तहसील कार्यालयात बोगस कर्मचाऱ्याचा सुळसुळाट

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : येथील तहसील कार्यालयातील बोगस कर्मचाऱ्याचा सुळसुळाट असल्याची तक्रार युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदनातून केली. 
शेंडे यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात तहसील कार्यालयातील परिस्थितीचा पाढाच वाचला आहे. राकेश लक्षेट्टीवार नामक व्यक्तीचा तहसील कार्यालयात सतत वावर असतो. मीच अधिकारी असल्याचे बतावणी करून काम करतो. दुकानदारांची धान्य मंजूर करून देणे, दुकानदाराची पुर्ण रेकॉर्ड आपल्या जवळ ठेवणे, ऑनलाईन चे कामे, नावे कमी, जास्त करणे, नविन राशन कार्ड तयार करणे, यासह विविध बोगस कामे करणे असे निवेदनात नमूद आहेत. सदर व्यक्तीला या अगोदर सुद्धा काढलं होतं परत त्यांचा वावर दिसत असल्यामुळे कारवाई करून कार्यालयातून काढून टाकावे असेही निवेदनात म्हटलं आहे. 
निवेदन देताना धनराज येसेकर, संजोग झाडे, अंकुश येसेकर, अमोल आरेल्लवार,सुरेश शेंडे, अनिल ढगे, मंगल भोंगळे, सूजल जुमडे, गणेश आरेल्लवार, बबलू मेश्राम आदी उपस्थित होते. 

गटविकास अधिकारी व्हनखंडे यांनी केली विकासपूर्व कामांची पाहणी

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : पंचायत समिती मारेगाव अंतर्गत येत असलेल्या पिसगांवाला कोरोडो रुपयांचा विविध कामासाठी निधी मंजूर झाला असून त्या विकासपूर्व कामाची पाहणी पंचायत समिती कार्यालयच्या वतीने आज करण्यात आली.

यावेळी गट विकास अधिकारी भीमराव व्हनखंडे, गटशिक्षण अधिकारी स्नेहदीप काटकर,ता. कृषी अधिकारी संदीप वाघमारे, पं स शाखा अभियंता उमाटे, जि. प. अभियंता ठावरी, घुमे साहेब, देठे बाबू यासह ग्रामपंचायत सदस्य सदाशिव मेश्राम, माजी उपसरपंच मारोती गौरकार, शाळा सुधार समिती चे सभापती व सदस्य तसेंच ग्रामपंचायत सरपंच व सदस्य उपस्थित होते. 

यात प्रामुख्याने शाळेच्या वर्ग खोल्या, गावातील कांक्रेटचे रोड, ग्रामपंचायत भवन चा समावेश आहे. लवकरच या मंजूर कामाची सुरुवात होणार आहे. तसेंच कृषी मार्फत छत्रपती शिवाजी महाराज बचत गटाला ९० टक्के अनुदानित ट्रॅक्टर वाटप केले. त्यामुळे गावात होणाऱ्या सर्व कामामुळे पदाधिकाऱ्यांसह गावाकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

पिसगाव गावामध्ये मंजूर कामाची सुनिश्चित करण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी पावले उचलली जात आहेत, असे माजी उपसरपंच मारोती गौरकार म्हणाले.

यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी आणि तालुका विभागीय अधिकारी तथा गावकरी उपस्थित होते.

बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्यांकडून त्या बेपत्ता महिलेची गळा दाबून हत्या


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

चंद्रपूर : मागील १५ दिवसांपासून चिमूर येथील बेपत्ता व्यापारी महिलेचा मृतदेह मंगळवारी नागपूर येथील बेलतरोडी परिसरातील निर्जनस्थळी आढळला. व्यापारी महिलेची हत्या दुचाकी चोरीप्रकरणी अटकेत असलेला बडतर्फ पोलीसच निघाल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चंद्रपूर शहर पोलिसांनी बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याला अटक केली. नरेश डाहुले (४०) रा. तुकूम, चंद्रपूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

चिमूर येथील देवांश जनरल स्टोअर्सच्या संचालिका अरुणा अभय काकडे (३७) या २६ नोव्हेंबरला नागपूर येथील इतवारी मार्केटमध्ये दुकानातील साहित्य खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. त्या उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र विचारपूस केली. मात्र, त्यांचा काही शोध लागला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी चिमूर पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीत इतवारी येथून हरविल्याची नोंद करण्यात आली. पोलिसांकडून संथगतीने तपास सुरू असल्याने जिल्हा व्यापारी मंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन या प्रकरणाकडे लक्ष वेधले. पोलिसांनी प्रकरणाला गांभीर्याने घेतले.

दरम्यान, ६ डिसेंबरला दुचाकी चोरीप्रकरणात आरोपी नरेश डाहुले याला चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. शनिवारी न्यायालयात हजर करून पोलिसांनी पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने आरोपी नरेश याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

याचदरम्यान, आरोपींची कॉल रेकॉर्डची तपासणी करीत असताना सदर बेपत्ता महिलेसोबत बोलणे झाल्याचे निदर्शनास आले. पोलिसांचा संशय बळावल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाचा तपास चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार प्रभावती एकुरके यांच्याकडे सोपविला. यावेळी पोलिसांनी खाकीचा हिसका दाखविल्यानंतर बेपत्ता असलेल्या महिलेचा खून केल्याची आरोपीने कबुली दिली. २६ नोव्हेंबरला अरुणा काकडे हिची नागपुरात भेट झाली. अरुणा वर्ग मैत्रीण असल्याने आमची चांगली ओळख होती. त्यादिवशी आम्ही दिवसभर सोबत होतो. त्यानंतर रेशीमबाग मैदानावर आमच्या दोघांत वाद झाला. यावेळी रागाच्या भरात अरुणाचा गळा आवळून खून केला व नंतर आपल्या चारचाकी वाहनात अरुणाचा मृतदेह बेलतरोडी येथील निर्जनस्थळी असलेल्या घरातील शौचालयाच्या टाक्यात टाकून दिल्याचे सांगितले.

आरोपीने सांगितलेल्या घटनेनुसार चंद्रपूर पोलिसांनी मृतदेहाचा शोध घेतला. बेलतरोडी येथील परिसरात मृतदेह आढळताच पोलिसांनी कुटुंबीयांना बोलावून मृतदेहाची ओळख पटविली. यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून कुटुंबीयांच्या स्वाधीन केला. याप्रकरणी चंद्रपूर पोलिसांनी खुनाच्या प्रकरणात आरोपी नरेश डाहुले याला अटक केली. पुढील तपास ठाणेदार प्रभावती एकुरके करीत आहे.

आपल्या हक्काबरोबरच कर्तव्याची जाण हवी. राजु धावंजेवार

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : सामान्य जनतेवर होणारे अन्याय कधीही खपवून घेतले जाणार नाही. परंतु सामान्य जनतेनेसुध्दा आपल्या हक्काबरोबर आपल्या कर्तव्याची जाण ठेवणे देखील गरजेचे आहे. तसेच प्रत्येक नागरीकाने जागृत राहण्याची गरज आहे. असे प्रतिपादन मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष राजु धावंजेवार यांनी केले. 
घटनेतील विविध कलमान्वये प्रत्येक व्यक्तीला समतेचा, स्वातंत्र्याचा व्यवसाय करण्याचा, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार बहाल करण्यात आल्याचे सांगितले. मानवाधिकार दिनाच्या निमित्याने आज विश्रामगृहात पदाधिकाऱ्याची बैठक पार पडली यावेळी मानवी हकक सुरक्षा परिषदेचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष विकेश पानघाटे, वणी विधानसभा भाऊसाहेब आसुटकर, वणी शहर अध्यक्ष अजय चन्ने, यवतमाळ जिल्हा संपर्क प्रमुख सौ. सुमित्रा गोडे वणी तालुका महिला अध्यक्ष, सौ. सुनीता काळे वणी शहर महिला अध्यक्षा सौ. प्रमिला चौधरी व सुरेश बन्सोड महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष, संदिप बेसरकर महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष यवतमाळ जिल्हा महिला उपाध्यक्षा सौ. मनिषा निब्रड तसेच इतर सदस्य उपस्थित होते. 


राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे एड्स जनजागृती सप्ताह

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : लोकमान्य टिळक महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि ग्रामीण रुग्णालय वणी यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एड्स जनजागृती सप्ताहाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. 1 डिसेंबर एड्स दिन म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जातो. लोकमान्य टिळक महाविद्यालयात सुद्धा या दिनाचे औचित्य साधून एड्स जनजागृती रॅली, एड्स जनजागृती पर पोस्टर कॉम्पिटिशन , क्विझ कॉम्पिटिशन, तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी गावामध्ये विविध ठिकाणी जाऊन एड्स जनजागृती पर पथनाट्य आणि रोडशो चे प्रदर्शन केले. तसेच व्याख्यानाचे सुद्धा आयोजन करण्यात आले.

व्याख्यानाच्या या सदर कार्यक्रमा चे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .प्रसाद खानझोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना एड्स हा महाभयंकर रोग असला तरी त्याचा सामना धैर्याने करावा तसेच युवा पिढीने समाजात याविषयी जनजागृती करावी युवक आणि युवतीने विवाहपूर्वी कुंडली पाहण्यापेक्षा एड्स ची टेस्ट करावी व सुदृढ भारत घडविण्यासाठी मदत करावी. असे मार्गदर्शनपर उद् बोधन केले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र ग्रामीण रुग्णालय वणी समुपदेशक सौ .संगीता वैद्य आणि श्री .प्रकाश काळे हे उपस्थित होते. संगीता वैद्य यांनी एड्स या रोगाबद्दल संपूर्ण माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांना असणाऱ्या शंकांचे निरसन त्यांनी केले काहीही अडचण असल्यास 10 97 या टोल फ्री क्रमांक वर फोन करून अडचणींचे निरसन कुणीही करू शकतं असं मार्गदर्शन त्यांनी आपल्या भाषणात केलं.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नीलिमा दवणे यांनी केले आणि एड्स जनजागृती करण्याची शपथ श्री प्रकाश काळे यांनी विद्यार्थ्यांना दिली, कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय सेवा योजनेची विद्यार्थिनी कु. रजनी गारगाटे हिने केले व आभार प्रदर्शन चंचल मडावी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक यांनी केले. पोस्टर प्रदर्शनी पाहून तसेच आरोग्य तपासणीनंतर कार्यक्रमाचे सांगता झाली. राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद या कार्यक्रमास होता. कार्यक्रमाचे नियोजन डॉक्टर नीलिमा दवणे आणि डॉ.विकास जूनगरी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी यांनी केले.