सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : राज्यात महायुतीचे बहुमताने सरकार परत आलं असं जवळ जवळ निश्चित आहे. मात्र, वणी विधानसभा मतदार संघातून भाजप महायुतीची जागा पडल्याने विधानसभा क्षेत्रातील जनतेत आता नाराजीचा सूर दिसून येत आहे.
रविवारी भारतीय जनता पार्टी च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्यात महायुतीच्या प्रचंड जागा निवडून आल्या, याचा वणी मध्ये माजी आमदार यांच्या उपस्थितीत जल्लोष साजरा करण्यात आला. तालुक्यातील सर्व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते एकत्रित येऊन विजयाचा नारा देण्यात आला. माजी आ. संजयरेड्डी बोदकुरवार हे अनेक वेळा भावुक झाल्याचे दिसून आले.
त्यानंतर सभेत बोलताना ते म्हणाले,अतिशय प्रामाणिकपणे काम केलं,मनात थोडीशी बेईमानी राबविली नाही. ज्याचं काम केलं, अतिशय निष्ठेने काम केलं.कधी आमदार व्हावं, जिल्हा परिषद लढवावं मनात कधीच नव्हतं.2014 मध्ये आपल्या आशिर्वादामुळे, प्रेमामुळे अतिशय पंधरा दिवसात तुम्ही आम्ही घेतलेल्या मेहनतीने आमदार झालो. आणि आमदार झाल्यापासून जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ पक्षाला दिला. कार्यकर्त्यांना दिला, जनतेला दिला.दहा वर्षात मी परिवाराला, पत्नी मुलांबाळांना वेळ देऊ शकलो नाही, तेवढा मी पक्षाला दिला. असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. पुढं ते म्हणाले कि, पराभवाची चिंता नाही, मात्र पक्षात राहून अतिशय प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांनी मला हरवण्यासाठी गद्दारी, बेईमानी केली याच शल्य माझ्या मनात आहे, आज तुम्ही इतक्या संख्येने इथे जमलात मला याच आनंद आहे. मात्र, पक्षात प्रामाणिकपणे काम करा, पक्ष कुठेही तुम्हाला कमी पडू देत नाही. मी तिकिटासाठी दिल्ली ला गेलो नाही, नाही मुंबईला गेलो. देवेंद्रजींनी मला स्वतः संपर्क साधून सांगितलं की तुमची तिकीट पक्की आहे, तुम्ही तयारीला लागा. म्हणून मी लढलो. परंतु आता मी माझा स्वभाव बदलणार आहे, जे गद्दार बेईमान आहे त्यांना मी माझ्या दारात पाय ठेवू देणार नाहीत. असे बोलताना बोदकुरवार गहिवरले.
तुम्ही सोबत राहा मी तुमच्या सदैव पाठीशी आहे. एवढ्या मोठ्या पदाचा माणूस, माझ्या विरोधात प्रचार केला ही मोठी खंत आहे. पक्षात राहून अशी बेईमानी होत असेल तर हे पक्षाचे मोठं दुर्दैव आहे. आज राज्यात महायुतीचे सी एम (मुख्यमंत्री) होणार आहे, आम्ही आमदार नसलो तरी कोणाचे काम अडणार नाही. माझे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे आहे. मग देवेंद्रजी असो सुधीरजी असो, आणखी काही लोकं असतील. खूप चांगले स्नेहाचे संबंध मी सर्वांशी जपले. त्यामुळे आपल मी काम अडू देणार नाही. नवीन आमदारांना माझ्या शुभेच्छा आहे, मात्र ज्या पद्धतीने राजकारणाची दिशा बदलत आहे ही येणाऱ्या तरुण पिढीसाठी घातक आहे.माझा पराभव का झाला, कसा झाला हे तुम्हा सर्वाना माहिती आहे. परंतु यावर आता बोलणार नाही. मी विकासात कुठेही कमी पडलो नाहीत, खूप कामे केली. मला 80 हजार मत मिळाली हे आपल्या प्रेमाची साक्ष आहे. जर तर सोडून आपण पराभव मान्य करू, आणि पुढील कार्यासाठी नव्या दमाने जोमाने तुमच्यासाठी मी लढणार आहे. जेवढा वेळ पूर्वी देत होतो तेवढाच वेळ आताही तुमच्यासाठी देणार आहे हे बोलताना ते अतिशय भावुक होऊन म्हणाले.
यावेळी वणी विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पक्षाचे व महायुतीचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी व कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनतेनी आशीर्वाद दिला पण पक्षांतर्गत गद्दारीने घात केला - संजीवरेड्डी बोदकुरवार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 25, 2024
Rating: