माजी वनमंत्री संजय राठोड यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता; पुणे पोलिसांच्या हाती लागला महत्वाचा पुरावा

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
पुणे, (०२ ऑगस्ट) : एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले माजी वनमंत्री संजय राठोड हे आणखी गोत्यात येण्याची शक्यता आहे. संजय राठोड यांच्या विरोधात पुणे पोलिसांच्या हाती सबळ पुरावा आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

'इंडियन एक्स्प्रेस'नं या संदर्भातील वृत्त दिलं आहे. मृत तरुणीच्या फोन कॉल्सच्या रेकॉर्डिंगवरून मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्येच्या आधी ती ज्या व्यक्तीच्या संपर्कात होती, ज्याच्याशी बोलत होती, ती व्यक्ती संजय राठोड हीच असल्याची प्रथमदर्शनी माहिती समोर येत आहे. त्या दोघांमध्ये बंजारा भाषेत संभाषण झालं होतं. त्याचा अनुवाद करून घेतला जात आहे,' असं पोलीस सूत्रांनी सांगितलं.

मूळची बीडची असलेल्या या तरुणीनं ६ फेब्रुवारी रोजी राहत्या इमारतीतून उडी मारून आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येनंतर या प्रकरणात संजय राठोड यांचं नाव समोर आलं होतं. राठोड यांचे पूजाशी संबंध असल्याचे आरोप झाले होते. विरोधकांनी हे प्रकरण लावून धरल्यामुळं राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. राठोड यांच्यासोबत झालेल्या तरुणीच्या कथित संभाषणाचं रेकॉर्डिंग पुण्यातील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आलं होतं. त्याचबरोबर, ज्या दिवशी संबंधित तरुणीनं आत्महत्या केली, त्याच्या २४ तास आधीचे यवतमाळ मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या इमारतीतील सीसीटीव्ही फूटेजही फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, त्या फूटेजमध्ये संबंधित तरुणी संजय राठोड यांचा जवळचा सहकारी अरुण राठोड यांच्यासोबत दिसली होती. तिनं जिथं आत्महत्या केली, त्या हेव्हन पार्क इमारतीत अरुण राठोड व विलास चव्हाण हे दोघे तिच्यासोबत राहिले होते.

मृत तरुणीचे फोन रेकॉर्डिंग व सीसीटीव्ही फूटेजच्या फॉरेन्सिक तपासणीचा अहवाल पोलिसांना मिळाला आहे. मात्र, फोन रेकॉर्डिंगमधील आवाजाचे नमुने माजी मंत्र्याच्या व अन्य व्यक्तींच्या आवाजाशी जुळताहेत का, याची तपासणी होणे अद्याप बाकी आहे. सीसीटीव्ही फूटेज खऱ्या असल्याचं पोलीस सूत्रांकडून समजतं.
पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या प्रकरणी अधिक काही बोलण्यास नकार दिला आहे. 'चौकशीची सगळी माहिती देता येणार नाही. तपासासाठी जे काही केलं जाणं आवश्यक आहे, ते केलं जात आहे,' एवढंच त्यांनी सांगितलं.
माजी वनमंत्री संजय राठोड यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता; पुणे पोलिसांच्या हाती लागला महत्वाचा पुरावा माजी वनमंत्री संजय राठोड यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता; पुणे पोलिसांच्या हाती लागला महत्वाचा पुरावा Reviewed by सह्याद्री चौफेर on August 02, 2021 Rating: 5
Powered by Blogger.