सहकारी क्षेत्रात राज्यानं घडविलेल्या विकासाला तोड नाही, ऊर्जा राज्यमंत्री नितीन राऊत यांनी सहकारी संस्थांच्या यशस्वी वाटचालीची केली प्रशंसा !

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (०२ ऑगस्ट) : महाविकास आघाडीचं सरकार राज्यात आल्यापासून रोगराई व नैसर्गिक आपत्तीची झळ राज्याला सोसावी लागली. कोरोना महामारीनं राज्य हादरलं असतांनाच चक्रीवादळ व पूर परिस्थितीचं संकट राज्यावर कोसळलं. राज्यावर आलेल्या कठीण संकटांचा राज्य सरकारनं धैर्याने सामना केला. मदतीचा ओघ कमी पडू दिला नाही. राज्याची तिजोरी आपत्ती व्यवस्थापनाकरिता खुली करून दिली. आरोग्य विभागाकरिता निधी कमी पडू दिला नाही. राज्यात १ कोटी नागरिकांच्या लसीकरणाचे दोन्हीही डोस पूर्ण झाले आहे. अर्थचक्र संकटाभोवतीच फिरत राहिल्याने अन्य विकासकामे थांबली. राज्याचा हवा तसा विकास साधता आला नाही. पण सहकार क्षेत्रात राज्यानं घडवून आणलेला विकास उल्लेखनीय आहे. नागपूर भागात सहकारी संस्था कमी आहेत. पण या भागात सहकारी संस्थांची यशस्वी वाटचाल सुरु असल्याने येथील भविष्य उज्वल असल्याचे मनोगत राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेच्या ग्रामीण शाखेच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. वणी येथील राम शेवाळकर परिसरातील रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पंतसंस्थेच्या ग्रामीण शाखेचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी आयोजित उद्घाटन समारंभात त्यांनी हे उदगार काढले. पुढे बोलतांना ते म्हणाले की, तीन पक्षांनी एकत्रित येऊन स्थापन केलेलं महाविकास आघाडीचं सरकार मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वात खंबीरपणे वाटचाल करीत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता ही लाट थोपविण्याकरिता सरकार तयारीला लागलं आहे. राज्याचा विकास करता आला नसला तरी नागरिकांचे जीव वाचवणं जरुरी असल्यानं आरोग्य खात्याला निधी कमी पडू दिला नाही. माझ्याकडे ऊर्जा खातं असून मी सर्वानाच ऊर्जा देण्याचं काम करतो. पण या भागाला खरी एनर्जी देण्याचं काम खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी केलं आहे. ते एनर्जी मंत्री आहेत. असं व्यक्तिमत्त्व लाभायला फार भाग्य लागतं. असच त्यांचं सहकार्य लाभल्यास सहकार क्षेत्र प्रगतीपथावर जाण्यास वेळ लागणार नाही. सहकार म्हणजे मैत्री आणि आज फ्रेंडशिप डे चा योग आल्याने उपस्थितांनी आपली मैत्री स्वीकारावी अशी भावनिक सादही याप्रसंगी त्यांनी सर्वांना घातली.

खासदार बाळूभाऊ धानोरकर यांची प्रमुख उपस्थिती असलेल्या या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार वामनराव कासावार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी आमदार विश्वास नांदेकर, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, म. रा. पत.फेड. चे कार्याध्यक्ष राजूदास जाधव, यवतमाळ मध्यवर्ती जिल्हा बँकेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे, उपाध्यक्ष संजय देरकर, उपाध्यक्ष वसंतराव घुईखेडकर उपस्थित होते. स्वागताध्यक्ष म्हणून रंगनाथ स्वामी सह.नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष ऍड. देविदास काळे यांनी जबादारी पार पाडली. ऍड. देविदास काळे यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात पतसंस्थेच्या यशस्वी वाटचालीवर प्रकाश टाकला. १९८९ साली किरायाच्या छोट्याच्या खोलीत सुरु झालेल्या या पतसंस्थेची आज ७ कोटी रुपयांची स्वतःची मालमत्ता आहे. पतसंस्थेत कार्यरत असरणाऱ्या ४३० जणांचं कुटुंब या पतसंस्थेच्या भरोशावर चालतं. सतत अ दर्जा या पतसंस्थेला मिळाला आहे. ६६० कोटींच्या ठेवी या पतसंस्थेत असून ६५८ कोटीचे भागभांडवल आहे. ५२३३५ एवढी या पतसंस्थेची सभासद संख्या आहे. प्रत्येक स्थरातील नागरिकांना ही पतसंस्था कर्ज देते. शेतकऱ्यांपासून तर कष्टकऱ्यांपर्यंत सर्वांनाच हवे तेंव्हा, हवे त्या कारणांसाठी सहज कर्ज उपलब्ध करून दिल्या जाते. निवडणूक लढण्याकरिता राजकीय नेत्यांनाही या पतसंस्थेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिल्या जातं. विरोधकांना आमच्या विरोधात निवडणूक लढण्याकरिताही आम्ही कर्ज दिली आहे. असे गमतीशीर किस्सेही त्यांनी यावेळी सांगितले. आपल्या राजकीय अनुभवातील अनेक चांगले वाईट प्रसंग त्यांनी यावेळी व्यक्त केले.

प्रमुख पाहुण्यांचीही यावेळी भाषणे झाली. सर्वांनीच एकमेकांवर गंमतीशीर टीका करतांनाच हास्य फुलेल असे चिमटेही काढले. आपल्या राजकीय भाषण शैलीतून उपस्थितांना पोटधरून हसविले. राजकारणातल्या गमतीजमती सांगतानाच एकमेकांविषयीचा आपुलकीभावही त्यांच्या मधून व्यक्त करण्यात आला. सर्वच लोकप्रतिनिधींनी रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेच्या पुढील वाटचालीकरता शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन पतसंस्थेचे उपाध्यक्ष विवेकानंद मांडवकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन पतसंस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी मेघश्याम तांबेकर यांनी केले. या उद्घाटन समारंभाला पतसंस्थेचे संपूर्ण संचालक मंडळ उपस्थित होत. नागरिकांचीही मोठी उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली.
सहकारी क्षेत्रात राज्यानं घडविलेल्या विकासाला तोड नाही, ऊर्जा राज्यमंत्री नितीन राऊत यांनी सहकारी संस्थांच्या यशस्वी वाटचालीची केली प्रशंसा ! सहकारी क्षेत्रात राज्यानं घडविलेल्या विकासाला तोड नाही, ऊर्जा राज्यमंत्री नितीन राऊत यांनी सहकारी संस्थांच्या यशस्वी वाटचालीची केली प्रशंसा ! Reviewed by सह्याद्री चौफेर on August 02, 2021 Rating: 5
Powered by Blogger.