टॉप बातम्या

साहित्यप्रेमी मनिषा चिद्दरवार यांचा अकस्मात निरोप

सह्याद्री चौफेर | किरण घाटे

चंद्रपूर : साहित्यात विशेष रुची आणि गोडी असलेल्या, मनस्वी आणि संवेदनशील लेखिका मनिषा चिद्दरवार यांचे काल दुपारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी मनाला चटका लावून गेली.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे बिछान्यावर असतानाही त्यांनी 
‘भारतीय कोल्हापूर मंच’च्या कार्याची जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे सांभाळली. अल्पावधीतच आपल्या कार्यातून त्यांनी अनेकांचा विश्वास आणि आपलेपणा संपादन केला होता. समूहावर कोणतेही काम सोपविले, तरी त्यासाठी त्यांचा नकार कधीच नसायचा. उपचार सुरू असतानाही त्यांनी आपल्या लेखणीचा प्रवास थांबविला नव्हता. मात्र, नियतीने अचानक त्यांच्या जीवनप्रवासालाच पूर्णविराम दिला.

मनिषाच्या शेवटच्या दिवसांत तिच्या आईने घेतलेली काळजी आणि केलेली धडपड मन हेलावून टाकणारी होती. शेवटच्या क्षणापर्यंत आई आपल्या लेकीच्या सोबत होती; मात्र अखेर काळाने मनिषाला आपल्यापासून हिरावून नेले.
सुमारे सहा महिन्यांपूर्वी भ्रमणध्वनीवरून माझे तिच्याशी बोलणे झाले होते. त्या वेळी ती सहज म्हणाली होती, “सर, ‘सहज सुचलं’ हे नाव मी खूप ऐकलं आहे. पण एका समूहाची जबाबदारी माझ्यावर असल्यामुळे मला सहज सुचलंवर येणे शक्य नाही. मात्र, कधीतरी ‘सहज सुचलं’विषयी नक्की लिहीन.” हेच तिचे माझ्याशी झालेले शेवटचे बोलणे ठरले.

अतिशय शांत, प्रेमळ, मनमिळावू आणि प्रसंगी आपल्या निरागस हास्याने समोरच्याचे मन जिंकणारी मनिषा काल कोणालाही न सांगता आमच्यातून निघून गेली. तिच्या साहित्यिक वाटचालीचे आणि कार्याचे अमयदाने मनापासून कौतुक केले होते. “तुझा साहित्य क्षेत्रातील प्रवास एवढ्यात तरी थांबणार नाही,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.
परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. तिच्या अकस्मात जाण्याने ‘भारतीय कोल्हापूर मंच’मध्ये निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नाही. तिची लेखणी, तिचा शांत स्वभाव, तिचे प्रेमळ बोलणे आणि तिच्या कार्यातील प्रामाणिकपणा कायम स्मरणात राहील.

मनिषाच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली!
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो.

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();