मोहदा ग्रामपंचायत तर्फे अंगणवाडयांना गॅस कनेक्शन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : गावाच्या विकसासाठी सैदव शासन दरबारी झटत असलेले उमदा उपसरपंच सचिन रासेकर यांच्या पुढाकारातून सरपंच सौ.वर्षां राजूरकर व ग्रामसेवक यांच्या मदतीने गावातील अंगणवाडयांना गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले.
यावेळी आशा सेविका अक्षरा कास्तकार, कविता वनकर, व अंगणवाडी सेविका सौ.मीरा मडावी, रेश्मा वनकर, गीता नरांजे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. 

शासनाकडून विद्यार्थ्यांना मिळत असलेला पोषण आहार शिजविण्यासाठी अंगणवाडी सेविकांना इंधनाची मोठी समस्या भासत होती. त्यामुळे अन्न शिजवण्यासाठी गॅस कनेक्शनची अत्यंत आवश्यकता असल्याची बाब ही प्रामुख्याने मोहदा ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री. रासेकर यांनी लक्षात घेऊन सामान्य निधीतून तशी तरतूद करून अंगणवाडी सेविकांची आग्रही मागणी पूर्ण करत येथील तीनही अंगणवाड्यांना गॅस कनेक्शन ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले आहे.
उपसरपंच सचिन रासेकर यांनी पुढाकार घेत सरपंच सचिव व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्याशी चर्चा करून गॅस कनेक्शन या अत्यावश्यक बाबीची दखल घेत गॅस उपलब्ध करून दिल्याबद्दल अंगणवाडी सेविका,अंगणवाडी मदतनीस, पालक वर्ग व ग्रामस्थ यांचेकडून मोहदा ग्रामपंचायत च्या केलेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

नव्याने बांधलेला पुल गेला पुराच्या पाण्याने वाहून

सह्याद्री चौफेर | विनोद माहुरे

राळेगाव : तालुक्यातील खैरी येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुल पुराच्या पाण्याने वाहून गेला. त्यामुळे अंत्य संस्कार व त्या मार्गाने जाणाऱ्या शेतकरी बांधवाना मोठी अडचण निर्माण झाली आहे.

नव्याने बांधण्यात आलेला पुल अवघ्या पंधरा दिवसांत नाल्यावरील पुलाच्या दोन्ही बाजुने मोठमोठे खड्डे पडले असुन शेवटी स्मशानभूमिकडे प्रेतयात्रेला तसेच त्या मार्गाने ये-जा करणाऱ्यासाठी शेतकऱ्यांना शेवटी नाल्याच्या पाण्यातुनच जावे लागत आहे.

परिणामी पुलाचे काम हे नित्कृष्ट दर्जाचे झाल्यामुळे अवघ्या पंधरा दिवसात पुलाच्या दोन्ही बाजुच्या भागात मोठमोठे खड्डे पडले असुन नागरिकांना जाण्यायेण्यास अडचण निर्माण होत आहे, असे बोलल्या जातं. विशेष म्हणजे पावसाळ्यात स्मशानभूमी व त्या मार्गावरील शेतकऱ्यांचा मार्ग सुकर होण्याकरिता हा पुल आमदार फंडातून बांधण्यात आला होता. 

वणीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची निशुल्क नोंदणी सुरू


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : वणी विधानसभेचे कर्तव्यदक्ष, विकासपुरुष आमदार मा.संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या संकल्पनेतुन मुख्यमंत्री "माझी लाडकी बहिण" योजनेचे नोंदणी फॉर्म निशुल्क भरुन देण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात उद्या दिनांक 8 जुलै पासून सुरू होत आहे.

या योजनेचे फॉर्म निःशुल्क पणे बसस्टॉप समोर, टिळक चौक, दिपक चौपाटी, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान जवळ, इंगोले मेडिकल जवळ, राम शेवाळकर परिसर या ठिकाणी भरून देण्यात येणार आहे. 
       
यासाठी पुढील प्रमाणे कागदपत्र आवश्यक आहेत. अधिवास प्रमाणपत्र किंवा 15 वर्षापुर्वीचे रेशन कार्ड/ मतदार ओळखपत्र / शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / जन्म दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र (2.50 लाख उत्पन्न मयदिपर्यंतेचे) किंवा पिवळे / केशरी रेशन कार्ड , परराज्यातील जन्म झालेली महिला असल्यास किंवा महाराष्ट्रातील पुरुषासोबत विवाह झाला असल्यास 1) पतीचा जन्म दाखला, 2) शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र 3) अधिवास प्रमाणपत्र आवश्यक आहे. यासोबत बँक खात्याच्या पासबूकची पहिल्या पानाची छायांकीत पत्र, आधार कार्ड, पासपोर्ट फोटो आवश्यक आहे. 
          
वणी विधानसभा क्षेत्रातील सर्व पात्र महिला भगिनींनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्याकरिता वरील ठिकाणी आपला फॉर्म निःशुल्क भरून घ्यावा, असे आव्हान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले आहे.

यंदाच्या खरिप हंगामात पेरणी केलेल्या पिकांच्या नोंदी घ्या, अन्यथा गाव तिथं आंदोलन करू - भाई जगदीश इंगळे

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मरेगाव : दलीत आदिवासी भूमिहीन बेघर ओबीसी गरीब मराठा तथा सातबारा नावावर नसलेल्या लोकांच्या कब्जात असलेल्या महसूल व वन विभागाच्या पडीक जमिनी शेती प्रयोजनसाठी अतिक्रमण करून सन २०२४ च्या खरिप हंगामात पेरणी केलेली आहे. शासनाच्या प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे, परंतु प्रशासन पिक विमा भरून घेण्यास तयार नाही, पटवारी पंचनामे करण्यासाठी टाळाटाळ करतात. त्यामुळे हजारो शेतकऱ्याने पेरलेल्या पिकांच्या नोंदी पासून वंचित राहावे लागत असल्यामुळे बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे नेते भाई जगदीश कुमार इंगळे यांच्या प्रमुख मार्गद्शनाखाली मारेगांव येथे बैठक आयोजित करून महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार मंडळ निरीक्षक कर्तव्य आणि कामे नियम १९७० मधील नियम १७ प्रमाणे आंदोलनात्मक भूमिका घेऊन पाठपुरावा करण्याचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला. तसेच वरूड येथील वनजमीन धारक मोरेश्वर गेडाम, देवराव वाटगुरे यानी वन जमिनीवर शेती साठी अतिक्रमण केले होते.परंतु वन विभाग यांनी जमीन पेरणी करिता मज्जाव केला आहे. त्यामुळे वन जमीनधारक यांच्या कुटुंबावर संकट आले आहे, असे सांगितले. तसेच कोलगाव येथील अनुसूचीत जमाती पैकी कोलाम समाजाच्या लोकांनी वन जमिनीवर शेती साठी अतिक्रमण केले आहे. त्यांना अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी वन हक्काची मान्यता अधिनियम २००६ नियम २००८ व सुधारित नियम २०१२ सामूहिक वन हक्क उपवसंरक्षक पांढरकवडा, जिल्हा अधिकारी यवतमाळ, प्रकल्प अधिकारी पांढरकवडा यांच्या स्वाक्षरने प्रमाणपत्र देण्यात आली. परंतु वनपरिक्षेत्र अधिकारी मारेगाव यानी जमिनी ताब्यात घेऊन वहीती जमिनी निष्कासित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यावर उपाय योजना करण्यात येईल,असे आश्वासन बैठकीत भाई जगदीश कुमार इंगळे यांनी दिले. प्रामुख्याने हि बैठक सन २०२४ च्या खरिप हंगाम संरक्षण बाबत घेण्यात आली असल्याचे भाई जगदीश कुमार इंगळे यांनी प्रसिध्दी पत्रकातून कळविले. यावेळी मानवी हक्क सुरक्षा दलाच्या प्रदेश अध्यक्ष अशोक तिडके सहित पांडुरंग टेकाम, वासुदेव रामपूरे, सुरेश पिंपळशेंडे, परसराम धूर्वे, रामदास पेंदोर, नंदकिशोर सिडाम, ज्ञानेश्वर लोडे, विलास गाताडे, गुलाब सिडाम, विलास बोबडे, छत्रगुण धुर्वे सहित मोरेश्वर गेडाम, देवराव वाटगुरे उपस्थित होते.

रेल्वेच्या धडकेत युवक ठार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : वणीलगत असलेल्या निर्गुडा नदी पुला जवळ रेल्वे च्या धडकेत एका वीस वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आदित्य रवी दुर्गे (रा.दामले फैल) असे मृतकाचे नाव आहे.या दुःखद घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. 

6 जुलै ला रात्री 10 वा.च्या दरम्यान, तेलंगणा एक्सप्रेस च्या धडकेत आदित्य दुर्गे जागीच ठार झाला. ही घटना शहरालगत निर्गुडा नदीच्या पुलाजवळ रेल्वे ट्रॅक वर घडली. परंतु शहरात काल पाऊस सुरू असताना एवढ्या रात्री? हा युवक तिथे गेला कशासाठी? व रेल्वेखाली आला कसा हे मात्र, कळू शकले नाही, आदित्य च्या अशा निधनाने त्याच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सदर घटना वणी पोलिसांना कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालय येथे पाठवला. पुढील तपास वणी पोलीस करित आहे.