प्रेम उठाव - कवी - नवनाथ रणखांबे

"प्रेम उठाव

       साहित्य क्षेत्रात अनेक नवनवीन,कसदार अन उल्लेखनीय लिखाण करणारे साहित्यिक उदयास येत आहेत. यातच ज्यांच्या 'जीवन संघर्ष ' या पहिल्याच कवितासंग्रहाने अख्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशात अल्पकालावधीत प्रचंड मोठी लोकप्रियता अन अनेक पुरस्कारही मिळवले असे कवी नवनाथ रणखांबे यांचा दुसरा कविता संग्रह म्हणजे "प्रेम उठाव" होय.या कवितासंग्रहातुन कवी फुले, शाहू, आंबेडकरवादी विचार सदविवेकबुद्धीने अन शीताफिने प्रचार प्रसार करत असल्याचे प्रामुख्याने जाणवते. हा कवितासंग्रह चराचरात समता पेरत विद्रोही विचारांचा उठाव करणारा आहे.
  
कवी नवनाथ रणखांबे यांच्या "जीवन संघर्ष " या पुस्तकाने इंडिया टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये ऐतिहासिक विक्रमी नोंदणी, रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड, महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड, ओएमजी बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये विक्रम नोंदणी झाली.या साहित्य क्षेत्रातील त्यांच्या या प्रवासाने कवी प्रेरित होऊन लिहू पाहतो.हा कवितासंग्रह कवीने प्रेम उठाव करत जगणाऱ्या प्रेम पाखरांना समर्पित केला आहे.आंबेडकरवादी विचारशैली अन विद्रोही बाणा, उत्कट प्रेम,समता प्रस्थापित करण्याचा अट्टाहास, आई वडीलाप्रति स्नेह अन गरिबीची जाणीव अशा विविध वैशिष्ट्यांनी " प्रेम उठाव " हा कवितासंग्रह ओतप्रोत भरलेला आहे.
     
उठावकार यांचे शब्दच षंड न होता उठाव करतात तेंव्हा ते उठाव या कवितेत म्हणतात...
 प्रकाशदात्या माणसांच्या अंधाराला संपवून टाक 
सृष्टीमध्ये चराचरात समतेचे तत्व आण 
अन इडा पीडा जाऊ दे, 
समतेचे युग येऊ दे 
       यातून ते समाजातील विषम भेदभावांना अन माणुसकीला काळिमा फासणाऱ्या कुप्रथांना मोडीत काढत समतेचा विचार पेरताना दिसून येतात.
खंबीर लढताना माय 
तुला मी पाहिलय माय 
तुला मी पाहिलय माय 
दुःखाला कापताना माय 
       आभाळ होताना माय या कवितेत ते आपल्या आई विषयी च्या भावना, प्रेम अन आत्मीयता अगदी सहजतेने अभिव्यक्त होताना दिसतात.
      निळे निशाण या गझलेतुन ते म्हणतात..
भीमराव थोर आम्हा सूर्यासमान आहे 
त्यांच्यामुळे आली जगण्यास शान आहे 
ठोकून आज छाती नवनाथ हेच सांगे 
कायम निळेच त्याने धरले निशाण आहे 
        बुद्ध, शाहू, फुले, आंबेडकर यांना गुरु माणून ते समता, बंधुता, माणुसकी सर्वोतोपरी ठेवत आपल्या या गझलेत म्हणतात की आमच्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे सूर्यासमान आहेत आणि त्यांच्यामुळेच आमच्या जगण्यास शान आलेली आहे. छाती ठोकून शांतीचे प्रतीक असलेले निळे निशाण कायम हाती घेत निळ्याची महती विषद करताना दिसून येतात.
अबोल्याचा उठाव 
सांग कुठं पर्यंत 
हृदयाची धडकन 
बंद पडे पर्यंत 
     प्रेमात विरह, मिलन, अबोला हा होतच असतो पन अबोल्याचाही उठाव कवीने येथे केला आहे.
  दुःखाचा समुद्र 
डोळ्यात दाटल्यावर 
टपटपतात टपोरे थेंब 
कविता होऊन कागदावर 
      कवीने वास्तविकतेला थारा देत अगदी प्रगल्भतेने ते दुःखाला डोळ्यात साठवून त्यांच्या टपटपनाऱ्या थेंबातून कविता कागदावर उमटवत आहेत हे सिद्ध करतो.
वैशाखाचा जोर 
माझ्या जीवाला घोर,
भेटण्याची चोरी 
पळून जाऊ पोरी 
     घोर या कवितेतून प्रेमाला समाजात नसलेली मान्यता नाकारत ते प्रेमाला मिळविण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात हे सांगून ते प्रेमाचा खरा उठाव करताना दिसतात.
 "प्रेम उठाव" या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ हे अगदी साजेशे अन उठवाचे प्रतिनिधित्व करणारे आहे.यात डॉ. प्रेरणा उबाळे, डॉ.गंगाधर मेश्राम, प्रा. योगेश्री कोकरे, प्रतीक्षा प्रजापती थोरात यांची समीक्षात्मक प्रस्तावना लाभलेली आहे. मलप्रष्टावर प्रा. डॉ. विठ्ठल शिंदे यांनी मजबूत पाठराखण केलेली आहे.तसेच कवी नवनाथ रणखांबे यांचे व्यक्तिमत्व आणि कार्य साहित्यिक भटू हरचंद जगदेव यांनी साकारले आहे.या कवितासंग्रहात प्रेम म्हणजे तुमचं आमचं सेम असतं हा आशय पूर्णतः मोडीत काढत प्रत्येकाचं प्रेम वेगळं असतं हे दाखवून देतात. गरिबीने अगदी अगतुक झालेल्यांच्या नशिबात आलेलं प्रेम,अस्वस्थ मनाच्या आत फुलवून ठेवत प्रेम भावनांचा उत्कटतेने व्यक्त करतात.प्रेम, वीरह, अबोला, मन,अस्वस्थ, झोका या कविता समाजभान जपत काळजाला भिडतात.
       
गझल, चारोळी , कविता यातून ते वाचकांना प्रेरक विचार देत सामाजिक क्रांतीच नवं दालन उघडं करताना पहावयास मिळतात. प्रेम उठाव हा कवितासंग्रह प्रेमाने ओतप्रोत भरलेला आहे. तसेच यात प्रयोगशिलता,विद्रोह,स्त्रीयांच्या दुःखाला वाचा फोडणे, सामाजिक जाणीव, भावुकपणा, प्रेमाचा झालेला उद्रेक अन प्रेमाचे अनेक भाव अत्यंत नाजूकतेने कवितेतुन उमटवले आहेत.हा कवितासंग्रह नक्कीच वाचनीय आहे.वाचकांच्या पसंतीस पडेल यात शंका नाही. त्यांच्या पुढील लिखाणास खूप खूप शुभेच्छा..

कवितासंग्रह - प्रेम उठाव 
कवी - नवनाथ रणखांबे 
परीक्षक - विजय वाठोरे (साहिल)
हिमायतनगर नांदेड
प्रेम उठाव - कवी - नवनाथ रणखांबे प्रेम उठाव - कवी - नवनाथ रणखांबे Reviewed by सह्याद्री चौफेर on May 05, 2024 Rating: 5
Powered by Blogger.