अंतिम युद्ध
संपूर्ण जग युद्धानं ग्रासलेलं आहे. राज्याराज्यांत, देशादेशांत युद्धं सुरूच आहेत. परंतु यातही सर्वात भयंकर युद्ध म्हणजे आंतरिक युद्ध. जे स्वतःचंच स्वतःशीच सुरू राहतं. हे युद्ध स्वतःला जिवंत ठेवण्यासाठीच आपण निरंतर लढत असतो. नसानसांमधून धुमारे फुटतात. अश्रूचा थेंबही न गमावता दाहक शरीरावर आणि आत्म्यावर वर्षाव करण्यासाठी आपली धडपड सुरू असते. कुठेतरी पराभूत झालेला किंवा हरवलेला आत्मा आपल्याला परत मिळवायचा असतो. स्वतःचा स्वाभिमान जाेपासयाचा असतो. स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असतं. हे युद्ध आहे, स्वतःला स्वतः सांभाळण्याचं. सर्वात जास्त प्रेम असणाराच विश्वासाघात करतो. वारंवार तो विश्वास तुटतो. तरीही तो विश्वास जपण्यासाठी हे युद्ध करावंच लागतं. आपण अनेक नाती स्वतःच्या जीवापेक्षा जास्त जपतो. ही नाती जपण्यासाठीदेखील युद्धच करावं लागतं. आपण सगळ्यांशी चांगले वागतो. अनेकांना मदतीचा हात देतो. तरीदेखील आपल्याला टाळलं जातं. वाईट वागणूक दिली जाते. हे कष्ट सहन करण्याची ताकद मिळवण्याकरिता पुन्हा युद्ध आहेच. एखाद्या घटनेनं शरीराला थरकाप सुटतो. अश्रूंची बरसात व्हायला लागते. मनावरचा ताबा सुटतो. यावर सगळं नियंत्रण मिळवण्याकरिता पुन्हा हे युद्ध करणं अपरिहार्य आहे. मनात सारखे विचार घोंगावत असतात. स्वतःचा श्वास सांभाळणं जड जातं. ही मनाची घुसमट असह्य होत जाते. ती थांबवण्यासाठी पुन्हा हे युद्ध सुरूच राहणार. काही आठवणींमध्ये आपण रमतो. त्यात जगतो. त्या सांभाळून ठेवणंदेखील तेवढंच महत्त्वाचं आहे. कधी कधी पराभवालादेखील तोंड द्यावं लागतं. आपल्याला डावललं जातंय याची जाणीव होते. काही जणांकडून अनपेक्षित वागणूक मिळते. आपण काही व्यक्तींना आयुष्यात खूप जास्त महत्त्व देतो. तीच व्यक्ती कधी कधी आपला घात करते. हे सगळं सांभाळण्यासाठी पुन्हा हे युद्ध आपण बरेचदा तत्वानं जगतो. परंतु कधीकधी एखाद्या व्यक्तीसाठी तत्त्वांसोबत आपण तडजोडही करतो. ही तत्वं जोपासण्यासाठी पुन्हा हे युद्ध. कोणतीच परिस्थिती आहे तशी टिकून राहत नाही. चांगल्या परिस्थितीत संयम बाळगता आला पाहिजे. कठीण परिस्थिती बदलेल ही आशा टिकून राहिली पाहिजे. काही काही गोष्टी असह्य होतात. त्या सहन करण्याची शक्ती मिळण्याकरता पुन्हा हे युद्ध. आपण कुणावरती जिवापाड प्रेम करतो. परंतु ते प्रेम अखेरचा श्वास मोजत असल्याचं दिसतं. अशावेळी स्वतःलाच धीर देण्याकरता पुन्हा हे युद्ध. आपण संपूर्ण जगाचा शोध घेतो. फक्त आपण आपला स्वतःचा शोध घेत नाही. स्वतःच स्वतःला शोधण्यासाठी पुन्हा एक युद्ध. आपण जशी अनेकांकडून अपेक्षा ठेवतो, तशी आपल्याकडूनही अनेकजण अपेक्षा ठेवतात. इतरांचाही प्रेमळ विश्वास तुटू नये याची काळजी घेत पुढे वाटचाल करावी. आपल्या बाजूनं प्रेम जिवंत ठेवण्यासाठी आणि जपण्यासाठी हे युद्ध.
-सागर जाधव
अध्यक्ष स्माईल फाउंडेशन
वॉटर सप्लाय कार्यालय, वणी, जि. यवतमाळ
7038204209
अंतिम युद्ध - सागर जाधव
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 07, 2024
Rating: