सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : वणी नगर परिषदेच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून सोनचिरैय्या शहर उपजीविका केंद्र नुकतेच शिवाजी उद्यान जवळील वॉटर सप्लाय येथिल बगीच्यात स्थापन करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून वणी शहारातील गरीब लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावणे व त्यांना उपजीविकेची शाश्वत संधी उपलब्ध करून देण्यासाठी शहरात दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान राबविण्यात येत आहे. शहरातील गरीब उत्पादक व ग्राहक यांची सांगड घालणे व शहरी गरिबांना माहिती आणि व्यवसायासाठी आवश्यक ते सहाय्य करणे या उद्देशाने सोनचिरैय्या शहर उपजीविका केंद्राची स्थापना करण्यात आली.
नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन गाडे आणि उपमुख्याधिकारी जयंत सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात स्थापना करण्यात आलेल्या या शहर उपजीविका केंद्राची पाहणी मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केली त्यावेळी
मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजु धावंजेवार यांनी बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची पाहणी करून असे दर्जेदार उत्पादन केल्याबद्दल महिलांचे अभिनंदन केले.
या प्रसंगी घेण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमात मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजु धावंजेवार यांनी उपस्थित महिला जन समुदायाला संबोधित करतांना म्हणाले की, महिला ह्या कुटुंबाचा मुख्य धागा आहेत. महिलांची चिकाटी आणि काम करण्याची सचोटी, जिद्द आणि कष्ट करण्याची क्षमता ही फार मोठी असते असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. सोनचिरैय्या शहर उपजीविका केंद्राला शुभेच्छा देवून त्यांनी महिलांच्या या संघटनेचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तत्पूर्वी उपमुख्याधिकारी जयंत सोनटक्के यांनी आपल्या प्रास्ताविकात सोनचिरैय्या शहर उपजीविका केंद्र स्थापनेच्या कार्यात आलेल्या शासकीय आणि प्रशासकीय अडचणींचा उहापोह केला. सर्व प्रकारच्या अडचणी त्यांची कशा दूर केल्या आणि या उपजीविका केंद्राची स्थापना कशी झाली, त्याचे उद्देश काय, भविष्यात केंद्राची वाटचाल कशी राहील इत्यादी विषयांवर यांनी आपले विचार प्रस्ताविकामधून मांडले. क्रांतीज्योती शहर स्तर संघाच्या अध्यक्षा वनिता खंडाळकर यांनी शहर स्तर संघाची वाटचाल आणि सोनचिरैय्या शहर उपजीविका केंद्राची स्थापना करतांना आलेली आव्हाने यावर आपले मनोगत व्यक्त केले. सोनचिरैय्या शहर उपजीविका केंद्राची पुढील वाटचाल कशी राहील यावर त्यांनी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर उप मुख्याधिकारी जयंत सोनटक्के, मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजु धावंजेवार, दैनिक हिंदुस्थान वृत्तपत्राचे प्रतिनिधी व मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्य कार्यकारिणी सदस्य परशुराम पोटे, बचत गटाचे अध्यक्ष अनुज मुकेवार, यांच्यासह संदिप बेसरकर, ज्ञानेश्वर बोनगीनवार, अमोल कुमरे, महादेव दोडके, संजय चिंचोलकर उपस्थित होते.
विभाग प्रमुख अॅड. पौर्णिमा शिरभाते यांच्या अथक परिश्रमातून उभारण्यात आलेल्या तसेच बचत गटाच्या माध्यमातून स्थापना करण्यात आलेल्या या सोनचिरैय्या शहर उपजीविका केंद्राची पाहिजे तशी माहिती लोकांपर्यंत पोहोचली नाही त्यामुळे या केंद्राची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध वृत्तपत्रे, न्यूज पोर्टल च्या माध्यमातून प्रयत्न कण्यात येईल असे आश्वासन परशुराम पोटे यांनी या प्रसंगी दिले.
शहर उपजीविका केंद्रात घेण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमाचे सूत्र संचालन विभाग प्रमुख अॅड. पौर्णिमा शिरभाते यांनी केले तर उत्तम हापसे, शहर अभियान व्यवस्थापक यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रांतीज्योती शहर स्तर संघाच्या अध्यक्षा वनिता खंडाळकर, सोनाली तिवारी, रुणाली मस्के, दुर्गा विरुळरकर, मनजित कौर, प्रिया मेश्राम,रमा नयनवार, वर्षा लाकडे, वंदना काकडे, शामली सहारे,शारदा दोरखंडे,तृप्ती माळीकर, किरण शिरनाथ, रंजना भांडारवार, छाया जांभूळकर, ममता मेंगावार व सर्व वस्ती स्तर संघ आणि शहर स्तर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.