सराटी येथील एक वर्षापासून सुटत नसलेला रस्त्याचा विषय अखेर निकाली काढला

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : प्रकरणात थोडक्यात हकीगत अशी की, मौजे सराटी येथील गट क्रमांक 5 मधील जमीन मालक/अर्जदार भास्कर गोसाई सपाट व इतर हे रस्ता मिळावा म्हणून अर्ज सादर केला होता. श्री.उत्तम निलावाड तहसीलदार म्हणून तहसील कार्यालय मारेगांव येथे दिनांक 13 जून 2023 रोजी रुजू होऊन सबंधीताचे म्हणणे ऐकून सदर रस्त्याचा निकाल/आदेश दिनांक 13 जुलै 2023 रोजी पारित केला. आदेश पारित केल्यानंतरही गैरअर्जदार/गट क्रमांक 114 चे जमीन मालक नरेंद्र अर्जुन आस्कर व त्याची दोन मुले दोन वेळा त्या त्या वेळी कार्यरत असलेले मंडळ अधिकारी व तलाठी यांनी प्रयत्न करुन ही रस्ता देण्यास तयार नव्हते. पुन्हा अर्जदार हे दिनांक 19 जून 2024, बुधवार रोजी तहसील कार्यालय मारेगांव येथे उपोषणास बसले, उपोषणास बसल्यानंतर तहसीलदार मारेगाव यांनी सदरचा रस्ता दिनांक 21 जून 2024 रोजी संबंधित मंडळ अधिकारी व तलाठी जायमोक्याच्या ठिकाणी उपस्थित राहून मोकळा करून देतील असे आश्वासन दिले. नंतर मंडळ अधिकारी व तलाठी यांनी सदरच्या ठिकाणी आपण स्वतः उपस्थित राहावे अशी तहसीलदार यांना विनंती केल्यानंतर तहसीलदार स्वतः आज दिनांक 21 जून 2024 रोजी प्रत्यक्ष जायमोक्याच्या ठिकाणी उपस्थित राहून अर्जदार व गैरअर्जदार यांना समजावून सांगून मागील वर्षी जो आदेश पारित केलेला आहे त्या आदेशाप्रमाणे रस्ता देणे आवश्यक असल्याचे सांगून आदेशाप्रमाणे अडविलेला रस्ता मोकळा करून देण्यात आला. शेवटी अर्जदार व गैरहजर यांनी मा. तहसीलदार साहेब व मंडळ अधिकारी, तलाठी यांचे आभार मानून आमचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यात आल्याच्या भावना व्यक्त करून आभार मानले.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, तीन हवसखोरांना अटक

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : वणीत महिलां, तरुणीच्या सुरक्षिततेचा प्रश्न एरणीवर आल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील राजूर (कॉ.) येथील तीन हवसखोरांनी चायनिजच्या दुकानावर काम करणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे रात्री तीन चाकी वाहनातून किडनॅप करून तिला वणी-घुग्गुस मार्गावर सुनसान अशा ठिकाणी नेले. तेथे तिघांनीही या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. या घटनेने जनसामान्यातून संताप व्यक्त होत आहे.

तरुणांनी त्यानंतर तिला वणीत आणून सोडले. नराधमांच्या या आपत्तीजनक कृत्याने अल्पवयीन मुलगी चांगलीच भेदारली. तिला काय करावे काहीही सुचेनासे झाले. अखेर अत्याचाराने बळी ठरलेल्या पिडीतेने पोलीस ठाणे गाठून पोलिसांसमोर घडलेला सर्व प्रकार सांगितला. तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपींविरुद्ध रीतसर तक्रार नोंदविली. पिडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अवघ्या काही तासांतच नराधमांना ताब्यात घेत अटक केली.

शंकर उर्फ राकेश नामदेव भोस्कर (24), राहुल राकेश यादव (25), शंकर यादव (27) तिघेही रा. राजूर (कॉ.), अशी या पोलिसांनी गजाआड केलेल्या आरोपींची नावे आहेत. या तीनही आरोपींवर पोलिसांनी भादंविच्या कलम 376, 366, 506 नुसार गुन्हे दाखल केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्या मार्गदर्शनात एपीआय दत्ता पेंडकर करीत आहे.

तलाठी भरतीच्या निवड यादीतील संशयित उमेदवारांची चौकशी करा - आदिवासी टायगर सेनेची मागणी


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 
   
 चंद्रपूर : तलाठी भरतीच्या अंतिम निवड यादीतील अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारातील काही संशियत उमेदवारांची चौकशी करा, अशी आज आदिवासी टायगर सेना चंद्रपूर च्या वतीने मागणी करण्यात आली.
  
जिल्हा निवड समिती जिल्हाधिकारी चंद्रपूर अंतर्गत सन २०२३ मध्ये तलाठी सेवा भरती राबविण्यात आली. अंतिम निवड यादी मध्ये नाम सदृष्याशाचा फायदा घेत अनुसुचीत जमातीच्या प्रवर्गातून काही गैर आदिवासी उमेदवार लाभ घेतल्याचे दिसून येत आहे.
   
तरी सर्व पात्र उमेदवाराच्या जात वैध्यता प्रमाणपत्राची चौकशी करण्यात यावी. व मूळ आदिवासी उमेदवारास न्याय द्यावा, अशी मागणी आदिवासी टायगर सेनेचे अ‍ॅड. संतोष कुळमेथे विदर्भ अध्यक्ष, अ‍ॅड. जितेश कुळमेथे विदर्भ महासचिव, प्रा. हितेश मडावी जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर, माजी सैनिक ड्रेफूल आत्राम जिल्हा उपाध्यक्ष चंद्रपूर ह्यांनी जिल्हाधिकारी ह्यांना निवेदनातून मागणी करण्यात आली.

ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा येथे जागतिक सिकलसेल दिवस उत्साहात साजरा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 
   
वरोरा : दिनांक १९ जून २०२४ ला उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे जागतिक सिकलसेल दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी व्यासपीठवर डॉ.प्रफुल खूजे वैद्यकीय अधीक्षक, वंदना बरडे अधीसेवीका व अनिता ठाकरे प्रयोगशाळा तज्ञ उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
 
 "प्रगती से जगी आशा, सिकलसेल केअर को वैश्विक रुप से एडवांस बनाया जाए" विश्व सिकल सेल जागरूक दिवस २०२४ Hope Through Progress Advancing Sickle Cell Care Globally ही थीम आहे. श्री सतीश येडे आरोग्य सहाय्यक अधीक्षक यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकातून त्यांनी या कार्यक्रमाची संकल्पना समजून सांगितली. वंदना बरडे अधीसेवीका यांनी जागतिक विश्व सिकलसेल दिवस आजारांबाबत उपाययोजना, काळजी, आहारविहार, जिवन शैली, व्यायाम प्राणायाम मेडिटेशन, याविषयी मार्गदर्शन केले. 

आहारामध्ये रक्तवाढ करणार्या पदार्थाचा वापर करणे,पाणी भरपूर पिणे, सकारात्मक विचार करून आजाराबाबतची काळ्जी घेणें.आहे ते आयुष्य चांगल्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करणे.तसेच जे सिकलसेल आजारानै पाॉझिटीव्ह आहे त्यांनी मुलाबाळांना जन्म न देता एखादे मुलं दत्तक घ्यावे कारण त्या अनाथ मुलांना आई-वडील मिळेल व तुम्हाला या आजाराचे ग्रस्त मुलं मिळणार नाही,कारणं तुमचं स्वतांच मुलं हेही या आजाराने ग्रासलेल राहू शकतं. म्हणून माणुसकी या नात्याने व पुढिल गांभीर्य लक्षात घेता हे उत्तम काम आपण करुन एक आदर्श निर्माण करू शकतो. आणि आनंदी जीवन जगू शकतो. 

डाॅ.खूजे वैद्यकीय अधीक्षक यांनी या रोगांचे लक्षण, कारणं, औषधोपचार,चाचणी याविषयी मार्गदर्शन केले. लग्न करतांना कुंडली बघण्यापेक्षा सीकलसेल तपासणी दोन्ही व्यक्तीने करणे जरुरीचे आहे.या विषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन सोनाली राईसपाईले व आभारप्रदर्शन पुनम धांडे यांनी केले. वंदना बरडे अधीसेवीका यांनी एकाच घरातील ४ व्यक्ती सिकलसेल ग्रस्त असलेल्यांची मुलाखत घेतलीं. सर्वांना हा आजार कसा झाला,कधी झाला,काय काय करतात,जिवन कसं घालवतात,या विषयी कौन्सिलिंग केले.व त्यांना चांगल्या आरोग्यदायी जिवनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन केले,कारण त्यांनी या गंभीर रोगांवर मात करून आरोग्यदायी जिवनशैलीत जिवन आनंदाने जगत आहे. आणि दुसऱ्यांना प्रेरणा देता येईल असा प्रचार व प्रसार करण्यासाठी आवाहन केले आहे. 

या कार्यक्रमासाठी वंदना बरडे अधीसेवीका,पूनम धांडे, प्रियंका दांडेकर, कुंदा मडावी, व्रुशाली दहेकर यांनी परिश्रम घेतले. सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत उत्साहात विश्व सिकल सेल दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व रुग्ण नातेवाईक व उपस्थितांना माहीति पत्रक देवून जनजागृती प्रचार व प्रसार करण्यात आला.  

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता वसतीगृहासाठी अर्ज आमंत्रित

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा अंतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता प्रकल्पांतर्गत मुला, मुलींचे वसतीगृह कार्यरत असून ईच्छूक विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात आले आहे.

प्रकल्पांतर्गत मुलींचे ९ व मुलांचे १० असे एकुन १९ वसतीगृह कार्यरत असून या शैक्षणिक सत्राकरीता आदिवासी मुला, मुलींचे वसतीगृहात प्रवेशाकरीता ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्विकारण्यात येणार आहे. पांढरकवडा प्रकल्पातील जिल्हास्तरावरील कनिष्ठ महाविद्यालयीन अभ्यासक्रमाकरीता आणि तालुकास्तरीय वसतीगृहामध्ये इयत्ता ८ वी ते कनिष्ठ महाविद्यालयीन अभ्यासक्रमाकरीता जुन्या, नवीन विद्यार्थ्यांनी दि.२७ जुन पर्यंत https://swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. प्रवेशाची प्रक्रिया गुणवत्ता तथा नियमानुसार करण्यात येईल वसतीगृहात रिक्त जागेच्या अधिन राहुन प्रवेश देण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करतांना विहित मुदतीत आवश्यक मुळ कागदपत्रे अपलोड करावेत. संकेतस्थळावर आपला युजर आयडी आणि पासवर्ड तयार करून ऑनलाईन अर्ज New हा पर्याय निवडून भरावा. अर्जासोबत विद्यार्थ्यांनी शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका, अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र, सन २०२३-२४ चा पालकाचा उत्पन्नाचा दाखला, महाविद्यालयात, विद्यालयात प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र, आधारकार्ड, शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे प्रमाणपत्र, पासपोर्ट फोटो, बँक पासबुक छायांकित प्रत, इयता १० वी ची गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला इत्यादी प्रमाणपत्र अर्जासोबत ऑनलाईन अपलोड करुन सदर अर्जाची हार्ड कॉपी संबंधित वसतीगृहाच्या गृहपालांकडे सादर करावी.

वसतीगृहातील जुन्या विद्यार्थ्यांना सुद्धा ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे. जुन्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज Renew हा पर्याय निवडून अर्ज भरावा, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा यांनी कळविले आहे.