सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
वणी : एखादा देश असो किंवा त्या देशाची राज्यघटना असो याच्या निर्मितीला ऐतिहासिक पार्श्वभूमी असते. हे स्वप्न साध्य करण्यासाठी एक पिढी दुसऱ्या पिढीला या स्वप्नांचा वारसा देते तेव्हा स्वप्नांची पूर्तता होत असते असे विचार मुंबई येथील प्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक प्रा. डॉ. अविनाश कोल्हे यांनी मांडले. ते येथील नगर वाचनालयातर्फे आयोजित हेमंत व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी ( एक आकलन) या विषयावर गुंफताना बोलत होते.
या पुष्पाच्या अध्यक्षस्थानी वसंत जिनिंगचे अध्यक्ष आशिष खुलसंगे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून अर्बन क्रेडिट बँकेचे अध्यक्ष संजय खाडे हे होते. या कार्यक्रमाची सुरुवात वैष्णव जन तो या विजय गंधेवार यांनी गायलेल्या गीताने झाली. त्यानंतर वाचनालयाचे अध्यक्ष माधव सरपटवार यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला.
आपला विषय पुढे मांडताना डॉ. कोल्हे यांनी सन 1773 साली इंग्लंडच्या पार्लमेंटने भारतासाठी पहिल्यांदा रेग्युलर अक्ट हा कायदा बनविला तेव्हापासून भारताच्या राज्यघटनेच्या जडणघडणीची सुरुवात झाली होती. त्या नुसार भारतात गव्हर्नर जनरल हे पद निर्माण करण्यात आले. सन 1760 मध्ये इंडियन पिनल कोड म्हणजेच भारतीय दंड विधान लावण्यात आले. ते अजूनही सुरू आहे. सन 1818 साली पेशव्यांच्या अस्ता सोबत इंग्रजांची निरंकुश सत्ता सुरू झाली. एका कायद्यान्वये ईस्ट इंडिया कंपनीकडून सत्ता काढून घेऊन 1857 पासून इंग्लंडच्या राणीचा प्रत्यक्ष कारभार सुरू झाला. 1892 मध्ये प्रांत पातळीवर विधिमंडळाची स्थापना करण्यात आली. 1909 च्या कायद्यानुसार 60 भारतीयांना खासदार म्हणून नेमणूक करण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली. सन 1917 साली इंग्लंडच्या पंतप्रधानांनी भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली. अशा प्रकारे स्वातंत्र्य मिळण्याआधीच आपल्याला शासन व प्रशासन चालविण्याचे शिक्षण इंग्रजाकडून मिळाले. स्वातंत्र्यानंतर प्रत्यक्ष संविधान समिती तयार होऊन 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाच्या अथक परिश्रम घेतल्या नंतर संविधानाची निर्मिती झाली. इंग्रजांनी बनविलेल्या 200 ते 250 कायद्यपैकी 80 ते 90 टक्के कायदे त्याला भारतीय मुलामा चढवून अजूनही तसेच आहेत.
प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना संजय खाडे यांनी भारतीय राज्यघटना ही जगातील अतिशय सुंदर अशी राज्यघटना असून तिचे पालन करणे हे आपले कर्तव्य असल्याचे स्पष्ट केले. अध्यक्षीय भाषण करतांना आशिष खुलसंगे यांनी आता देशात लागू होणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमामध्ये भगवतगीतेचा व संविधान निर्मितीच्या प्रक्रियेचा समावेश करण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. हे व्याख्यान मंजिरी व सुधीर दामले यांनी स्व. निर्मला वामनराव वैद्य यांच्या स्मरणार्थ आयोजित केले होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगर वाचनालयाचे सचिव गजानन कासावार यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. अभिजित अणे यांनी मानले. या प्रसंगी वाचनालयाचे अनिल जयस्वाल, अर्जुन उरकुडे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे, राम मेंगावार यांनी परिश्रम घेतले.