नरेगातुन 'ग्राम समृध्दी बुध्दीमंथन' कार्यशाळा कळंब येथे सपन्न

सह्याद्री न्यूज | रूस्तम शेख 
कळंब, (०२ ऑगस्ट) : सरस्वती बहुउद्देशिय शिक्षण प्रसारक मंडळ राळेगांव यांच्या व्दारा कळंब पंचायत समिती हॉल मध्ये पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पदमाकर मडावी यांच्या अध्यक्षते खाली "मनरेगातुन ग्रामसमृध्दी" बुध्दीमंथन कार्यशाळा सपन्न झाली.

या कार्यशाळेत मनरेगाचे नियोजन, कामाचा आढावा, बजेट, मजुराचे ताळेबंद, याबाबत तसेच मनरेगातुन २६२ प्रकारचे कामे आपण आपल्या गावात सुरू करु शकतो या बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्य शाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणुन वरोरा येथील श्री किशोर चौधरी अध्यक्ष विचार विकास संस्था, तर उदघाटक म्हणुन सामाजिक कार्यकर्ते अशोक उमरतकर तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन उपसभापती विलास राठोड, पं. स.सदस्य महादेवराव काळे, रूस्तम शेख, देवेंद्र पडोळकर सहा. कार्यक्रम अधिकारी नरेगा पं.स.कळंब सहा गट विकास अधिकारी तुषार महाजन, आशिष कुंभारे, विस्तार अधिकारी धर्माळे, दिगांबर गाडगे इ. मान्यवर उपास्थित होते.

बुद्धीमंथन कार्यशाळेचे सुत्रसंचालन प्रमोद कांबळे, प्रास्ताविक गंगाधरराव घोटेकार, तर आभार प्रदर्शन जयानंद टेभेंकर यांनी केले.
कार्यशाळा यशस्वी होण्याकरीता प्रदिप कोरडे, स्वप्नील घोटेकार, महेंद्र धुर्वे इ.अथक परिश्रम घेतले.
या प्रसंगी तालुक्यातील बहुसंख्य सरपंच, उपसरपंच, रोजगार सेवक उपस्थित होते.

वाघ हल्ल्याचे सत्र सुरूच! आज पुन्हा निंबादेवी शेतशिवारात गोऱ्याचा पाडला फडशा


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
झरी, (०२ ऑगस्ट) : तालुक्यात वाघाचा हल्ल्याचे सत्र थांबता थांबेना! आज निंबादेवी गावालगत असलेल्या खारी मध्ये गोऱ्याचा फडशा पाडला आहे.
संतोष धुर्वे यांचे ते गोरं असून, बळीराम मेश्राम यांच्या शेतात वाघाने ठार केल्याची घटना आज सकाळी ६:०० वाजताच्या उघडीस आली. शेतीपयोगी येणाऱ्या गोऱ्याला ठार केल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे वन विभागावर नाराजी व्यक्त होत आहे.

पिवरडोल येथील युवकाला ठार केल्याची घटना ताजी असतांना पुन्हा वाघाचा मोर्चा पाळीव जनावरांकडे वळल्याचे चित्र दिसून येत आहे. कालपासून भटकंती या शेतशिवारात वाघाची सुरु आहे. असे येथील महिला व पुरुषांनी सांगितले. त्यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शेतात काम करायची की, नाही असा प्रश्न परिसरातील शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक वन मजूर दाखल झाले असून, कॅमेऱ्याद्वारे या वाघाचा शोध घेत असल्याची माहिती आहे. वन कर्मचारी गुज्जर साहेब व निंबादेवी बिट चे उमेश गहूकर हे घटनास्थळी पोहचले असून मृतक गोऱ्याचा पंचनामा करण्यात आला. मात्र, घटनेने नागरिकात दहशत पसरली असून, या वाघाचा बंदोबस्त करण्यात यावे. अशी मागणी आता ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.

रॉयल फाऊंडेशनच्या कार्यालयीन फलकाचे उद्घाटन

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (०२ ऑगस्ट) : सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्य करण्याकरिता स्थापन करण्यात आलेल्या रॉयल फाऊंडेशन संस्थेच्या कार्यालयीन फलकाचे ३१ जुलैला वणी येथील बिल्डर डेव्हलपर्स व उद्योजक मनीष चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मनीष चौधरी यांनी ६५ हजार रुपये किमतीचे ऑक्सिजन काँसंट्रेटर रॉयल फाऊंडेशन संस्थेला भेट म्हणून दिले. तसेच संस्थेच्या माध्यमातून अधिकाधिक समाज उपयोगी कार्य व्हावे अशी सदिच्छा व्यक्त करत संस्थेच्या पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.

यावेळी ऍड. निलेश चौधरी व डॉ. रोहित वनकर यांनी समाजाप्रती असलेल्या सामाजिक दायित्वाच्या भावनेतून सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याकरिता रॉयल फाऊंडेशन ही संस्था सुरु करण्यात येत असून, नुकताच या संस्थेचा लोगो प्रकाशित करण्यात आला असल्याचे सांगितले. लवकरच संस्थेची वणी, पांढरकवडा व राळेगाव शहराची कार्यकारणी गठीत करण्यात येणार असून संस्थेच्या कामकाजाला मात्र, सुरुवात करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
(ऑक्सिजन काँसंट्रेटर रॉयल फाऊंडेशन संस्थेला भेट देताना)

संस्थेच्या यशस्वी वाटचाली करिता सामान्य जनतेची साथ व सहकार्य आवश्यक असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला वर्षा कचवे, निकुंज अटारा, सागर वंजारी, अजय टोंगे, ललित कचवे हे प्रामुख्याने उपस्थित होते.

सहकारी क्षेत्रात राज्यानं घडविलेल्या विकासाला तोड नाही, ऊर्जा राज्यमंत्री नितीन राऊत यांनी सहकारी संस्थांच्या यशस्वी वाटचालीची केली प्रशंसा !

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (०२ ऑगस्ट) : महाविकास आघाडीचं सरकार राज्यात आल्यापासून रोगराई व नैसर्गिक आपत्तीची झळ राज्याला सोसावी लागली. कोरोना महामारीनं राज्य हादरलं असतांनाच चक्रीवादळ व पूर परिस्थितीचं संकट राज्यावर कोसळलं. राज्यावर आलेल्या कठीण संकटांचा राज्य सरकारनं धैर्याने सामना केला. मदतीचा ओघ कमी पडू दिला नाही. राज्याची तिजोरी आपत्ती व्यवस्थापनाकरिता खुली करून दिली. आरोग्य विभागाकरिता निधी कमी पडू दिला नाही. राज्यात १ कोटी नागरिकांच्या लसीकरणाचे दोन्हीही डोस पूर्ण झाले आहे. अर्थचक्र संकटाभोवतीच फिरत राहिल्याने अन्य विकासकामे थांबली. राज्याचा हवा तसा विकास साधता आला नाही. पण सहकार क्षेत्रात राज्यानं घडवून आणलेला विकास उल्लेखनीय आहे. नागपूर भागात सहकारी संस्था कमी आहेत. पण या भागात सहकारी संस्थांची यशस्वी वाटचाल सुरु असल्याने येथील भविष्य उज्वल असल्याचे मनोगत राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेच्या ग्रामीण शाखेच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. वणी येथील राम शेवाळकर परिसरातील रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पंतसंस्थेच्या ग्रामीण शाखेचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी आयोजित उद्घाटन समारंभात त्यांनी हे उदगार काढले. पुढे बोलतांना ते म्हणाले की, तीन पक्षांनी एकत्रित येऊन स्थापन केलेलं महाविकास आघाडीचं सरकार मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वात खंबीरपणे वाटचाल करीत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता ही लाट थोपविण्याकरिता सरकार तयारीला लागलं आहे. राज्याचा विकास करता आला नसला तरी नागरिकांचे जीव वाचवणं जरुरी असल्यानं आरोग्य खात्याला निधी कमी पडू दिला नाही. माझ्याकडे ऊर्जा खातं असून मी सर्वानाच ऊर्जा देण्याचं काम करतो. पण या भागाला खरी एनर्जी देण्याचं काम खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी केलं आहे. ते एनर्जी मंत्री आहेत. असं व्यक्तिमत्त्व लाभायला फार भाग्य लागतं. असच त्यांचं सहकार्य लाभल्यास सहकार क्षेत्र प्रगतीपथावर जाण्यास वेळ लागणार नाही. सहकार म्हणजे मैत्री आणि आज फ्रेंडशिप डे चा योग आल्याने उपस्थितांनी आपली मैत्री स्वीकारावी अशी भावनिक सादही याप्रसंगी त्यांनी सर्वांना घातली.

खासदार बाळूभाऊ धानोरकर यांची प्रमुख उपस्थिती असलेल्या या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार वामनराव कासावार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी आमदार विश्वास नांदेकर, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, म. रा. पत.फेड. चे कार्याध्यक्ष राजूदास जाधव, यवतमाळ मध्यवर्ती जिल्हा बँकेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे, उपाध्यक्ष संजय देरकर, उपाध्यक्ष वसंतराव घुईखेडकर उपस्थित होते. स्वागताध्यक्ष म्हणून रंगनाथ स्वामी सह.नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष ऍड. देविदास काळे यांनी जबादारी पार पाडली. ऍड. देविदास काळे यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात पतसंस्थेच्या यशस्वी वाटचालीवर प्रकाश टाकला. १९८९ साली किरायाच्या छोट्याच्या खोलीत सुरु झालेल्या या पतसंस्थेची आज ७ कोटी रुपयांची स्वतःची मालमत्ता आहे. पतसंस्थेत कार्यरत असरणाऱ्या ४३० जणांचं कुटुंब या पतसंस्थेच्या भरोशावर चालतं. सतत अ दर्जा या पतसंस्थेला मिळाला आहे. ६६० कोटींच्या ठेवी या पतसंस्थेत असून ६५८ कोटीचे भागभांडवल आहे. ५२३३५ एवढी या पतसंस्थेची सभासद संख्या आहे. प्रत्येक स्थरातील नागरिकांना ही पतसंस्था कर्ज देते. शेतकऱ्यांपासून तर कष्टकऱ्यांपर्यंत सर्वांनाच हवे तेंव्हा, हवे त्या कारणांसाठी सहज कर्ज उपलब्ध करून दिल्या जाते. निवडणूक लढण्याकरिता राजकीय नेत्यांनाही या पतसंस्थेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिल्या जातं. विरोधकांना आमच्या विरोधात निवडणूक लढण्याकरिताही आम्ही कर्ज दिली आहे. असे गमतीशीर किस्सेही त्यांनी यावेळी सांगितले. आपल्या राजकीय अनुभवातील अनेक चांगले वाईट प्रसंग त्यांनी यावेळी व्यक्त केले.

प्रमुख पाहुण्यांचीही यावेळी भाषणे झाली. सर्वांनीच एकमेकांवर गंमतीशीर टीका करतांनाच हास्य फुलेल असे चिमटेही काढले. आपल्या राजकीय भाषण शैलीतून उपस्थितांना पोटधरून हसविले. राजकारणातल्या गमतीजमती सांगतानाच एकमेकांविषयीचा आपुलकीभावही त्यांच्या मधून व्यक्त करण्यात आला. सर्वच लोकप्रतिनिधींनी रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेच्या पुढील वाटचालीकरता शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन पतसंस्थेचे उपाध्यक्ष विवेकानंद मांडवकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन पतसंस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी मेघश्याम तांबेकर यांनी केले. या उद्घाटन समारंभाला पतसंस्थेचे संपूर्ण संचालक मंडळ उपस्थित होत. नागरिकांचीही मोठी उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली.

भूमी अभिलेख कार्यालयाचा गलथान कारभार! अन 'त्या' शेतकऱ्याची आत्महत्या

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
मारेगाव, (०२ऑगस्ट) : मारेगाव येथील शासकीय  कामकाजाचा तालुक्यातील नागरिकांना अनुभव चांगला ज्ञात आहे. इथलं शासकीय खातं येणाऱ्या नागरिकांचे समाधान होत नसल्याच्या तक्रारीला काही कमी नाही. एक ना धड भाराभर चिंद्या अशीच काहींशी अवस्था असे बोलल्या जात आहे. त्यातच भूमी अभिलेख कार्यालय तर विचारूच नका, असे तालुक्यातील शेतकरी सांगतात. भूमिअभिलेख येथील गलथान कारभार नुकताच चहाट्यावर आला आहे. खरेदी केलेल्या शेताची चुकीच्या पद्धतीने मोजणी शीट तयार केल्याचा मनस्ताप सहन न झाल्यामुळे हटवांजरी येथील एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडली. 
आत्महत्ये पूर्वी त्या पीडित शेतकऱ्याने ३ जुलै २०२० रोजी वरिष्ठांकडे भूमी अभिलेख कार्यालय मारेगाव यांच्या विरोधात रितसर तक्रार अर्ज दाखल केला होता. अहो या तक्रारीची साधी दखल भूमी अभिलेख कार्यालयाकडून घेण्यात आली नाही. आत्महत्येपूर्वी पीडित शेतकऱ्याने भूमी अभिलेख कार्यालय मारेगाव यांच्या विरोधात रीतसर तक्रार अर्ज दाखल केला होता. 
या तक्रारीची दखल घेत वरिष्ठांनी तक्रारीतील मुद्याचे अवलोकन करून खात्री करावी, मुद्यांचे अनुषंगाने निरसर करून तक्रार कर्त्यांना निकाली उत्तर देऊन निकाली उत्तराचे प्रतिसह आवश्यक कार्यालयीन अभिलेखासह साक्षांकित प्रति सोबत स्वयंस्पष्ट अहवाल या कार्यालयात अतिसत्वर सादर करावा अन्यथा होणाऱ्या विलंबास आपण कार्यलय प्रमुख म्हणून स्वतः जबाबदार राहाल अशा आशयाच्या सुचनाने पत्र जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यवतमाळ यांनी ६ जुलै २०२० रोजी स्थानिक उपअधीक्षक भूमी अभिलेख मारेगाव यांना देण्यात आले होते. मात्र, या पत्रालाही येथील कार्यालय प्रामुख्याने उत्तर देण्यास तसदी घेतली नाही तशा पद्धतीची कारवाई केली नाही.
तब्बल वर्ष लोटून दुसरा शेती हंगाम सुरू झाला असूनही  वरिष्ठ कार्यालयाच्या सुचनाने स्थानिक कार्यालयातून अवेहलाना झाली. असल्याने आता आपण न्याय मागायचा तरी कोणाकडे ? 
या अनुत्तरीत प्रश्नाच्या विवंचनेत हटवांजरी येथील देवराव लटारी फरताडे या तरुण शेतकऱ्याने आपली संघर्ष यात्रा संपवली आहे. या तफावत सिस्टीमचा कारवाईतुन या शेतकऱ्यांचे मनोबल पूर्णपणे खच्चीकरण केल्या गेले असून, तफावत सिस्टीमच्या नैराश्यातून आत्महत्येचा इशारा कार्यालयाला देत देवराव लटारी फरताडे रा. हटवांजरी या शेतकऱ्यांने विषारी द्रव प्राशन करून आपली जीवन यात्रा संपविली आहे. या घटनेने तालुक्यातून ज्यांना ज्यांना येथील भूमी अभिलेख चा अनुभव आला, जो तो या घटनेने संताप व्यक्त करीत आहे. 
या प्रकरणाची वरीष्ठ पातळीवरून चौकशी लागल्यास मोठे रॅकेट गळ्याला लागण्याची शक्यता वर्तविली आहे .