चिमूर न.प. क्षेत्रात विविध समस्यांमुळे जनता त्रस्त - शहर काँग्रेस कमिटीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन


सह्याद्री न्यूज | विलास पिसे 

चिमूर : चिमूर ऐतिहासिक व क्रांतिकारी नगरीत नगर परिषदेच्या गलथान व दुर्लक्षित कारभारामुळे जनतेला दैनंदिन समस्येला ताेंड द्यावे लागत असल्याने याची दखल घेत जिप गट नेते डॉ. सतीश वारजूकर यांच्या मार्गदर्शनखाली शहर काँग्रेस कमेटीचे वतीने राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना चिमूर तहसीलदार यांच्या मार्फत एक निवेदन देण्यात आले. 

चिमूर शहरातील आठवडी बाजारची जागा नसल्याने रस्त्यावर बाजार होत असल्याने अपघात होण्याची शक्यता असून वाहतुकीची कोंडी होत आहे. तेव्हा आठवडी बाजाराची जागा उपलब्ध करून देण्यात यावी, शहरातील पिण्याच्या पाण्याकरिता पाईप लाईन खोदकाम सुरू असून जनतेला त्रास होत आहे याची व्यवस्था तात्काळ करून देण्यात यावी,नाल्या पूर्णतः तुडूंब भरल्या असून आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे तेव्हा दखल घेण्यात यावी,ग्राम पंचायत काळातील अंगणवाडी केंद्र नगर परिषदला हस्तांतरीत करण्यात याव्या,नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या योजनांची जनजागृती करण्यात यावी,जिप व पंस समिती योजना नप मार्फत राबविण्यात याव्या.

तत्कालीन वडाळा पैकू ग्राम पंचायतचे दस्तऐवज हस्तांतरण करण्यात यावे. काग व बाम्हणी गावात कचरा गाडी जाण्यास आदेशीत करावे,अभ्यंकर मैदानावरील जीर्ण पाण्याची टाकी पाडून नवीन टाकी बांधकाम करण्यात यावे, शहरातील सिमेंट रोड फोडलेले असून दुरुस्त करण्यात यावे, नप क्षेत्रात पंतप्रधान आवास योजनाची अंमलबजावणी करण्यात यावी, उद्याने निर्माण करण्यात यावे, शहरातील मुख्य मार्गावर शौचालय बांधकाम करण्यात यावे, नपमध्ये आकृतीबद्ध कर्मचारी नियुक्तीची अंमलबजावनी करण्यात यावी, नपला रुग्णवाहिका देण्यात यावी,ग्राम पंचायत काळातील सफाई कामगार नप सेवेत सामावून घेण्यात यावे, मरावि कडून शेतकऱ्यांना पूर्णवेळ विद्युत पुरवठा सुरू देण्यात यावा आदी मागण्यांचा समावेश असलेले निवेदन शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अविनाश अगडे व मीडिया प्रमुख पप्पू शेख यांच्या नेतृत्वात तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री ठाकरे यांना निवेदन देण्यात आले.

निवेदन देत असतांना शहर काँग्रेस कमेटीचे शहर अध्यक्ष अविनाश अगडे, शहर मीडिया प्रमुख पप्पूभाई शेख, माजी नप सभापती तथा शहर काँग्रेसचे सहसचिव नितीन कटारे, शहर काँग्रेसचे महासचिव विनोद सातपुते, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष राजू चौधरी, तालुका काँग्रेसचे सचिव विजय डाबरे, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष गुरुदास जुनघरे,शहर संपर्क प्रमुख धनराजजी मालके, तालुका काँग्रेसचे सहसचिव नागेश चटे, तालुका काँग्रेसचे सरचिटणीस विलास मोहिणकर, योगेश अगडे आदी उपस्थित होते. तदवतच याच समस्यांचे एक निवेदन नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूरचे जिल्हाधिकारी, एसडीओ चिमूर तथा मुख्यधिकारी चिमूर यांना दिले आहे.

देशभक्ती आणि राष्ट्रनिर्माण हेच गुणांचे प्रयोजन हवे - अशोक सोनटक्के

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल

वणी : "आपल्या ठिकाणी असलेल्या केवळ वक्तृत्वच नव्हे प्रत्येकच गुणांचे उपयोजन देशभक्तीच्या विकासासाठी आणि राष्ट्रनिर्माण यासाठीच करायला हवे. आपल्या स्वतःमध्ये हे गुणी जागृत करून इतरांमध्ये ते संक्रमित करण्यासाठी आपल्या कौशल्यांचा उपयोग करायला हवा" असे विचार शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव अशोक सोनटक्के यांनी व्यक्त केले.
लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास मंडळ तथा नेहरू युवा केंद्र यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित देशभक्ती आणि राष्ट्रनिर्माण या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या समारोपप्रसंगी ते विचार व्यक्त करीत होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रसाद खानझोडे यांनी मानवी विकासामध्ये वक्तृत्वाचे असलेले महत्त्व स्पष्ट करून आपल्या व्यक्तिमत्त्वाला प्रभावी करायचे असेल तर सुयोग्य वक्तृत्व किती महत्त्वाचे आहे यावर प्रकाश टाकला.

या स्पर्धेमध्ये प्राची लाकडे, राज पारखी, तानिया पठाण, सुषमा डाहुले वैष्णवी निखाडे समृद्धी ताकसांडे गौरव नायनवार झाकेरून खान करिष्मा हुसेन सोनाली राजूरकर, शुमाएला शेख, दिनेश झट्टे आणि समीक्षा पारोधी या विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

यामध्ये वैष्णवी निखाडे गौरव नायनवार आणि झाकेरून खान या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त केला. विजेत्यांना पदक आणि प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर खामनकर, राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख विकास जुनघरी आणि नेहरू युवा केंद्राच्या प्रियंका नाखले यांनी परीक्षणाची जबाबदारी सांभाळली. नेहरू युवा केंद्राच्या वतीने दीपिका मडावी आणि प्रियंका नाखले या स्पर्धेच्या वेळी उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास मंडळाचे संयोजक डॉ.अभिजित अणे यांनी तर आभारप्रदर्शन जयंत त्रिवेदी यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.परेश पटेल ,संजय बिलोरिया पंकज सोनटक्के, दिनकर उरकुडे यांनी विशेष परिश्रम घेतले. तालुका स्तरावरील यशस्वी हे विद्यार्थी यवतमाळ येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेत तालुक्याचे प्रतिनिधित्व करतील.

आज,वारी सामाजिक बहुउद्देशिय संस्थेची ऑनलाईन कार्यशाळा


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर जागतिक स्तरावर वातावरण बदल, त्याचे परिणाम व उपाययोजना यावर फार मोठे विचार मंथन होणे फार गरजेचे आहे. त्यात विद्यार्थ्यांचा देखील सहभाग असावा जेणेकरून बाल वयापासून पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने विद्यार्थी पाऊले उचलू शकतील या उददेशानेच स्थानिक वारी सामाजिक बहुउद्देशिय संस्था चंद्रपूर च्या वतीने वातावरण बदल या विषयावर एका ऑनलाईन कार्यशाळेचे शनिवार दिनांक 4 डिसेंबर 2021 ला ठीक 5 वाजता संस्थेच्या यूट्यूब चॅनेलवर आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेचे वैशष्टय म्हणजे युरोप खंडातील रोमेनिया या देशातील कोरिणा सुजदा यांचे मार्गदर्शन व तेथील विद्यार्थ्यांचे चंद्रपुरातील विद्यार्थ्यांशी होणारा खुला संवाद
या कार्यशाळेत रोमेनिया देशाने वातावरण बदलावर मात करण्यासाठी नेमके कसे व कोणती पाऊले उचलली याबाबत विद्यार्थ्यांमध्ये देवाण घेवाण होणार आहे.

या उपक्रमासाठी चंद्रपुरातील विविध नामांकित शाळांतील शिक्षक तसेच विद्यार्थी यांची हजेरी लागणार आहे. ऑनलाईन होवू घातलेल्या या कार्यशाळेत जास्तीत जास्त विद्यार्थी शिक्षक व पर्यावरण प्रेमींनी सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विजय खनके, सचिव प्रियांका वैरागडे यांनी केले आहे.

संस्थेचे सदस्य सोनाली पोहणे, मयुरी बालपांडे, भारत लाकडे, चंदा येरणे, सुचिता येनुरकर, नितेश उर्वेते, गणेश पोहणे स्नेहल अंबागडे व नरेन्द्र माेगरे उपराेक्त कार्यशाळा यशस्वि करण्यासाठी अथक परिश्रम घेत आहे.

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रथमच आदिवासी साहित्य, संस्कृती चा सन्मान !


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : 94 वे अ. भा मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे आज दि. 3-4-5 डिसेंबर 2021 ला कुसुमाग्रज नगरी MET भुजबळ नॉलेज सिटी, आडगाव येथे आयोजित करण्यात आले आहे.

डॉ .जयंत नारळीकर हे संमेलनाचे अध्यक्ष असुन स्वागताध्यक्ष छगन भुजबळ आहेत. जावेद अख्तर समाजवादी विचारवंत शायर, कवी, गझलकार व अनेक नामवंत लेखकांनी येथे हजेरी लावली. प्रकृती अस्वस्थ असल्याचे सांगत नियोजित अध्यक्ष गैरहजर राहिले. छगन भुजबळ यांनी आपल्या मनोगतातून भिल्ल आदिवासींचा गौरव केला. ते म्हणाले की, आधुनिक भारताच्या इतिहासात 1857 चे बंड प्रसिद्ध आहे. या बंडात नाशिकच्या 700 भिल्ल बांधवांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला होता. ते बंड भागोजी नाईकांचे बंड म्हणुन गाजले. ते बंड इंग्रजांविरुद्ध जसे होते तसे नव्या समाजरचनेसाठी होते. आदिवासींचा प्रश्न त्यातून पुढे आला. आदिवासी समाजाचे अस्तित्व या बंडातून अधोरेखित झालेले दिसून येते. 94 वर्षानंतर प्रथमच अ. भा मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात आदिवासी साहित्य दालनाचे उद्घाटन झाले.

गडचिराेलीच्या कुसुमताई अलाम आदिवासी साहित्यिक तथा सामाजिक कार्यकर्ता यांना आदिवासी विकास विभागाच्या वतीने विशेष निमंत्रण दिल्या गेले आहे.

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

मारेगाव : मौजा खडकी (बु.) फाट्याजवळ अज्ञात वाहनाने एका दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार 
गंभीर जखमी झाल्याची घटना (दि.3 डिसें.) ला  सध्याकाळी साडे सात च्या दरम्यान, घडली.

सुर्यभान भुजंग मडावी (45) रा. पिंपळगाव ता. केळापूर असे अपघातात गंभीर जखमी चे नाव आहे. सुर्यभान मडावी हे आपल्या दुचाकी क्रमांक MH 29 Q 2637 ने तेरवीच्या पत्रिका वाटप करून गावाकडे परत जात होते. अशातच खडकी (बुरांडा) फाट्या जवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्यात हाताला व तोंडाला जबर मार लागला असल्याचे वृत्त आहे.