मृतकाच्या वारसाला स्टेट बँकेकडून दोन लाखाचा धनादेश प्रदान

सह्याद्री चौफेर| ऑनलाईन

मारेगाव : भारतीय स्टेट बँक मारेगाव अंतर्गत स्टेट बँक ग्राहक सेवा केंद्र (मन कम्प्युटर) चे संचालक सचिन उमाकांत फरकाडे यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजनेचा लाभ स्टेट बँक ऑफ इंडिया मारेगाव येथील शाखा व्यवस्थापक वैशाली रंगारी, कर्मचारी सिम गोरखेडे, सीएसपी संचालक सचिन फरकाडे यांच्या उपस्थितीत मृत महिलेचे नॉमिनी दीपक आनंद ताकसांडे याला 2 लाख रुपयेचा धनादेश देण्यात आला. 

जानेवारी महिन्यात मंदा आनंद ताकसांडे यांचा कॅन्सरने मृत्यू झाला होता. मात्र, त्याआधी त्यांचा स्टेट बँक ग्राहक सेवा केंद्र (मन कम्प्युटर) मधून त्यांनी प्रधानमंत्री जीवन ज्योति बिमा (436) काढलेला होता, त्या विम्याचा लाभ म्हणून 02/04/2025 ला मृतक महिलेचा मुलगा दीपक ताकसांडे याला दोन लाखाचा धनादेश प्रदान करण्यात आला आहे. 

या योजनेचा लाभ सर्व लोकांनी घ्यावा,असे स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापक वैशाली रंगारी यांनी यावेळी म्हटलेले आहे. 

सुवर्ण महोत्सवी डिस्ट्रिक्ट गव्हर्नरांच्या उपस्थितत नवीन सदस्यांचा समावेश

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल, वणी ला ५० वर्ष पूर्ण झाले, या सुवर्ण महोत्सवी येथील लायन्स क्लब वणी ला डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पीएमजेएफ लायन डॉ. रिपल राणे (डिस्ट्रिक्ट 3234 एच 1) यांनी अधिकारीक भेट दिली व नवीन सदस्यांचा समावेश व शपथविधी कार्यक्रम पार पडला. 
        
दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. राणे, माजी आमदार तथा वणी लायन्स ट्रस्ट चे अध्यक्ष लायन संजीवरेड्डी बोदकुरवार, क्लबचे अध्यक्ष लायन राजाभाऊ पाथ्रडकर, सचिव लायन किशन चौधरी मंचावर उपस्थित होते.
     
यावेळी नवीन सदस्य सर्वश्री प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे,प्रा. डॉ. अभिजित अणे, डॉ. विजय राठोड,सौरभ बरडिया, डॉ. हिमांशू लाल,हर्ष खुंगर,यश श्रीवास्तव, संजीवरेड्डी चिंतलवार,भिकमचंद गोयनका व अ‍ॅड.ओंकार आर.देशपांडे यांना डॉ. रिपल राणे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. या प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना त्यांनी लायन्स इंटरनॅशनलच्या सेवा कार्याची माहिती देऊन, लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल वणी ला ५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल, सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या. या शैक्षणिक उपक्रमाची दखल घेऊन लायन्स इंटरनॅशनल द्वारा 'बेस्ट एज्युकेशनल ॲक्टिव्हिटी अवॉर्ड' देऊन सन्मानित केल्याबद्दल त्यांनी लायन्स क्लब व सदस्यांचे अभिनंदन केले व पीन प्रदान केली. लायन्स क्लब वणी च्या उत्कृष्ट कार्याबद्दल डिस्ट्रिक्ट गव्हर्नर यांनी राजाभाऊ पाथ्रडकर यांना गोल्ड मेडल देऊन तसेच लायन संजीवरेड्डी बोदकुरवार यांना एम जे एफ या करीता सन्मानीत करण्यात आले.
         
या वेळी लायन संजीवरेड्डी बोदकुरवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.तसेच संस्थापक सदस्य लायन प्रमोद देशमुख व लायन दत्तात्रय चकोर यांच्या हस्ते डॉ. राणे यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच 'बेस्ट लायन इन द रिजन व बेस्ट प्रेसिडेंट अवार्ड' मिळाल्या बद्दल लायन राजाभाऊ पाथ्रडकर यांना वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने अध्यक्ष संजीवरेड्डी बोदकुरवार व उपाध्यक्ष बलदेव खुंगर यांचे हस्ते शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक लायन राजाभाऊ पाथ्रडकर यांनी केले तर ध्वज वंदनेचे वाचन लायन महेंद्र श्रीवास्तव यांनी केले.पाहुण्यांचा परिचय पल्लवी जेनेकर यांनी तर, सूत्रसंचालन पोर्णिमा खिरटकर यांनी केले, लायन किशन चौधरी यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला लायन्स क्लब चे पदाधिकारी व सदस्य सुधिर दामले,चंद्रकांत जोबनपुत्रा,नरेंद्र बरडिया, रमेश बोहरा, डॉ. के आर लाल, शांतीलाल पांडे, पुरुषोत्तम खोब्रागडे, तुषार नगरवाला, ललीता बोदकुरवार, सुनिता खुंगर, मंजिरी दामले, निर्मला पांडे, विणा खोब्रागडे तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

अल्पवयीन बहिणी च्या लग्नाचे छायाचित्र मावस भावाच्या मोबाईल वर

सह्याद्री चौफेर| ऑनलाईन

 मारेगाव : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन लग्न केल्याची घटना मारेगाव शहरात घडली. मुलगी अल्पवयीन असल्यामुळे मुलीच्या भावाने पोलिसात आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली असून आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.       
29 मार्च ला सकाळी भाऊ उठल्यावर बहीण घरी दिसून आली नाही. म्हणून भावाने तिची घरी तसेच सभोवताल सगळीकडे चौकशी केली असता ती कुठेही दिसून आली नाही. तसेच नातेवाईकांना बहिणीबद्दल संपर्क साधून विचारले असता ती नातेवाईकांकडे सुद्धा मिळून आली नाही. 
बहिण कोठेच आढळून न आल्याने शेवटी भावाने मावशीच्या मुलाला फोन केला असता मावस भावाने सांगितले की ती माझ्याकडे नाही परंतु तिच्या लग्नाचे फोटो मात्र माझ्या मोबाईलवर कोणीतरी पाठवलेले आहे. मुलीचे फोटो बघताच मुलीच्या भावाच्या लक्षात आले की हा आपला चुलत मेहुना कृष्णा हनुमंतू कोशट्टीवार (वय अंदाजे 22 वर्ष), राहणार मांडवी, तालुका किनवट, जिल्हा नांदेड हा असून यानेच आपल्या बहिणीला फूस पळवून नेले आहे,असे त्याच्या लक्षात आले.
बहिण अल्पवयीन 17 वर्षे 6 महिन्याची असल्यामुळे तिला पळवून नेणाऱ्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा,अशा प्रकारची तक्रार भावाने मारेगाव पोलीस ठाण्यात केलेली आहे. घटनेचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे

वर्धमान फाउंडेशन तर्फे पाणपोईचे उद्घाटन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : उन्हाळा सुरू झाला की जीवाची लाही लाही होतं. त्याकरिता जीवाची तहान भागवण्यासाठी थंड पाण्याची नितांत आवशकता असते. हिच सामाजिक बाब लक्षात घेत वर्धमान फाउंडेशन च्या वतीने विविध ठिकाणी "पाणपोई" उभारण्यात आली आहे. 
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या जवळ पाणपोई सुरू करण्यात आली असून वर्धमान फाउंडेशनचे अध्यक्ष विजय चोरडिया यांच्या हस्ते या पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.   
यावेळी राजू खिवंसरा, अनिल चिंडालिया, महावीर कटारिया, सुरेंद्र डुंगुरवार, नितीन मुथा, आशिष सिसोदिया, संजय बोथरा, संदीप बोथरा, अजित मुनोत, राजेश बोथरा, निलेश लोढा, रवि रिंगोले, रोशन कटारिया, व मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजू धावंजेवार, पत्रकार परशुराम पोटे, महादेव दोडके, सागर मुने सह शहरातील अनेक प्रतिष्टीत नागरिक उपस्थित होते.

वेस्टर्न कोलफिल्ड कर्मचारी सहकारी पतसंस्थेत १ कोटी २७ लाखांचा अपहार; अध्यक्षांसह चार जणांवर गुन्हा दाखल

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : वणी पोलिसांनी वेस्टर्न कोलफिल्ड कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. राजूर कॉलरी येथे १ कोटी २७ लाख ९ हजार ८०१ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी तालुका लेखा परीक्षक अभय वसंतराव निकोडे (वय ४३) यांनी वणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिलीप जानबा टेंबूर्डे (अध्यक्ष), श्री. रमेश मोलीराम कनोजीया (सचिव), संजय अर्जुन शेटीया (लिपीक) आणि मदन कृष्णाजी अंडूस्कर (तत्कालीन लिपीक) यांनी संगनमत करून १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत हा अपहार केला.

आरोपींनी संस्थेच्या सीसी कर्ज खात्यातील रक्कमा परस्पर विड्रॉल केल्या. संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव यांना आर्थिक व्यवहार करण्याचे अधिकार होते. त्यांनी अधिकाराचा गैरवापर करून बनावट चेकच्या साहाय्याने वेळोवेळी रकमा काढल्या आणि त्या रकमा कॅशबुकला जमा न करता अपहार केला. या अपहारातून संस्थेचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून आरोपींनी स्वतःला आर्थिक लाभ करून घेतला, असे तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम 406, 409, 420, 467, 468, 471, 34, 120 (ब) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपास पोलीस निरीक्षक वणी गोपाल उंबरकर करीत आहेत.