टॉप बातम्या

प्रदूषणाने शेती उद्ध्वस्त: लॉयड्स कंपनीची परवानगी रद्द न झाल्यास मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर शेतकरी करणार आत्मदहन

सह्याद्री चौफेर | किरण घाटे

चंद्रपूर : जिल्ह्यातील एमआयडीसी घुग्घुस येथील लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लि. या लोह-प्रकल्पाच्या घातक वायू, रासायनिक घनकचरा आणि जलप्रदूषणामुळे उसगाव व घुग्घुस परिसरातील शेकडो एकर शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. वर्धा नदी आणि उसगाव नाला रासायनिक द्रव्याने प्रदूषित झाल्याने या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. यासोबतच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या चंद्रपूर प्रादेशिक कार्यालयासमोर कारखान्यातील रासायनिक कचरा व सांडपाणी टाकून तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे.
संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेने निवेदनात नमूद केल्यानुसार, ऑगस्ट महिन्यात उसगाव नाल्यात मोठ्या प्रमाणात रासायनिक द्रव्य सोडल्यामुळे १०० एकराहून अधिक शेती बाधित झाली आहे. कारखान्याकडून नियमांचे उल्लंघन करून घातक घटकांची विक्री करणे, सायंकाळी व रात्रीच्या वेळी हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बंद ठेवणे, रात्रीच्या वेळी प्रदूषणकारी घटकांची वाहतूक करणे, निकामी यंत्रणा वापरणे आणि ग्रीस व कोळसामिश्रित सांडपाणी नाल्यात सोडणे असे अनेक गंभीर प्रकार सुरू आहेत. तसेच पर्यावरण मंजुरीपेक्षा दुप्पट उत्पादन घेऊन शासनाचा महसूल बुडवला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे स्थानिक अधिकारी कारखानदारांशी संगनमत करून या प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत त्यांच्यावर उच्चस्तरीय चौकशी व निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कारखान्यावर कायदेशीर कारवाई करून त्याची पर्यावरण परवानगी त्वरित रद्द न झाल्यास २५ सप्टेंबर रोजी मुंबईतील मुख्यमंत्री वर्षा बंगल्यासमोर उसगाव येथील शेतकरी मोहनदास राजूरकर, वामन राजूरकर, बंडू राजूरकर, रामरतन राजूरकर, सुधाकर ठाकरे आणि नितेश ठाकरे हे आत्मदहन करणार आहेत. या घटनेची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश बेले यांनी दिला आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();