टॉप बातम्या

शून्यातून भरारी घेणारी:मूलची सभापती रागिणीताई आडेपवार

सह्याद्री चौफेर | किरण घाटे 

चंद्रपूरमूल नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या नवनिर्वाचित सभापती तथा नगरसेविका रागिणीताई ऊर्फ नलिनी दिनेश आडेपवार यांचा
 संघर्षमय प्रवास खरोखरच प्रेरणादायी असून त्या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य सहसंयोजिका आहे.

कोणतीही भक्कम आर्थिक पार्श्वभूमी किंवा राजकीय वारसा नसताना, केवळ अथांग जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या जोरावर त्यांनी मूल शहरात आपल्या कामाचा एक वेगळा आणि गडद ठसा उमटवला आहे. अत्यंत मनमिळावू स्वभाव, कामाची तत्परता आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व यांमुळे त्यांनी अल्पकाळातच जनमानसात आपले हक्काचे स्थान निर्माण केले आहे.

रागिणीताई यांनी आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात सन २००३ मध्ये अत्यंत छोट्या कामांमधून केली. २००३ ते २००७ या काळात त्यांनी प्रबोधनासोबतच जिल्हा परिषदेच्या 'महात्मा फुले हमी केंद्र' अंतर्गत शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे मोलाचे कार्य केले. यात भटक्या जमाती, कोरकू, गोंड आदिवासी अशा वंचित मुलांचा समावेश होता, ज्यांच्यासाठी त्यांनी रात्रीची शाळा भरवून त्यांना सुशिक्षित केले. पुढे २००९ मध्ये सुवर्ण जयंती योजनेद्वारे बचत गटांचे काम करत त्यांनी महिला सक्षमीकरणाकडे पाऊल टाकले. तसेच २०१२-२०१४ दरम्यान नगरपालिकेच्या 'दिपशाखा' योजनेतून त्यांनी किशोरवयीन मुलींना मासिक पाळी, स्वच्छता आणि आरोग्याबाबत प्रशिक्षण देऊन व्यापक जनजागृती केली.

त्यांचा हा सेवाभावी प्रवास एवढ्यापुरताच मर्यादित राहिला नाही. सावित्री फातिमा संस्थेच्या माध्यमातून कौटुंबिक सल्लागार केंद्र चालवून त्यांनी विधवा व निराधार महिलांना मदत केली, तसेच कौटुंबिक वाद निवारण आणि महिलांच्या हक्कासाठी लढा दिला. २०१८ पासून त्यांनी महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत 'सहयोगिनी' पदावर काम करताना १५० ते २०० बचत गटांचे बळकटीकरण केले आणि शेकडो एकल महिलांना रोजगार मिळवून दिला. कोरोनाच्या भीषण संकटात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता त्यांनी गरजूंना अन्न आणि शालेय साहित्याचे वाटप केले, ज्यासाठी त्यांना 'मूल गौरव पुरस्काराने' सन्मानित करण्यात आले.

२०२३ मध्ये त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश करून 'महिला शहर अध्यक्ष' म्हणून राजकीय क्षेत्रात आपली उत्तुंग भरारी घेतली. बालपणी आईच्या आजारपणामुळे सोसाव्या लागलेल्या कौटुंबिक उणिवांचे दुःख बाजूला सारून, त्यांनी समाजातील आया-बहिणींच्या सेवेलाच आपले ध्येय मानले. त्यांच्या या प्रवासात त्यांचे पती आणि मुलींचा खंबीर पाठिंबा राहिला आहे. अनेक अडचणींवर मात करत जनमाणसांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या, अशा या प्रभावी जीवनशैली व खंबीर नेतृत्व लाभलेल्या या नारीशक्तीला सह्याद्री न्यूज चॅनलचा सलाम !
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();