सर्व्हिलन्स व्हॅनचा उपयोग करण्यात येणार आहे. या व्हॅनमुळे आवश्यकतेनुसार कोणत्याही ठिकाणी तातडीने फिरती नियंत्रण यंत्रणा उभारणे शक्य होणार आहे. या वाहनांवर 360 अंश फिरणारे उच्च क्षमतेचे पीटीझेड (PTZ), हाय-डेफिनिशन आणि नाईट-व्हिजन कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे दिवसा तसेच रात्री लांब अंतरावरील परिसरातील हालचालींचे स्पष्ट चित्रण करता येणार आहे.
नियंत्रण कक्षाशी थेट जोडणी :
मोबाईल सीसीटीव्ही व्हॅनमधील कॅमेरे मध्यवर्ती नियंत्रण कक्षाशी जोडण्यात येणार असून, घटनास्थळावरील परिस्थितीचे थेट निरीक्षण करणे अधिक सुलभ होणार आहे. वाहनाच्या आतील भागात आधुनिक मॉनिटर्स, व्हिडिओ रेकॉर्डिंग व स्टोरेज व्यवस्था तसेच सार्वजनिक घोषणा प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे गर्दीच्या व्यवस्थापनासह आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक सूचना देणे आणि तातडीने निर्णय घेणे शक्य होणार आहे.
संवेदनशील भाग, महत्त्वाचे चौक, गर्दीची ठिकाणे तसेच विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये या फिरत्या निगराणी यंत्रणेचा उपयोग होणार आहे. एखादी अनुचित घटना घडल्यास परिस्थितीचे प्रत्यक्ष निरीक्षण करून पोलीस पथकांना त्वरित सूचना देणे आणि आवश्यक प्रतिसाद यंत्रणा कार्यान्वित करणे यामुळे अधिक प्रभावी होणार आहे. गस्त आणि आपत्कालीन प्रतिसादाला मिळणार गती
जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून प्राप्त नवीन वाहनांमुळे पोलीस दलाच्या नियमित गस्तीला गती मिळण्यासोबतच कायदा व सुव्यवस्था राखणे, घटनास्थळी तातडीने पोहोचणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद देण्याची क्षमता अधिक सक्षम होणार आहे. आधुनिक वाहनांचा समावेश आणि तंत्रज्ञानाधारित निगराणीमुळे ‘सक्षम पोलीस दल, सुरक्षित चंद्रपूर’ या उद्दिष्टाला अधिक बळ मिळणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजन पोलीस अधीक्षक आयुष नोपानी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मोटार परिवहन विभाग, पोलीस कल्याण विभाग, बिनतारी संदेश विभाग, सायबर पोलीस स्टेशन आणि पोलीस मुख्यालयातील अधिकारी व अंमलदारांनी केले.