चुकीच्या खात्यात ट्रान्स्फर झालेले पैसे परत मिळवा

योगेश मडावी | सह्याद्री चौफेर 

झरी : हल्ली पैशांचे व्यवहार करण्याचे अनेक मार्ग निर्माण झाले आहेत. बँकेचे पैशांचे व्यवहारदेखील आता आपल्या स्मार्टफोनवरून आपल्याला सहज करता येतात. कोणालाही पैसे पाठवणं किंवा कोणाकडून पैसे घेणं आता अगदी सोपं झालं आहे; मात्र स्मार्टफोनवरून किंवा एखाद्या बँक अ‍प्लिकेशनच्या साह्याने व्यवहार करताना आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते. ऑनलाइन पैशांचे व्यवहार कसे करावेत, याची आपल्याला पुरेशी माहिती असणं गरजेचं आहे.

ऑनलाइन व्यवहार जेवढे सोपे तेवढेच अवघडदेखील असतात. एखादेवेळी आपण पैसे पाठवत असताना चुकून ते पैसे कोण्या दुसऱ्याच व्यक्तीला जाण्याची शक्यता असते. असं झाल्यास घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. कारण चुकीच्या खात्यात पैसे गेल्यास ते तुम्हाला परत मिळू शकतात. 

पैशांचा व्यवहार करताना तुमच्याकडून चुकून पैसे चुकीच्या खात्यात ट्रान्स्फर झाले असतील तर त्वरित तुमच्या बँकेला याची माहिती द्या. त्याचबरोबर कस्टमर केअरला फोन करून घडलेल्या प्रकाराची संपूर्ण माहिती द्या. बँकेने तुम्हाला ई-मेलवर सर्व माहिती विचारली, तर या चुकून झालेल्या व्यवहाराची माहिती द्या. यामध्ये झालेल्या व्यवहाराची तारीख आणि वेळ, तुमचा खाते क्रमांक आणि ज्या खात्यात तुमच्याकडून चुकून पैसे ट्रान्स्फर झाले आहेत त्याविषयी संपूर्ण माहिती द्या.

घडलेला प्रकार तुम्ही बँकेला कळवल्यानंतर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळू शकतात. काही वेळा अशी प्रकरणं सोडवण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधीदेखील लागू शकतो. तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन याबद्दल चौकशी करू शकता, की ट्रान्स्फर झालेली रक्कम कोणत्या शहरातल्या कोणत्या बँकेच्या कोणत्या शाखेतल्या खात्यात जमा झाली आहे. मग तुम्ही तुमच्या शाखेशी बोलून पैसे परत मिळवण्याचा प्रयत्न करू शकता. यानंतर ज्या व्यक्तीच्या खात्यात तुमचे पैसे जमा झाले आहेत त्या व्यक्तीच्या बँकेला तुमची बँक घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती देईल. त्यानंतर ती बँक त्या व्यक्तीकडून हे चुकून ट्रान्स्फर झालेले पैसे परत करण्याची परवानगी मागते.
याव्यतिरिक्त अनेक प्रकारांमध्ये तुम्ही कायद्याचा आधारदेखील घेऊ शकता. ज्या व्यक्तीच्या खात्यात चुकून पैसे जमा झाले आहेत. त्या व्यक्तीने पैसे परत देण्यास नकार दिला, तर तुम्ही त्या व्यक्तीविरुद्ध न्यायालयात तक्रार दाखल करू शकता. कारण त्या व्यक्तीने पैसे परत न केल्यास ते रिझर्व्ह बँकेच्या नियमांचं उल्लंघन करण्यासारखं आहे.
अशा परिस्थितीत तुम्हाला न्यायालयात जाण्याचा अधिकार प्राप्त होतो. आरबीआयने बँकांना सूचनादेखील दिल्या आहेत, की जर चुकून दुसऱ्याच्या खात्यात पैसे जमा झाले, तर तुमच्या बँकेला लवकरात लवकर यावर कार्यवाही करावी लागेल. अर्थात, आपण स्वतःही चुकीच्या खात्यात पैसे जाणार नाहीत, यासाठी आवश्यक ती काळजी घेणं गरजेचं आहे.

चुकीच्या खात्यात ट्रान्स्फर झालेले पैसे परत मिळवा चुकीच्या खात्यात ट्रान्स्फर झालेले पैसे परत मिळवा Reviewed by सह्याद्री चौफेर on May 29, 2022 Rating: 5
Powered by Blogger.