वणी ते कुंभा बस सेवा पूर्ववत करा - मनसे महिला सेनेची मागणी


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : राळेगाव व मारेगाव तसेच सावंगी ते खैरी या मार्गावरील बससेवा पूर्ववत करण्यासाठी मारेगाव मनसे महिला सेना तालुकाध्यक्षा उज्वला चंदनखेडे यांच्या नेतृत्वात मनसे महिला पदाधिकाऱ्यांनी आगार प्रमुखांची भेट घेऊन बससेवा सुरळीत करण्याची मागणी केली.

वणी मतदारसंघातील मारेगाव तालुक्यातील प्रवाशांना राळेगाव व मोरगाव या शहराकडे जाण्यासाठी पूर्वी मानव विकास ची एसटी बस सुरू होती. मात्र मध्यंतरी काही कारणास्तव ही बस फेरी बंद करण्यात आली त्यामुळे प्रवाशांना प्रवासास अत्यंत अडचण निर्माण झाली. त्याचबरोबर सावंगी ते खैरी ही शाळकरी मुलांसाठी असलेली बस फेरी देखील बंद करण्यात आली असून सध्या आता १० आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांचे तास चालू आहेत त्यांना देखील प्रवासासाठी हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. 

ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत हा बस फेरी चा सुरू असलेल्या सावळ्या गोंधळामुळे नागरिकांची आणि विद्यार्थ्यांची तारांबळ झाली आहे. त्यामुळे या दोन्ही मार्गावरील बस सेवा पूर्ववत करण्यासाठी मारेगाव मनसे महिला सेना तालुकाध्यक्षा उज्वला चंदनखेडे यांच्या नेतृत्वात मनसे महिला पदाधिकाऱ्यांनी आगार प्रमुखांची भेट घेऊन लवकर बससेवा सुरळीत करण्याची मागणी केली. या मागणीला आगार प्रमुखांनी प्रतिसाद देत लवकरच या बससेवा पुन्हा सुरळीत करून नागरिकांची होणारी गैरसोय टाळणार असल्याचे आश्वासित केले.

अखेर बहुचर्चित T-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघ जाहीर..!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

BCCIने 1 जूनपासून सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषक 2024 साठी आपल्या 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. त्याचबरोबर चार राखीव खेळाडूंची निवड केली आहे. तसेच रोहित शर्मा पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा सांभाळताना दिसणार आहे.

यावेळी वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने मेगा इव्हेंटचे आयोजन केले जाणार आहे, ज्यामध्ये 20 संघ सहभागी होणार आहेत.

अशी असेल यंदाची टीम इंडिया : 
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

राखीव खेळाडू : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान. 

दरम्यान, ऋषभ पंतचं अपघातानंतर संघात पुनरागमन होणार असून संजू सॅमसन आणि शिवम दुबे या खेळाडूंची पहिल्यादाच विश्वचषकासाठी निवड झाली तर अनुभवी kl राहुल संघात जागा मिळाली नसल्याचे दिसून आले आहे

 

प्रेम उठाव - कवी - नवनाथ रणखांबे

"प्रेम उठाव

       साहित्य क्षेत्रात अनेक नवनवीन,कसदार अन उल्लेखनीय लिखाण करणारे साहित्यिक उदयास येत आहेत. यातच ज्यांच्या 'जीवन संघर्ष ' या पहिल्याच कवितासंग्रहाने अख्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशात अल्पकालावधीत प्रचंड मोठी लोकप्रियता अन अनेक पुरस्कारही मिळवले असे कवी नवनाथ रणखांबे यांचा दुसरा कविता संग्रह म्हणजे "प्रेम उठाव" होय.या कवितासंग्रहातुन कवी फुले, शाहू, आंबेडकरवादी विचार सदविवेकबुद्धीने अन शीताफिने प्रचार प्रसार करत असल्याचे प्रामुख्याने जाणवते. हा कवितासंग्रह चराचरात समता पेरत विद्रोही विचारांचा उठाव करणारा आहे.
  
कवी नवनाथ रणखांबे यांच्या "जीवन संघर्ष " या पुस्तकाने इंडिया टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये ऐतिहासिक विक्रमी नोंदणी, रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड, महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड, ओएमजी बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये विक्रम नोंदणी झाली.या साहित्य क्षेत्रातील त्यांच्या या प्रवासाने कवी प्रेरित होऊन लिहू पाहतो.हा कवितासंग्रह कवीने प्रेम उठाव करत जगणाऱ्या प्रेम पाखरांना समर्पित केला आहे.आंबेडकरवादी विचारशैली अन विद्रोही बाणा, उत्कट प्रेम,समता प्रस्थापित करण्याचा अट्टाहास, आई वडीलाप्रति स्नेह अन गरिबीची जाणीव अशा विविध वैशिष्ट्यांनी " प्रेम उठाव " हा कवितासंग्रह ओतप्रोत भरलेला आहे.
     
उठावकार यांचे शब्दच षंड न होता उठाव करतात तेंव्हा ते उठाव या कवितेत म्हणतात...
 प्रकाशदात्या माणसांच्या अंधाराला संपवून टाक 
सृष्टीमध्ये चराचरात समतेचे तत्व आण 
अन इडा पीडा जाऊ दे, 
समतेचे युग येऊ दे 
       यातून ते समाजातील विषम भेदभावांना अन माणुसकीला काळिमा फासणाऱ्या कुप्रथांना मोडीत काढत समतेचा विचार पेरताना दिसून येतात.
खंबीर लढताना माय 
तुला मी पाहिलय माय 
तुला मी पाहिलय माय 
दुःखाला कापताना माय 
       आभाळ होताना माय या कवितेत ते आपल्या आई विषयी च्या भावना, प्रेम अन आत्मीयता अगदी सहजतेने अभिव्यक्त होताना दिसतात.
      निळे निशाण या गझलेतुन ते म्हणतात..
भीमराव थोर आम्हा सूर्यासमान आहे 
त्यांच्यामुळे आली जगण्यास शान आहे 
ठोकून आज छाती नवनाथ हेच सांगे 
कायम निळेच त्याने धरले निशाण आहे 
        बुद्ध, शाहू, फुले, आंबेडकर यांना गुरु माणून ते समता, बंधुता, माणुसकी सर्वोतोपरी ठेवत आपल्या या गझलेत म्हणतात की आमच्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे सूर्यासमान आहेत आणि त्यांच्यामुळेच आमच्या जगण्यास शान आलेली आहे. छाती ठोकून शांतीचे प्रतीक असलेले निळे निशाण कायम हाती घेत निळ्याची महती विषद करताना दिसून येतात.
अबोल्याचा उठाव 
सांग कुठं पर्यंत 
हृदयाची धडकन 
बंद पडे पर्यंत 
     प्रेमात विरह, मिलन, अबोला हा होतच असतो पन अबोल्याचाही उठाव कवीने येथे केला आहे.
  दुःखाचा समुद्र 
डोळ्यात दाटल्यावर 
टपटपतात टपोरे थेंब 
कविता होऊन कागदावर 
      कवीने वास्तविकतेला थारा देत अगदी प्रगल्भतेने ते दुःखाला डोळ्यात साठवून त्यांच्या टपटपनाऱ्या थेंबातून कविता कागदावर उमटवत आहेत हे सिद्ध करतो.
वैशाखाचा जोर 
माझ्या जीवाला घोर,
भेटण्याची चोरी 
पळून जाऊ पोरी 
     घोर या कवितेतून प्रेमाला समाजात नसलेली मान्यता नाकारत ते प्रेमाला मिळविण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात हे सांगून ते प्रेमाचा खरा उठाव करताना दिसतात.
 "प्रेम उठाव" या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ हे अगदी साजेशे अन उठवाचे प्रतिनिधित्व करणारे आहे.यात डॉ. प्रेरणा उबाळे, डॉ.गंगाधर मेश्राम, प्रा. योगेश्री कोकरे, प्रतीक्षा प्रजापती थोरात यांची समीक्षात्मक प्रस्तावना लाभलेली आहे. मलप्रष्टावर प्रा. डॉ. विठ्ठल शिंदे यांनी मजबूत पाठराखण केलेली आहे.तसेच कवी नवनाथ रणखांबे यांचे व्यक्तिमत्व आणि कार्य साहित्यिक भटू हरचंद जगदेव यांनी साकारले आहे.या कवितासंग्रहात प्रेम म्हणजे तुमचं आमचं सेम असतं हा आशय पूर्णतः मोडीत काढत प्रत्येकाचं प्रेम वेगळं असतं हे दाखवून देतात. गरिबीने अगदी अगतुक झालेल्यांच्या नशिबात आलेलं प्रेम,अस्वस्थ मनाच्या आत फुलवून ठेवत प्रेम भावनांचा उत्कटतेने व्यक्त करतात.प्रेम, वीरह, अबोला, मन,अस्वस्थ, झोका या कविता समाजभान जपत काळजाला भिडतात.
       
गझल, चारोळी , कविता यातून ते वाचकांना प्रेरक विचार देत सामाजिक क्रांतीच नवं दालन उघडं करताना पहावयास मिळतात. प्रेम उठाव हा कवितासंग्रह प्रेमाने ओतप्रोत भरलेला आहे. तसेच यात प्रयोगशिलता,विद्रोह,स्त्रीयांच्या दुःखाला वाचा फोडणे, सामाजिक जाणीव, भावुकपणा, प्रेमाचा झालेला उद्रेक अन प्रेमाचे अनेक भाव अत्यंत नाजूकतेने कवितेतुन उमटवले आहेत.हा कवितासंग्रह नक्कीच वाचनीय आहे.वाचकांच्या पसंतीस पडेल यात शंका नाही. त्यांच्या पुढील लिखाणास खूप खूप शुभेच्छा..

कवितासंग्रह - प्रेम उठाव 
कवी - नवनाथ रणखांबे 
परीक्षक - विजय वाठोरे (साहिल)
हिमायतनगर नांदेड

नामांतर चळवळीचा संघर्षशील योद्धा आणि कार्यकर्ते-नेते घडविणारं विद्यापीठ शांत झालं


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 
 
मारेगाव : विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा वारसा समर्थपणे चालविणारे पॅन्थर गंगाधरजी गाडे यांचे काल निधन झाले. पॅन्थर गंगाधरजी गाडे साहेब यांच्या जाण्याने फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीत कधी न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

साहेबांच्या आक्रमकतेमुळेच येथील बहुजन, शोषित, वंचित पिढी त्यांची पाळं मूळ घट्ट होत गेली, बहरली, सुखाची फळ चाखत आहे. साहेबांनी केलेलं कार्य, त्यांनी केलेला संघर्ष हा कोणीही नाकारू शकत नाही. विदर्भातून औरंगाबादेत आलेल्या या पॅन्थरने आयुष्यभर समाजाला न्याय देण्याचं काम केलं. आपल्यातील नेतृत्व कौशल्याने समाजातील अनेक तरुणांना घडवले. 
समाजातील अनेक नेते साहेबांच्या छत्रछायेतच वाढले,मोठे झाले. समाजाच्या प्रत्येक प्रश्नावर लढण्यासाठी हा पॅन्थर सदैव पुढे असायचा. राजकीय,सामाजिक आणि शैक्षणिक चळवळ उभारून आयुष्यभर केलेल्या या कार्यामुळे सदैव समाज मनात घर करून राहील.  
 
काल दिनांक ०४ मे २०२४ रोजी सकाळी ०४:३० वाजता गंगाधरजी गाडे यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव रविवार दिनांक ५ मे रोजी दुपारी १२ ते ४ या वेळेत उस्मानपुरा,पीर बाजार येथील त्यांच्या नागसेन विद्यालयाच्या प्रांगणात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शिक्षण संस्थेच्या परिसरातच रविवारी ४ वाजता अंत्यविधी केला जाणार आहे.
नामांतराच्या या लढावू योद्ध्यास अखेरचा क्रांतिकारी जयभिम

 

जैताई मंदिरात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : महाराष्ट्र दिन, दरवर्षी १ मे रोजी साजरा केला जातो, हा महाराष्ट्रीयन लोकांच्या हृदयात एक विशेष स्थान आहे कारण तो पश्चिम भारतीय राज्याची निर्मिती दर्शवितो. भाषिक आधारावर मुंबई पुनर्रचना कायदा लागू झाल्यानंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र अस्तित्वात आला. हा दिवस महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला चिन्हांकित करतो आणि तेथील लोकांमधील एकता आणि आत्मनिर्णयाच्या विजयाचे प्रतीक आहे. महाराष्ट्राच्या मराठी भाषिक राज्याच्या निर्मितीच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.
याच अनुषंगाने सागर झेप बहुद्देशीय संस्थेतर्फे १ मे महाराष्ट्र दिन रोजी वणी येथील जैताई मंदिरात "मराठी माणसं मराठी अस्मितेला" जपण्यासाठी महाराष्ट्र दिन सांस्कृतिक क्षेत्राच्या माध्यमातून नाट्य व नृत्याद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला. 
या कार्यक्रमाला माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते राजू तुरणकर, पोलीस सहाय्यक निरीक्षक प्रसिद्ध वारली चित्रकार शेखर वांढरे, जेष्ठ नाट्य कलावंत अशोक काका सोनटक्के उपस्थित होते. यावेळी सागर मुने दिग्दर्शित "पुस्तकाच्या पानातून" हे बाल नाट्य सादर केले तसेच प्रियंका कोटनाके यांनी मराठी अस्मितेला जपणारे, राज्यातील निवडक गीतांवर व महाराष्ट्र गीतावर उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शीत करून सर्व उपस्थित रसिकांचे मने जिंकली. 
या प्रसंगी ६ ते १५ वयोगटातील एकूण ३३ मुलामुलींनी अद्भुत नृत्य सादर केले होते. कार्यक्रमाला प्रसिद्ध व्यावसायिक तथा सामाजिक कार्यकर्ते, व भाजपाचे प्रदेश सदस्य विजय चोरडिया, मुन्ना महाराज यांच्या हस्ते सहभागी कलावंतांना सन्मानित करण्यात आले. 

संस्थेद्वारा आयोजित कार्यक्रमाला वणी विधानसभेचे कर्तव्यदक्ष आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व जैताई देवस्थानचे सहकार्य लाभले हे विशेष...!