सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मुख्यमंत्रिपद मिळत नसल्यामुळे एकनाथ शिंदे हे नाराज आहेत. त्यामुळे ते महायुतीची महत्वाची बैठक असलेल्या दिवशीच त्यांच्या सातारा जिल्ह्यातील दरे गावी निघून गेल्याच्या बातम्याही आल्या. त्यामुळे महायुतीत सगळे काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून नव्या सरकारच्या शपथविधीबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
'राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी... विश्वगौरव माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुरूवार दिनांक ५ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न होणार आहे,' असे बावनकुळे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
महायुतीच्या नव्या सरकारबाबत नवी दिल्लीत अमित शाह यांच्या उपस्थितीत गुरूवारी बैठक झाली. तीन तास चाललेल्या या बैठकीत महायुतीमधील तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांची संख्या आणि खातेवाटप याबाबत सहमती झालेली नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागण्यांमुळे भाजपच्या विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यासाठी साधी बैठकही होऊ शकलेली नाही.
अशातच आता खात्रीलायक सूत्रांकडून एक बातमी पुढे येत आहे. भाजप पक्षश्रेष्ठी पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर करत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा एकनाथ शिंदेंचीच वर्णी लावण्याची शक्यता आहे.
सरकारचा ५ डिसेंबर रोजी शपथविधी: संध्याकाळी ५ वाजता आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न होणार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 30, 2024
Rating: