कोंबड बाजारावर पोलिसांची धाड, पाच आरोपींना अटक

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी : वणी-भालर मार्गावरील जंगल परिसरात कोंबडबाजार भरविणाऱ्या पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या जवळून २ लाख २३ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सदर कार्यवाही आज १ नोव्हेंबरला सायंकाळी ५.३७ वाजताच्या सुमारास करण्यात आली. 

भालर मार्गावरील जंगल परिसरात कोंबड बाजार भरविला जात असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार शाम सोनटक्के यांना मिळाली. माहितीच्या आधारे ठाणेदारांनी पोलिस पथक तयार करून त्या ठिकाणी धाड टाकली असता काही इसम कोंबड्याच्या झुंजीवर पैशाची बाजी खेळतांना आढळून आले. कुणालाही सुगावा न लागू देता अतिशय चपळतापूर्वक ही धाड टाकण्यात आली. तरीही कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार खेळणाऱ्या काही इसमांना पोलिस आल्याचे कळताच त्यांनी तेथून पळ काढला. तर पाच आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. दुचाक्या घटना स्थळावर सोडून आरोपी सुसाट पळाले. श्याम सोनटक्के यांनी वणी पोलिस स्टेशनचा पदभार संभाळल्यापासून अवैध धंद्यांवरील कार्यवाहीला वेग आला आहे. अवैध धंद्यांवर त्यांची करडी नजर असून अवैध धंदे करणारे त्यांच्या रडारवर आहेत. कोंबडबाजारा वरील या १५ दिवसातील ही दुसरी मोठी कार्यवाही आहे. कोंबड्याच्या झुंजीवर पैशाची बाजी खेळणाऱ्या मो. सलिम मो. मुस्ताक (३२) मारोती चंपतराव गुरनुले (४५) दोन्ही रा. रंगारीपुरा, मनिष गोविंदराव चवरे (३१), ललित मधू चवरे (२८), हरिकृष्ण मधू सप्रे (८५) तिघेही रा. सेवानगर यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या जवळून एक झुंजीचा कोंबडा, दोन लोखंडी धारदार काती, पाच दुचाक्या, रोख ३४२० रुपये, तिन मोबाईल हँडसेट असा एकूण २ लाख २३ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पाचही आरोपींवर मजुका कलम १२(ब), १२(क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
सदर कार्यवाही एसपी डॉ. दिलिप पाटील भुजबळ, अप्पर पोलिस अधीक्षक खंडेराव धरणे, एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार शाम सोनटक्के, परि. पोउपनि आशिष झिमटे, डीबी पथकाचे सुदर्शन वानोळे, अशोक टेकाळे, संतोष आढाव, पंकज उंबरकर, विशाल गेडाम, शंकर चौधरी, यांनी केली. पुढील तपास परि. पोउपनि आशिष झिमटे करित आहे.

नियमबाह्य पद्धतीने मिनी टँकरने खुल्या बाजारात डिजेल विक्री करणाऱ्या ट्रान्सपोर्ट मालकावर गुन्हा दाखल


सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी : खाजगी मिनी टँकरच्या माध्यमातून खुल्या बाजारात डिजलची विक्री करणाऱ्या एका मिनी डिजेल टँकरला पोलिसांनी ताब्यात घेऊन दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुरवठा निरीक्षण अधिकारी यांना खाजगी डिजेल टँकरने डिजल विक्री होत असल्याचे आढळल्या नंतर त्यांनी पोलिसांना कळवून सदर टँकर विरोधात कार्यवाही करण्यास सांगितले. पोलिसांनी परवाना नसतांना स्वमालकीच्या डिजेल टँकरने खुल्या बाजारात डिजल विक्री करणाऱ्या डिजल टँकरला ताब्यात घेऊन डिजलची विक्री करणाऱ्या आरोपीसह टँकर मालकावर गुन्हा दाखल केला आहे. सदर डिजल टँकर हे श्री साई ट्रान्सपोर्ट कंपनीचे संचालक जगबीर पुनिया यांच्या देखरेखीत डिजल विक्री करित असल्याचे कळते. या कार्यवाहीने ट्रान्सपोर्ट व्यवसायिकांत चांगलीच खळबळ माजली आहे. 

तालुक्यात कोळसा खदानींचे जाळे पसरले आहे. कोल वाहतूकदारांच्या वेगवेगळ्या कोळसा खदानींमध्ये गाड्या सुरु आहेत. ट्रकांवर चढण्या उतरणाऱ्या चालकांना दररोज डिजल भरून द्यावे लागते. काही चालकांच्या खदानींमध्येच शिप चेंज होत असल्याने त्याच्या गाड्यांमध्ये स्पॉटवरच डिजल भरून द्यावे लागते. त्यामुळे वाहतूकदारांनी मिनी डिजल टँकर तयार केले असून त्याद्वारे ते स्वमालकीच्या गाड्यांमध्ये डिजेल भरतात. परंतु खाजगी डिजल टॅंकरने डिजल विक्री करण्याचा कोणताही परवाना ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी काढलेला नाही. नियमबाह्य पद्धतीने मिनी टँकरने डिजेल आणून गाड्यांमध्ये टाकले जाते. तसेच खुल्या बाजारातही डिजेलची विक्री करण्यात येते. अशाच एका नियमबाह्य पद्धतीने खुल्या बाजारात डिजेलची विक्री करणाऱ्या एका टँकरवर पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्यांची नजर पडली. त्यांनी लगेच ही माहिती पोलिस स्टेशनला दिली. पोलिसांनी कोणताही डिजल विक्रीचा परवाना नसतांना मिनी डिजल टँकरने डिजल विक्री करणाऱ्या MH ३४ BG ६९२९ या टँकरला ताब्यात घेतले. वणी घुग्गुस रोड वरील टोल नाक्याजवळ सदर टँकर नियमबाह्य पद्धतीने गाड्यांना डिजल विक्री करतांना आढळून आले. टँकरने डिजल विक्री करणाऱ्या शंकर किसन जिवतोडे याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता डिजल विक्रीचा कोणताही परवाना त्याच्याजवळ आढळून आला नाही. दरम्यान जगबीर पुनिया त्या ठिकाणी आला, व सदर टँकर मानकचंद जेठमल मालू यांच्या मालकीच्या भारत पेट्रोलियम वरोरा येथून आणल्याचे सांगितले. परंतु खुल्या बाजारात डिजेल विक्रीचा त्यांच्याजवळी परवाना आढळून आला नाही. पेट्रोल पंपाबाहेर डिजेल विक्री करण्याचा परवाना नसतांना खुलेआम मिनी टँकरने गाड्यांना डिजल विक्री करणाऱ्या जगबीर पुनिया (३७) रा. चिखलगाव व शंकर किसन जिवतोडे (४९) रा. नंदुरी या दोघांवरही पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. या कार्यवाहीने नियमबाह्य पद्धतीने मिनी डिजल टँकरने गाड्यांना डिजलची विक्री करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. पोलिसांनी या दोघांविरुद्ध भादंवि च्या कलम ३,७, अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ च्या कलम ३,४,६ व अन्य कालांनंतर्गत गुन्हे दाखल केले आहे. 
सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलिप पाटील भुजबळ, अप्पर पोलिस अधीक्षक खंडेराव धरणे, एसडीपीओ संजय पुजलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार श्याम सोनटक्के, पुरवठा निरीक्षक ओमकार पडोळे, पोउपनि शिवाजी टिपूर्णे, यांनी केली. पुढील तपास शिवाजी टिपूर्णे करित आहे.

नालीच्या दुर्गंधीमुळे शेजारी त्रस्त - नगर परिषदेला तक्रार दाखल !



सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : नागभिड येथील प्रभाग सात मध्ये नामे प्रभुदास कारुजी खापर्डे यांनी आपल्या संडासचे बांधकाम केले असुन मलबा व सांडपाणी जाण्यांसाठी नालीचे खाेदकाम केले असल्याचे प्रत्यक्षात दिसून येते. सध्या त्या नालीला जाेडलेला पाईप हा उघड्या अवस्थेत असून त्या (सांडपाणी) दुर्गंधीचा त्रास शेजारी असलेल्या वृषभ खापर्डे व त्यांच्या कुटूंबियांना अधिक हाेवू लागला आहे. दरम्यान वृषभ खापर्डे यांनी दि.१ नाेव्हेंबरला नागभिड नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना या बाबतीत एक लेखी तक्रार दाखल केली आहे. या बाबत न.प.प्रशासनाने त्वरीत दखल घेवून संबंधितावर कार्यवाही करण्यांची मागणी त्या तक्रारीत केली आहे. सदरहु तक्रारीच्या प्रति वृषभ खापर्डे यांनी नामदार बच्चू कडु व चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे कडे पाठविल्या आहे.
येत्या तीन दिवसात या वर याेग्य ताेडगा न निघाल्यास प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमांतुन आंदोलन करण्याचा इशारा नगर परिषदेला वृषभ खापर्डे यांनी दिला आहे.

अंकुरची अभिव्यक्ती सभा : साहित्य आणि सामाजिक भान जोपासत दिपावलीची उत्साहवर्धक सुरुवात...


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
यवतमाळ : कोजागिरी पौर्णिमेच्या केशर दुधाचा गोडवा, शरदा च्या चांदरातीचा गारवा आणि दीपावलीच्या उत्साहवर्धक चाहुलीचा वेध घेत यवतमाळ जिल्हा अंकुर साहित्य संघाच्या वतीने अभिव्यक्ती सभेचे सभेचे आयोजन करण्यात आले होते. या अभिव्यक्ती सभेचे अध्यक्षस्थानी महेश किनगावकर तर प्रमुख पाहुणे म्हणून अंकुर साहित्य संघाचे केंद्रीय उपाध्यक्ष सुरेश गांजरे, जिल्हध्यक्ष व संयोजक विद्याताई खडसे, सुप्रसिद्ध ज्येष्ठ कवी दिनकर वानखडे, प्रमिलाताई उमरेडकर उपस्थित होते.
या अभिव्यक्ती सभेत

"गंधरलेल्या दहाही दिशा
सोनकिरणानी रंगली निशा
आशेचा किरण आला भरात!
थबकून गेली तुमची मिजास
दिवे लागले रे झकास झकास"!

या कवी गुलाब सोनोने यांच्या कवितेसह तात्यांनी राखूंडे, राजश्री बिंड, अभि.मनोहर शहारे, प्रमिला उमरेडकर, नितीन धोटे, सुरेश गांजरे, उषाताई खटे या सहभागी कविंनी अप्रतिम कविता सादर केल्या. जेष्ठ कवयित्री कल्पना देशमुख यांनी सादर केलेली-  

'आयुष्यात आहे सुख
अलिप्तपणे जगण्यात
गुंतू नका कदापिही
नात्यांच्या मोहक गुंत्यात'!

ही चिंतनशील कविता होती,तर जिल्हा सचिव महेश अडगुलवार यांची 'सांगायचे राहूनच गेले' ही कविता महाविद्यालयीन जीवनाला उजाळा देणारी ठरली.नितिन धोटे यांनी "सोचो समझो जाणो तुम,बात दिलोकी मानो तुम ही कविता सादर केली",कवी दीनुभाऊ वानखडे यांनी प्रेम कसं होतं ही कविता सादर केली ते म्हणाले" आभयात मावत नव्हतं पण जरासही दिसत नव्हतं" 
   तालुका शाखाध्यक्ष प्रमोद देशपांडे यांच्या 'पाटलीन बाईच्या पाटल्या' या नर्मविनोदी कथेने हास्याचे कारंजे फुलविले.
  
अंकुर साहित्य संघाने साहित्य बरोबरच सामाजिक दायीत्वाच्या भूमिकेतून याच अभिव्यक्ती सभेत,आरती बेलसरे या होतकरू मुलीचा तिच्या कार्यासाठी व कोरोना युद्धात महत्वाची भूमिका बजावणा-या अलका शिंदे, विद्या गोळे, ज्योती चौरे या 'आशा सेविकांचा' सत्कार नगर सेविका तथा नगरपरिषदेच्या माजी शिक्षण सभापती निता केळापुरे यांच्या हस्ते भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. याच वेळी अंकुरच्या सदस्या मनिषाताई केतकर यांच्यावर ओढवलल्या दु:खातून सावरण्यासाठी माहेरवाशिणीची हक्काची साडीचोळी देऊन भावनिक आधार देण्यात आला.

या प्रसंगी प्रास्ताविक करताना कृतध्यात व सांत्वना व्यक्त करताना संयोजक विद्याताई म्हणाल्या" असं माहेरच्या ओलाव्याची दारी फुलावी रांगोळी..
दुःख नको सोबतीला तडफडते मासोळी..
असं भयाण जगणं आता भुईच्या वाट्याला..
थोड्या प्रेमाच्या सुरांनी गंध यावा या मातीला...
या सभेचे आयोजन अंकुरच्या सदस्या उषाताई खटे यांच्या निवासस्थानी करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तोष्णा मोकडे यांनी तर प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष व मुख्य संयोजक सौ. विद्याताई खडसे तर आभार प्रदर्शन जिल्हा सचिव महेश अडगुलवार यांनी केले. या अभिव्यक्ती सभेला तालुका सचिव महेश मोकडे, आरती बेलसरे, उषा खटे अर्चना वाकूलकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाला कल्पना उघडे, सुवर्णा ठाकरे, दिपा गुघाणे यांची उपस्थिती होती.

युवासेनाचे महागाव येथे पेट्रोल,डिझेल दरवाढी विरोधात सायकल चालवुन आंदोलन

सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागांव : युवा सेना प्रमुख मा.श्री.आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार तथा युवासेना सचिव श्री.वरुन सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली यवतमाळ विस्तारक श्री.दिलीप घुगे
 युवासेना जिल्हा प्रमुख विशाल पांडे यांच्या उपस्थितीत युवासेना महागाव तालुका यांच्या पुढाकाराने महागाव येथे केंद्र सरकारच्या पेट्रोल, डिझेल इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सायकल चालवुन हाताला काळ्या फित्या बांधुन काळे झेंडे दाखवुन आंदोलन करण्यात आले.
या वेळी युवासेना जिल्हा प्रमूख म्हणाले की, आधीच महागाई ने कळस गाठला असुन सामान्य जनता त्रस्त असताना केंद्र सरकार पेट्रोल, डिझेल, इंधन दरवाढ करतच असल्याने सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे सामान्य जनता केंद्रातील महागाई फेम सरकार ला धडा शिकलव्याशिवाय राहणार नाही असे मनोगत व्यक्त केले.

यावेळी युवा जिल्हा प्रमूख विशाल पांडे, शिवसेना तालुका प्रमुख प्रमोद उर्फ शाखा भरवाडे, युवासेना तालुका प्रमुख, उप.सभापती, राम तंबाके, शिवसेना शहर प्रमूख राजू राठोड, शिवसेना प्रसिद्धि प्रमुख सुमित गोविंदवाड, युवासेना शहर प्रमूख, ओम कसुमवार, शॅम कदम, ऋषिकेष बलखंडे, देशमुख, गजानन शिंदे, ऋषी दातकर, गणेश कदम, आशितोष कदम, सुमित लोंबडे, किरण कदम, लक्ष्मीकांत घाटोळे, सारंग पिसाळ, प्रविण कोकरे, यांच्यासह शेकडो शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते.