बेंबळा प्रकल्प ठरताहेत पांढरा हत्ती,पंधरा वर्षापासून शेतकऱ्यांना बेंबळाच्या पाण्याची प्रतिक्षा


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : केगाव चिंचमंडळ शिवारातील शेकडो शेतकऱ्यांची भूमी संपादित करून या शिवारात कॅनल निर्माण केले. मात्र गेल्या पंधरा वर्षांपासून केगाव चिंचमंडळ शिवारात बेंबळाचे पाणी पोहचले नसल्याने सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
बेंबळा प्रकल्पाच्या माध्यमातून हरित क्रांती व्हावी, शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहचवून त्यांचा आर्थिक स्तर वाढावा या उद्देशाने प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली, परंतु मारेगाव तालुक्यासाठी बेंबळा प्रकल्प पांढरा हत्ती ठरत असल्याने शेतकऱ्यात बोलल्या जात आहे.

बेंबळा प्रकल्प सुरू करताना अनेक शेतकऱ्यांना आपलेही शेत शिवार हिरवेगार होईल असे वाटू लागले होते. त्यासाठी लागणारी तालुक्यातील केगाव चिंचमंडळ सह इतर शिवारातील हजारो हेक्टर शेतजमीन प्रशासनाने हस्तगत करून सुरू झालेला प्रकल्प आज वांझोटा ठरत आहे. बेबळाचे तालुक्यातील अनेक ठिकाणी अर्धवटच काम झाले आहे त्यामुळे कॅनल मध्ये मोठमोठे वृक्ष वाढल्याने कॅनल मातीने बुजत आहे. मार्डी पासून समोर जाणाऱ्या बेंबळा प्रकल्पाची कामे अद्यापही अपूर्ण असल्याने हिवरा, केगाव परिसरात बेंबळाचे पाणी पोचलेच नाही.यामुळे या परिसरातील शेतकरऱ्यात संताप व्यक्त केल्या जात आहे.
तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने खरीप पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. नदीकाठावरील शेतातील पिकाची तर तीनदा पेरणी करून पिके खरडून गेली. खरिपाची पिके गेल्याने रब्बी पिकाच्या माध्यमातून कशी तरी तडजोड करायची म्हणून रब्बीची लागवड केली, परंतु बेंबळा ने निराशा केली. या पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. बेंबळाचे पाणी मिळेल या आशेने मार्डी विभागातील अनेक शेतकऱ्यांनी रब्बी पिकाची लागवड केली परंतु मार्डी शिवारातील अनेक ठिकाणी कच्चे कॅनल बनवून ठेवलेल्या ठिकाणी आतापर्यंत पाणी पोहचलेच नाही. त्यामुळे हे कॅनल निकामी असल्याचे शेतकऱ्यांना भासू लागले आहे.
बेंबळा प्रकल्पाचा फायदा कुंभा, मार्डी विभागातील अनेक गावांना होणार आहेत. मात्र, बऱ्याच वर्षांपासून सुरू असलेले हे कॅनलचे काम संथगतीने सुरु आहे.

मारेगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्पाचे शेवटचे टोक असलेल्या हिवरा, केगाव कानडा, शिवणी, पार्डी या परिसरातील बेंबळा प्रकल्पाचे काम अद्यापही अपूर्णच असल्याची माहिती आहे. या भागातील शेतकऱ्यांना बेंबळाच्या पाण्याची प्रतीक्षा आहेत बेंबळाच्या या संथगतीच्या कामाविषयी शेतकऱ्यात संताप व्यक्त केला जात आहे.
बेबळाचे पाणी शेतापर्यंत येत नसल्याने शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही. गावाच्या शिवेपर्यंत थेट कॅनल आले आहे परंतु काम अर्धवट असल्याने शेतकरऱ्यांना सिंचनाचा कोणताही फायदा होत नाही. या उलट याच तालुक्यात काही ठिकाणी दोन वर्षा पूर्वी झालेल्या कॅनल, पटसऱ्या पर्यंत पाणी पोहचले आहे. बेंबळा प्रकल्पाचे काम अर्धवट असून ते त्वरित पूर्ण करून शेतकऱ्यांना पाणी द्यावे. अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे.

माझे केंगाव चिंचमंडळ शिवारात शेत असून माझा शेतापासून बेंबळा चे 2008 ते 2009 ला कॅनलचे कच्चे काम झाले. त्या दरम्यान, आम्हा शेतकऱ्यांना 2014 पर्यंत तुम्हाला पाणी मिळेल असे आश्वासन दिले होते. परंतु दहा पंधरा वर्ष लोटूनही आम्हा शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही. कॅनलचे पक्के काम लवकर होईल अशी अपेक्षा आहे.
-निलेश भेदुरकर चिंचमंडळ

राज्य नाट्य स्पर्धेसाठी प्रवेशिका सादर करण्यास दहा दिवसांची मुदतवाढ

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेतील प्रवेशिका सादर करण्यास दहा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे यासंदर्भात विनंती करणारे निवेदन हौशी नाट्य कलावंत संघटनेने दिले होते. या निवेदनाची तत्काळ दखल घेऊन मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक कार्य संचालनालयास कार्यवाहीचे निर्देश दिले.

हिंदी, संस्कृत, संगीत, बालनाट्य व दिव्यांग नाट्य या स्पर्धांसाठी प्रवेशिका सादर करण्याची अंतिम तारीख 6 नोव्हेंबर 2023 होती. मात्र काही संघटनांनी या प्रवेशिका सादर करण्यास मुदतवाढ द्यावी अशी मागणी मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्याकडे केली होती. या मागणीचा विचार करून मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दहा दिवसांची मुदतवाढ देण्यात येत आहे अशी घोषणा केल्याची माहिती, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी दिली.

राज्य नाट्य स्पर्धेतील हिंदी, संस्कृत, संगीत, दिव्यांग नाट्य, बालनाट्य या स्पर्धेत भाग घेण्यास इच्छुक असलेल्या संघांनी ऑनलाइन पद्धतीने 15 नोव्हेंबर पर्यंत अर्ज सादर करावेत असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.

धारदार शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या दोन तरुणांना वणी पोलिसांनी केली अटक

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : पोलीस स्टेशन च्या काही अंतरावर असलेल्या वन विभागाचे कार्यालयाजवळ दोन तरुण हातात धारधार शस्त्र घेऊन सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने पोलिस पथक घटनास्थळ गाठून त्या दोन तरुणांना अतिशय शिताफीने आज 6 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता सुमारास पकडून ताब्यात घेतले.

आरोपी शैलेश उर्फे शंकर साईनाथ बावणे (25) रा. चिंचोली ता. राजुरा जिल्हा. चंद्रपुर, तर बादल राजेश दुपारे (२५)  रा.कोढान्यवाडी, वणी असे दहशत निर्माण करणाऱ्याचे नाव आहे.

दरम्यान, आरोपी जवळून एक तलवार व एक सत्तुर तसेच एक मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किन्द्रे, पोलिस निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डि.बी.पथकाचे प्रमुख सपोनि माधव शिंदे, सफौ. सुदर्शन वानोळे, पंकज उंबरकर, विशाल गेडाम, मो. वसिम, गजानन कुडमेथे यांनी केली.

वणी शहरात गेल्या काही महिन्यापासून धारदार शस्त्र बाळगण्याचे प्रमाण तरुणांईत दिसून येत असून, अशा घटना दिवसेंदिवस ऐकण्यात वाचण्यात येत असल्यामुळे जणू काही शस्त्र बाळगुण दहशत निर्माण करण्याची स्पर्धा लागली की, काय? हा चिंतेचा विषय असल्याचे,असे नागरिकांतून चर्चील्या जात आहे. 

मारेगाव तालुक्यात 5 ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर, अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीचे सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यात अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले असून, प्रस्थापितांना हादरा सुद्धा बसलेला आहेत. काही ठिकाणी प्रस्थापितांना धक्का तर नवख्यांना संधी मिळाल्याचे दिसत आहे.

घोडदरा ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदी सुनंदा अशोक आत्राम या 394 मतदान घेऊन निवडून आल्या असून सोनी श्रीराम चांदेकर 224 यांचा त्यांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक एक मध्ये सर्वसाधारण मधुन आशिष बंडू कोहळे, सर्वसाधारण स्त्री शितल अमित परसूटकर विजयी झाले. प्रभाग क्रमांक तीन मध्ये प्रदीप विठ्ठल मेश्राम अनुसूचित जमाती आणि नलू मोरेश्वर धोबे सर्वसाधारण स्त्री हे विजयी झाले घोडदरा ग्रामपंचायत मध्ये तीन जागा ह्या बिनविरोध निवडून आल्या असून यात विमल भाऊराव उईके अनुसूचित जमाती स्त्री,प्रवीण सूर्यभान आत्राम अनुसूचित जमाती तर विमल भाऊराव उईके बिनविरोध निवडून आल्या.          
खडकी बुरांडा ग्रामपंचायत मध्ये सरपंच रंगूबाई दादाराव आत्राम ह्या 286 मतदान घेऊन निवडून आल्या तर त्यांचे विरोधी सविता पांडुरंग कुळमेथे यांना 244 मते मिळाली. तर प्रभाग क्रमांक एक मध्ये कार्तिक महादेव उईके अनुसूचित जमाती,रंगुबाई दादाराव आत्राम अनुसूचित जमाती स्त्री तर सर्वसाधारण स्त्री मधून नीलिमा अजाब काळे या निवडून आलेले आहे. प्रभाग क्रमांक दोन मधून शुभांगी गजानन आडे अनुसूचित जमाती स्त्री, मंगला संदीप हुसुकले सर्वसाधारण स्त्री तर प्रभाग क्रमांक तीन मधून कार्तिक महादेव उईके अनुसूचित जमाती,दत्ता सदाशिव तिखट सर्वसाधारण हे निवडून आलेले आहे.
                
गोंड बुरांडा ग्रामपंचायत मध्ये काट्याची लढत दिसून आली. यात लता शशिकांत उईके या 443 मतदान घेऊन सरपंच पदी आरूढ झाल्या तर प्रभाग क्रमांक एक मधून अमोल अधिकराव पेंदोरे अनुसूचित जमाती, गीता मंगल तोडासे, अनुसूचित जमाती महिला, मंगला अरुण शेंद्रे सर्वसाधारण स्त्री या निवडून आलेल्या आहेत. तर प्रभाग क्रमांक दोन मध्ये सुनील हरिश्चंद्र देऊळकर सर्वसाधारण मधून तर अनुसया भारत शेडमाके अनुसूचित जमाती महिला मधून निवडून आले. प्रभाग क्रमांक तीन मध्ये सुरज मंगल तोडासे अनुसूचित जमाती तर सुचिता चिंतामण पारखी सर्वसाधारण स्त्री मधून निवडून आलेले आहे.

म्हैसदोडका ग्रामपंचायत मध्येही अशीच काट्याची लढत पहावयास मिळाली सरपंच म्हणून ललिता मारुती तुराणकर या 408 मतदान घेऊन विजयी झाल्या तर प्रभाग क्रमांक एक मध्ये अय्या काशीराम आत्राम, अनुसूचित जमाती प्रेमिला रवींद्र टेकाम अनुसूचित जमाती महिला,सारिका नरेश तुराणकर सर्वसाधारण महिला निवडून आल्या.प्रभाग क्रमांक दोन मध्ये जीवन शंकर डाखरे सर्वसाधारण, निर्मला अय्या आत्राम अनुसूचित जमाती स्त्री मधून निवडून आले.तर प्रभाग क्रमांक तीन मधून विठ्ठल सुरेश टेकाम अनुसूचित जमाती, वैशाली देहराज अडबाले सर्वसाधारण स्त्री मधून निवडून आलेले आहे.
हटवांजरी ग्रामपंचायत मध्येही अजब गजब लढत पाहावयास मिळाली. एकूण सात जागेसाठी झालेल्या मतदानापैकी फक्त दोन ठिकाणी मतदान झालं. दोन जागा बिनविरोध निवडून आल्या तर तीन जागा अजूनही रिक्त आहेत.यात गणेश मारुती कुळमेथे प्रभाग क्रमांक एक अनुसूचित जमातीमधून निवडून आले प्रभाग क्रमांक तीन मधून निखिल पांडुरंग कालेकर सर्वसाधारण म्हणून निवडून आले तर अनुसूचित जमाती स्त्री सर्वसाधारण स्त्री आणि अनुसूचित जमाती स्त्री या तीन जागा रिक्त आहे. तर शारदा गजानन कालेकर आणि गणेश मारुती कुळमेथे हे अनुसूचित जमाती मधून बिनविरोध निवडून आलेले आहे.

शेतकरी प्रश्नावरून शिवसेना आक्रमक, उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडून आज मारेगावात चक्का जाम आंदोलन

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : गत काही वर्षापासून तालुक्यात अस्मानी व सुल्तानी संकटाचा कायम बळी पडत असलेल्या जगाच्या पोशिंद्यास सर्व स्तरावरून मदतीचा हात आज देण्याची नितांत गरज असताना शासन प्रशासन मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सतत दुर्लक्ष करत असल्याने शेतकरी आत्महत्येत कमालीचा तालुक्यात आलेख वाढत आहे. त्यामुळे सेना आक्रमक होत शेतकरी हिताच्या विविध मागण्या घेऊन आंदोलन, मोर्चा, उपोषण नेहमीच करित असते, आज सुद्धा शेतकरी प्रश्नावरून आक्रमक होत तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरेसेने कडून यवतमाळ-मारेगाव हायवे,करणवाडी फाट्यावर "चक्का जाम आंदोलन" करण्यात आले.
तालुक्यातील शेतकऱ्याच्या कापसाला प्रती क्विंटल 10000/- रू. हमी भाव जाहीर करावा, सोयाबिनला प्रती क्विंटल 7000/- रू. हमी भाव जाहीर करावा, नादुरुस्त, बिघाड व वारंवार वीज खंडित करणारे रोहित्र ताबडतोब दुरुस्त करून देण्यात यावे किंवा नवीन टाकावे, शेतकऱ्यांच्या शेतपंपाना दिवसा 8 तास वीजपुरवठा करण्यात यावा, अतिवृष्टी अनुदान तात्काळ देण्यात यावे, निराधारांना तात्काळ मानधन देण्यात यावे, केंद्र शासनाने केलेला आयात करार रद्द करावा, पिक विम्याची अग्रीम रक्कम 25 टक्के दिवाळीपूर्वी देण्यात यावे. या प्रमुख मागण्यांकरिता (ता.3 नोव्हें) रोजी शिवसेना (उबाठा) तालुका शाखेच्या वतीने असंख्य शिवसैनिकांच्या उपस्थितीत तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले होते. सदर मागण्या मान्य न झाल्यास 6 नोव्हेंबर रोजी मारेगावात चक्काजाम करू असा इशाराही सदर निवेदनातून यावेळी देण्यात आला होता.
दरम्यान ता. 3 नोव्हेंबर रोजी शेतकरांच्या विविध मागण्या घेऊन संबंधित विभागांना अल्टीमेटम देण्यात आल्यानंतर ही शासन प्रशासनाने दखल घेत नसल्याने आज सोमवारला करणवाडी फाट्यावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले, दरम्यान, यवतमाळ मार्गांवरील काही काळ वाहतूक कोलमडली होती. तहसीलचे अधिकारी, महावितरण चे अधिकारी आंदोलनस्थळी दाखल झाल्यावर व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा करूनच हे चक्का जाम आंदोलन निवळले. जर सद्यस्थितीत सुधारणा झाली नाही, तर शिवसैनिक आणखी तालुक्यातील शेतकऱ्यांना घेऊन परत तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू, असा गर्भीत ईशाराही देण्यात आला.

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख संजय आवारी व युवासेनाचे तालुका प्रमुख मयूर ठाकरे, नगराध्यक्ष डॉ. मनिष मस्की, उप तालुका प्रमुख राजू मोरे, ता. संघटक सुनील गेडाम, संचालक विजयभाऊ अवताडे, युवासेना शहर प्रमुख गणेश आसुटकर, जिवन काळे, पंकज बलकी, यांच्या सह शिवसेना (उबाठा) चे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तथा तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने या चक्का जाम आंदोलनात सहभागी झाले होते.