सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : आधी घरावर अवैध ताबा करणे नंतर घर खाली करण्यासाठी पैशाची मागणी करणाऱ्या समिर रंगरेजवर कठोर कारवाईची मागणी वणी शहरातील प्रतिष्ठित व्यावसायिक व भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य विजय पारसमल चोरडिया यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली असून त्याबाबतची लेखी तक्रार उपविभागीय पोलिस अधिकारी वणी तसेच वणी पोलिस स्टेशनमध्ये दिली आहे.
शहरालगतच्या गणेशपूर ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक ८९ मधील अकृषक भूखंड क्र. ४२१, क्षेत्रफळ १४२.५० चौ. मीटर व त्यावर असलेली मालमत्ता त्यांनी प्रेमकुमार मधुकर धगढी यांच्याकडून योग्य मोबदला देऊन नोंदणीकृत खरेदी खत क्र. २३१६/२०२४ अन्वये २ मे २०२४ रोजी खरेदी केली आहे. ही मालमत्ता चोरडिया यांच्या ताब्यात होती; मात्र या फ्लॅट मध्ये कोणीही वास्तव्यास नव्हते तो फ्लॅट खाली असल्याचे पाहून समीर रंगरेज यांनी त्यांची कुठलीही परवानगी न घेता मालमत्तेला (फ्लॅट) लावून असलेले कुलूप अनधिकृतपणे तोडून मालमत्तेवर बेकायदेशीररीत्या कब्जा केल्याचा आरोप चोरडिया यांनी तक्रारीतून केला आहे. समीर रंगरेज याला याबाबत विचारणा केली व मालमत्तेवर त्याने केलेला कब्जा मोकळा करण्याबाबत विनंती केली; परंतु समीर रंगरेज याने विजय चोरडिया यांना अश्लील शिवीगाळ करून मी घराचा कब्जा सोडणार नाही, पोलिस माझे काही करू शकत नाहीत, माझ्यावर राजकीय लोकांचा वरदहस्त आहे, अशी अरेरावीची भाषा केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर महिलांना घेऊन काही साथीदारांसह चोरडिया यांच्या अंगावर लोखंडी रॉड व इतर शस्त्र घेऊन मारहाण करण्यासाठी आले होते,मात्र त्याचवेळी पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी सर्वांना पोलिस स्टेशनला आणले. आता आपल्याविरुद्ध तक्रार दाखल होणार असल्याचे पाहून समिर यांनी नरमाईची भुमिका घेतली आणि माफी मागून भविष्यात असे कृत्य न करण्याचे आश्वासन दिले व घराच्या चाव्या चोरडिया यांच्या ताब्यात दिल्या त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये समझोता झाला.
तक्रार मागे घेणार नाही, कठोर कारवाईची मागणी करणार - विजय चोरडिया
दिनांक १० ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना विजय चोरडिया यांनी सांगितले की, माझ्यासारख्या प्रतिष्ठीत व्यावसायिकाच्या घरावर जर गुंड प्रवृत्तीने ताबा होत असेल, तर सर्वसामान्य जनतेसोबत काय घडत असेल, याची कल्पना करावी, अशा गुंडप्रवृत्तीच्या लोकांना मी सोडणार नाही त्यांच्या विरोधात लेखी तक्रार केली असून कठोर कारवाईची मागणी केली आहे. कारण समीर रंगरेज याची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरूपाची असून, या अगोदरसुद्धा त्याने वणी शहरातील पंकज भंडारी यांच्या भंडारी फर्निचरवर बेकायदेशीरपणे कब्जा करण्याचा प्रयत्न केला होता. विशेष म्हणजे न्यायालयाला न जुमानता न्यायालयात प्रकरण सुरू असताना सुद्धा त्यांनी भंडारी फर्निचरवर बेकायदेशीरपणे कब्जा करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी समिर रंगरेजविरुद्ध वणी पोलिस ठाण्यात भादंवि ४५७, ३८०, ४२७, ३९७, ५०४, ५०६, ३४ तसेच आर्म अॅक्टच्या कलम ४/२५ व मुंबई पोलिस अॅक्टच्या कलम १३५ अन्वये गुन्हे दाखल असल्याची माहिती विजय चोरडिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.