९ ऑगस्ट पासून श्रावण महिना सुरू

सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (०३ ऑगस्ट) : आषाढी एकादशी आटोपली की, तालुक्यात सण - उत्सवांचे वारे वाहायला सुरुवात होते. आषाढी, बकरी ईद, गुरुपौर्णिमा हे सण पार पडले आहेत. आषाढ अमावस्येला दिपपूजा केली जाते. त्यानंतर सणांचा महिना श्रावण सुरू होतो. 
यंदा ९ ऑगस्टपासूनच श्रावण महिन्याला सुरुवात होत असून,याच तारखेपासून श्रावण सोमवारही सुरू होतं आहेत. विशेष बाब अशी की, यंदा पाच श्रावण सोमवार आले आहेत.
पहिला श्रावण सोमवार ९ ऑगस्टला, दुसरा १६ ला, तिसरा २३ ला, चौथा ३० ला, तर पाचवा श्रावण सोमवार ६ तारखेला आला आहे.
याच महिन्यात शुक्रवार १३ रोजी नागपंचमीचा सण असून रविवार १५ ऑगस्टला स्वातंत्रदिन, पतेती, १६ ऑगस्टला पारशी नूतनवर्षं, गुरुवार रोजी मोहरम, रविवार २२ रोजी नारळीपौर्णिमा रक्षाबंधन, सोमवार ३० रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी, ३१ ऑगस्टला गोपाळकाला, ६ सप्टेंबर रोजी मोठा पोळा व ७ सप्टेंबर रोजी श्रावण अमावस्या लहान पोळा असे भरगच्च सण आहेत. ऑगस्ट महिन्यात दिपपूजा, नागपंचमी, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी हे चार महत्वाचे सण आहेत. 

            "पाने, फुले, फळांचा सुकाळ"

यावर्षी चांगला पाऊस पडल्याने सृष्टी हिरवा शालू नेसून नटली आहे. डोंगरावर हिरवी चादर पसरलेली आहे, असे वाटते. 
झाडे पानांनी बहरली असून रंगीत फुले बहरली आहे. विविध फळेही बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. त्यामुळे विविध झाडांची पाने विशेषतः बेलपत्री, चाफा, जाई, जुई निशिगंध, जास्वंद, दुर्वा, गुलाब अशी फुलेही विपूल दिसत आहे. 
कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने घरातील देव्हारा पाना - फुलांनी सजवला जाणार आहे.

शिवक्रांती कामगार संघटनेचा युवा बेरोजगार उपोषणाला जाहीर पाठीबा


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
झरी, (०२ ऑगस्ट) : मुकुटबन येथे सुशिक्षित बेरोजगार युवकांनी (ता. 2) ला मुकुटबन येथील बस स्थानकात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. बेरोजगारांच्या हक्कासाठी झरी तालुक्यातील युवक सर्व युवकवर्ग  एकत्र येऊन या आमरण उपोषणात सहभागी झाले.

झरी तालुक्यातील मुकुटबन येथे अनेक नामांकित मोठं मोठ्या कंपन्या आल्या आहे. व त्याचे कामही जोरात चालू आहे मात्र, तालुक्यातील युवकांच्या हाताला काम मात्र त्या कंपनीत कुठल्याच प्रकारचे मिळत नाही असा संताप व्यक्त करत, आज तालुक्यातील युवकांनी आमरण उपोषणाला निर्णय घेतला आहे.

तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवा वर्ग कामासाठी वणवण असून स्थानिक कंपनीच्या कामांपासून वंचित आहे. याआधी तालुक्यातील सर्व युवक एकत्र येऊन येथील कंपनीमध्ये अनेक वेळा कामं मागितले. परंतु त्यांना त्या ठिकाणी कामच मिळत नसल्याचे उपोषणकर्त्यांची तक्रार आहे.

तालुक्यात उद्योग,कंपनी तर आहे मात्र, येथील सुशिक्षित बेरोजगार युवकांना कुठलंच काम मिळत नसल्यामुळे आज ही उपोषणाची वेळ आमच्यावर आली. स्थानिकांना काम द्या या मागणीकरिता युवकांनी मुकुटबन येथे आमरण उपोषणाला सुरुवात करताच या उपोषणाला आज शिवक्रांती कामगार संघटनेने प्रथम आपला पाठिबा दिला आहे. यावेळी आम्ही युवकांच्या पाठीशी असल्याचे संघटनेच्या वतीने सांगितले.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

सह्याद्री न्यूज | संतोष गडवे 
औरंगाबाद, (०२ ऑगस्ट) : दि.१ ऑगस्ट रोजी आण्णाभाऊ साठे जयंती निमित्त सिडको एन सहा मित्र मंडळ, विश्वजीत फाउंडेशन व एज्युकेशन सोसायटीच्या वतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जिल्हाधिकारी कार्यालय चौकातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच घाटी रूग्णालयातील गोरगरीबांना अल्पहार वाटप करण्यात आला.

यावेळी मनीष नरवडे, सचिन दांडगे , पवनभाऊ पवार, अभिषेक गावडे, अतुल गायकवाड, सचिन गायकवाड, सुमेध हिवाळे, करण कसारे, अनिकेत गायकवाड, अनिकेत श्रीवास्तव, शुभम् आसलकर, अनिकेत राऊत, मयुर जमधडे, निखिल गवळी, अभिषेक कुटे, आशिष मोकळे इत्यादी मित्र परिवार उपस्थित होता.

तब्बल अकरा महिने दडवून ठेवला नुकसान भरपाईचा प्रस्ताव


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
राजुरा, (०२ ऑगस्ट) : राजुरा तालुक्यातील कविठपेठ येथील मोतीराम विठू आत्राम यांना रानटी डूकराने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला असून त्यांचा कुटुंब उघड्यावर पडला असून, सदर घटनेला एक वर्ष होत आहे. वनविभागाने त्यांचे कुटुंबीयांना नुकसान भरपाई देणे अपेक्षित होते मात्र तब्बल अकरा महिने नुकसान भरपाईचा प्रस्ताव वनपरिक्षेत्र कार्यालय राजुरा यांनी दडवून ठेवला असल्याने खडबड उडाली आहे. 

पिढीत महिला साधना आत्राम यांनी वारंवार सदर कार्यालयात विचारणा केली त्यानंतर सदर प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी राजुरा यांनी दिली. मात्र उपविभागीय वन अधिकारी कार्यालय राजुरा यांनी विहित मुदतीत प्रस्ताव पाठविले नसून तब्बल अकरा महिन्यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविले असून हा शासन निर्णयाचा भंग असून शिस्त भंगाची कार्यवाही करण्यात का येऊ नये अशा आशयाचे पत्र वनपरिक्षेत्र अधिकारी गलगट यांना दिले आहे. मात्र गलगट अजूनही निलंबित झाले नसून गलगट यांचेवर राजकीय वरदहस्त असल्याचे बोलल्या जात आहे. यामुळे मयत मोतीराम आत्राम यांची पत्नी गोंधळून गेली आहे. 

साधना आत्राम यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी गलगट यांना भेटून प्रकरणाची माहिती विचारली असता तिला उडवा उडविचे उत्तर देऊन परत पाठवीत आहेत तसेच मयत विठू आत्राम यांचा नुकसान भरपाईचा प्रस्तावावर कोणतीच कार्यवाही केलेली नाही. यावरू आर.एफ.ओ. गलगट यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. 

सदर बाब आदिवासी संघटनांच्या निदर्शनास आल्याने सदर प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी व मयत मोतीराम विठू आत्राम यांच्या कुटुंबीयांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी निवेदनातून केली असून आदिवासी महिलेला नुकसान भरपाई न दिल्यास कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करू अशी माहिती आदिवासी कार्यकर्त्यांनी दिली असून न्याय न मिळाल्यास उच्च न्यायालयात दाद मागू असेही निवेदनात नमूद असून निवेदन उपविभागीय वन अधिकारी गर्कल यांनी स्वीकारले असून निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते डॉ. मधुकर कोटनाके, घनश्याम मेश्राम, संतोष कुलमेथे, रमेश आडे, अभिलाष परचाके, योगेश कोडापे उपस्थित होते.

माजी वनमंत्री संजय राठोड यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता; पुणे पोलिसांच्या हाती लागला महत्वाचा पुरावा

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
पुणे, (०२ ऑगस्ट) : एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले माजी वनमंत्री संजय राठोड हे आणखी गोत्यात येण्याची शक्यता आहे. संजय राठोड यांच्या विरोधात पुणे पोलिसांच्या हाती सबळ पुरावा आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

'इंडियन एक्स्प्रेस'नं या संदर्भातील वृत्त दिलं आहे. मृत तरुणीच्या फोन कॉल्सच्या रेकॉर्डिंगवरून मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्येच्या आधी ती ज्या व्यक्तीच्या संपर्कात होती, ज्याच्याशी बोलत होती, ती व्यक्ती संजय राठोड हीच असल्याची प्रथमदर्शनी माहिती समोर येत आहे. त्या दोघांमध्ये बंजारा भाषेत संभाषण झालं होतं. त्याचा अनुवाद करून घेतला जात आहे,' असं पोलीस सूत्रांनी सांगितलं.

मूळची बीडची असलेल्या या तरुणीनं ६ फेब्रुवारी रोजी राहत्या इमारतीतून उडी मारून आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येनंतर या प्रकरणात संजय राठोड यांचं नाव समोर आलं होतं. राठोड यांचे पूजाशी संबंध असल्याचे आरोप झाले होते. विरोधकांनी हे प्रकरण लावून धरल्यामुळं राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. राठोड यांच्यासोबत झालेल्या तरुणीच्या कथित संभाषणाचं रेकॉर्डिंग पुण्यातील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आलं होतं. त्याचबरोबर, ज्या दिवशी संबंधित तरुणीनं आत्महत्या केली, त्याच्या २४ तास आधीचे यवतमाळ मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या इमारतीतील सीसीटीव्ही फूटेजही फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, त्या फूटेजमध्ये संबंधित तरुणी संजय राठोड यांचा जवळचा सहकारी अरुण राठोड यांच्यासोबत दिसली होती. तिनं जिथं आत्महत्या केली, त्या हेव्हन पार्क इमारतीत अरुण राठोड व विलास चव्हाण हे दोघे तिच्यासोबत राहिले होते.

मृत तरुणीचे फोन रेकॉर्डिंग व सीसीटीव्ही फूटेजच्या फॉरेन्सिक तपासणीचा अहवाल पोलिसांना मिळाला आहे. मात्र, फोन रेकॉर्डिंगमधील आवाजाचे नमुने माजी मंत्र्याच्या व अन्य व्यक्तींच्या आवाजाशी जुळताहेत का, याची तपासणी होणे अद्याप बाकी आहे. सीसीटीव्ही फूटेज खऱ्या असल्याचं पोलीस सूत्रांकडून समजतं.
पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या प्रकरणी अधिक काही बोलण्यास नकार दिला आहे. 'चौकशीची सगळी माहिती देता येणार नाही. तपासासाठी जे काही केलं जाणं आवश्यक आहे, ते केलं जात आहे,' एवढंच त्यांनी सांगितलं.