तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या ईसमाचा मृत्यू


सह्याद्री चौफेर | विनोद माहुरे

राळेगाव : तालुक्यातील डुक्करपोड येथील गुलाब माधव आत्राम व त्याची पत्नी छामीबाई गुलाब आत्राम हे दांपत्य जंगलात तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेले असता गुलाब आत्राम (वय 62) हा तेदुपत्ता तोडत असतांना छाती दुखत आहे म्हणुन झाडावरून खाली उतरून पाणी पिले असता त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती वडकी पोलिस स्टेशनला मिळताच ठाणेदार प्रशांत जाधव  हे आपल्या चमू सह तातडीने घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे पाठविण्यात आले. 
प्राप्त माहितीनुसार मृतक गुलाब आत्राम हा इसम पोटाची खळगी भरण्यासाठी तेंदुपत्ता तोंडुन कशीबशी आपल्या कुटुंबाचा उदारनिर्वाह करीत होता. आज दिनांक 7 मे 2024 रोज मंगळवारला सकाळी सहा वाजता तो आणि त्याची पत्नी तेंदुपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेला असता अचानक त्याच्या छातीत दुखू लागल्याने तो झाडावरून खाली उतरून पाणी पिल्याबरोबर त्याचा जागीच मृत्यू झाला. गुलाब आत्राम हे परीवारातील कर्ता-धर्ता असल्याने कुटुंबाचे उदरनिर्वाह करायचे कसे असा प्रश्न आत्राम परिवाराला पडला असून संबंधित वनविभागाने मृतकाच्या परीवाराला आर्थिक मदत देऊन सहकार्य करावे अशी परीसरातील नागरिकांची मागणी होतांना दिसत आहे. घटनेचा पुढील तपास बिट जमादार रमेश मेश्राम हे करित आहे.

अंतिम युद्ध - सागर जाधव

अंतिम युद्ध 

संपूर्ण जग युद्धानं ग्रासलेलं आहे. राज्याराज्यांत, देशादेशांत युद्धं सुरूच आहेत. परंतु यातही सर्वात भयंकर युद्ध म्हणजे आंतरिक युद्ध. जे स्वतःचंच स्वतःशीच सुरू राहतं. हे युद्ध स्वतःला जिवंत ठेवण्यासाठीच आपण निरंतर लढत असतो. नसानसांमधून धुमारे फुटतात. अश्रूचा थेंबही न गमावता दाहक शरीरावर आणि आत्म्यावर वर्षाव करण्यासाठी आपली धडपड सुरू असते. कुठेतरी पराभूत झालेला किंवा हरवलेला आत्मा आपल्याला परत मिळवायचा असतो. स्वतःचा स्वाभिमान जाेपासयाचा असतो. स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असतं. हे युद्ध आहे, स्वतःला स्वतः सांभाळण्याचं. सर्वात जास्त प्रेम असणाराच विश्वासाघात करतो. वारंवार तो विश्वास तुटतो. तरीही तो विश्वास जपण्यासाठी हे युद्ध करावंच लागतं. आपण अनेक नाती स्वतःच्या जीवापेक्षा जास्त जपतो. ही नाती जपण्यासाठीदेखील युद्धच करावं लागतं. आपण सगळ्यांशी चांगले वागतो. अनेकांना मदतीचा हात देतो. तरीदेखील आपल्याला टाळलं जातं. वाईट वागणूक दिली जाते. हे कष्ट सहन करण्याची ताकद मिळवण्याकरिता पुन्हा युद्ध आहेच. एखाद्या घटनेनं शरीराला थरकाप सुटतो. अश्रूंची बरसात व्हायला लागते. मनावरचा ताबा सुटतो. यावर सगळं नियंत्रण मिळवण्याकरिता पुन्हा हे युद्ध करणं अपरिहार्य आहे. मनात सारखे विचार घोंगावत असतात. स्वतःचा श्वास सांभाळणं जड जातं. ही मनाची घुसमट असह्य होत जाते. ती थांबवण्यासाठी पुन्हा हे युद्ध सुरूच राहणार. काही आठवणींमध्ये आपण रमतो. त्यात जगतो. त्या सांभाळून ठेवणंदेखील तेवढंच महत्त्वाचं आहे. कधी कधी पराभवालादेखील तोंड द्यावं लागतं. आपल्याला डावललं जातंय याची जाणीव होते. काही जणांकडून अनपेक्षित वागणूक मिळते. आपण काही व्यक्तींना आयुष्यात खूप जास्त महत्त्व देतो. तीच व्यक्ती कधी कधी आपला घात करते. हे सगळं सांभाळण्यासाठी पुन्हा हे युद्ध आपण बरेचदा तत्वानं जगतो. परंतु कधीकधी एखाद्या व्यक्तीसाठी तत्त्वांसोबत आपण तडजोडही करतो. ही तत्वं जोपासण्यासाठी पुन्हा हे युद्ध. कोणतीच परिस्थिती आहे तशी टिकून राहत नाही. चांगल्या परिस्थितीत संयम बाळगता आला पाहिजे. कठीण परिस्थिती बदलेल ही आशा टिकून राहिली पाहिजे. काही काही गोष्टी असह्य होतात. त्या सहन करण्याची शक्ती मिळण्याकरता पुन्हा हे युद्ध. आपण कुणावरती जिवापाड प्रेम करतो. परंतु ते प्रेम अखेरचा श्वास मोजत असल्याचं दिसतं. अशावेळी स्वतःलाच धीर देण्याकरता पुन्हा हे युद्ध. आपण संपूर्ण जगाचा शोध घेतो. फक्त आपण आपला स्वतःचा शोध घेत नाही. स्वतःच स्वतःला शोधण्यासाठी पुन्हा एक युद्ध. आपण जशी अनेकांकडून अपेक्षा ठेवतो, तशी आपल्याकडूनही अनेकजण अपेक्षा ठेवतात. इतरांचाही प्रेमळ विश्वास तुटू नये याची काळजी घेत पुढे वाटचाल करावी. आपल्या बाजूनं प्रेम जिवंत ठेवण्यासाठी आणि जपण्यासाठी हे युद्ध.

-सागर जाधव
अध्यक्ष स्माईल फाउंडेशन
वॉटर सप्लाय कार्यालय, वणी, जि. यवतमाळ 
7038204209

"काय करावे" व "काय करु नये" याबाबत जिल्हा प्रशासनाच्या वतीने मार्गदर्शक सुचना

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : जिल्हयात मागील ४ ते ५ दिवसापासुन तापमानात वाढ होत असुन उष्णतेमुळे मानवी आरोग्यावर परिणाम होऊ नये याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन उष्णतेच्या काळात उष्माघात होऊ नये याकरीता "काय करावे" व "काय करु नये" याबाबत मार्गदर्शक सुचना यवतमाळ जिल्हा प्रशासनाच्या वतीने निर्गमीत करण्यात येत आहे.

हे करावे :-

१. तिव्र उन्हात मुख्यतः दुपारी १२.०० ते ३.०० च्या दरम्यान बाहेर पडणे टाळावे.
२. पुरेसे पाणी पित राहावे.
३. फक्त हलक्या रंगाचे सुती कपडयाचा वापर करावा.
४. घरा बाहेर पडतांना छत्री, टोपी, गॉगलचा वापर करावा.
५. मद्य, चहा, कॉफी व कार्बोनेटेड शितपेय पिण्याचे टाळावे.
६. शिळे अन्न खाणे टाळावे.
७. उन्हात काम करत असतांना आपला चेहरा व डोके ओल्या कपडयाने झाकावे.
८. शक्यतो दुपारी १२ ते ३ या कालावधीमध्ये उष्ण वातावरणात श्रमाचे काम करणे टाळावे.
९. चक्कर येत असल्यास किंवा आजारी वाटल्यास त्वरीत डॉक्टरकडे जावे.
१०. भरपूर ओआरएस आणि लस्सी, ताक, लिंबूपाणी यांसारखी घरगुती शीतपेयांचे सेवन करावे.
११. प्राण्यांना सावलीत ठेऊन त्यांना भरपूर पाणी प्यायला द्यावे.

हे करु नये :-

१. दुपारी १२ ते ३ या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे.
२. गडद, घट्ट व जाड कपडे घालणे टाळावे.
३. बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरीक श्रमाची कामे टाळावीत.

उष्मघात झालेल्या व्यक्तींची काळजी घेण्यासाठी मार्गदर्शक सुचना.

१. उष्णतेच्या लाटेमुळे आजारी पडलेल्या व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी.
२. व्यक्तीला एखाद्या थंड जागी ठेवावे.
३. शरीराचे तापमान खाली आणण्याचे प्रयत्न करावे
४. उष्मघात झाल्यास ओल्या कपडयाने बाधीत व्यक्तींचे अंग थंड पाण्याने पुसुन काढावे.
५. व्यक्तीला ओआरएस व लस्सी, ताक, लिंबूपाणी इत्यादी घरगुती शितपेय द्यावे.
६. बाधित व्यक्तीला ताबडतोब जवळच्या आरोग्य केन्द्रात घेऊन जावे. बाधित व्यक्तीला त्वरीत हॉस्पीटल मध्ये दाखल करुन उपचार सुरु करणे गरजेचे आहे. कारण उष्माघात घातक ठरु शकते.

सरपंच सह असंख्य महिला पुरुष धडकले पोलीस ठाण्यावर

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव :  मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या खंडणी गट-ग्रामपंचात मेंढणी येथील अवैध दारु विक्री बंद करण्यात यावी अशी मागणी मेंढणी-जानकाई पोड - खंडणी या गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत आज (ता.6) मे रोजी मारेगाव पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले. 

मेंढणी गावाच्या रस्त्यालगत शेतात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या दारू विक्री होत असून ही दारू विक्री बंद करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन नुकतेच जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांना, पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ, मारेगाव यांच्या मार्फत देण्यात आले आहे. सदर गावातील अवैध दारु व्यवसाय बंद न झाल्यास या विरोधात कायदेशीर उपोषणास बसण्यात येणार असल्याचा इशारा सरपंच सह तीनही गावातील उपस्थित लोकांकडून देण्यात आला आहे. 

यावेळी निवेदन देताना मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मेंढणी-जानकाई पोड-खंडणी येथील असंख्य महिला पुरुष हजर होते. 

ई-केवायसी केल्यानंतरच मदत थेट बँक खात्यात जमा होणार -जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांची माहिती

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : शेतकरी बंधूंनो आपण जर ई-पंचनामा केवायसी केलेली नसेल तर आपणाला ही ई-पंचनामा केवायसी करावी लागणार आहे, त्यानंतरच तुम्हाला मदत थेट बँक खात्यात तुमच्या जमा होईल अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. 

अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेती पिकांचे नुकसानीचे मदत बाधित शेतकरी यांना तत्काळ उपलब्ध व्हावी याकरिता शासन स्तरावरून ई-पंचनामा पोर्टल तयार करण्यात आले असून जिल्ह्यात मार्च, एप्रिल, मे 2023 अवकाळी पाऊस, मान्सून ऑक्टोंबर 2021, सप्टेंबर ऑक्टोबर 2022, जुन- जुलै 2023, अवकाळी पाऊस जानेवारी 2024 मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेती पिकांची नुकसानीची मदत बाधित शेतकरी यांना तत्काळ मिळावी याकरिता ई-पंचनामा पोर्टलवर तालुकास्तरावरून आतापर्यंत 2,75,739 बाधित शेतकरी यांची यादी अपलोड करण्यात आली असून जिल्हास्तरावरून नोंदी मान्य करण्यात आलेल्या आहेत. 

आतापर्यंत शासन स्तरावरून DBT पद्धतीद्वारे 3,24,749 बाधित शेतकरी यांचे खात्यात 229,58, 19,961/- इतका निधी जमा करण्यात आलेला असून बाधीत शेतकरी यांचे आधार बंद असणे, ई-केवायसी न करणे, आधार बँक खात्याशी लिंक नसणे, बाधित शेतकरी यांनी आधार प्रमाणीकरण/ बाधित शेतकरी यांनी E-KYC केली नसल्यामुळे अजूनही 47,675 बाधीत शेतकरी यांचे खात्यात मदत निधी शासन स्तरावरून वितरित करता आलेला नाही करिता बाधित शेतकारी यांनी तालुका कार्यालयातून/मंडळ अधिकारी तलाठी/कोतवाल यांचे कडून VK Number प्राप्त करून जवळच्या सेतू केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण/E- KYC करावे, त्यानंतरच शासनस्तरावरून मदत थेट त्यांचे बँक खात्यात जमा करण्यात येईल असे आवाहन यवतमाळ जिल्हा प्रशासनाचे वतीने करण्यात येत आहे.