आता लढणार आणि जिंकणार, संजय खाडे यांची पत्रकार परिषदेत गर्जना

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : वणी विधानसभा क्षेत्रावर काँग्रेसचाच दावा होता. वणी विधानसभा मतदारसंघ कायम काँग्रेसचा पारंपरिक गड राहिला आहे. मी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुक होतो. मात्र सर्वसामान्य जनतेच्या आग्रहानंतरही ही जागा शिवसेना (उबाठा) गटाला गेली. त्यामुळे काँग्रेस पक्षात प्रचंड नाराजी आहे. मी काँग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. मात्र अखेर कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव व प्रेमापोटी मला निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घ्यावा लागला. ही लढाई केवळ माझी नसून काँग्रेसच्या अस्तित्वासाठीची आहे. त्यामुळे मी लढणार आणि जिंकणार, अशी गर्जना संजय खाडे यांनी पत्रकार परिषदेत केली. आज दु. 3.30 वाजता वणीतील वसंत जिनिंगमध्ये पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. या पत्रकार परिषदेत शिवसेना व काँग्रेसचे अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. 
सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी निवडणुकीच्या रिंगणात 
पत्रकार परिषदेत संजय खाडे म्हणाले की,माझी लढाई ही शेतक-यांच्या हितासाठी राहणार आहे. कष्ट करून पिकवलेल्या शेतमालाला योग्य तो भाव न मिळणा-या कास्तकारासाठी आहे. परिसरात खनिज संपत्ती असूनही रोजगारासाठी झगडावे लागणा-या बेरोजगार भूमीपु्त्रांसाठी आहे. दलित, आदिवासी, मुस्लिम यांच्या हक्कासाठी आहे. माझा लढा वणी व गावात शुद्ध पाणी मिळावे, गोरगरीबांना योग्य ती आरोग्य सेवा मिळावी. निवडणूक जवळ आली की अचानक सक्रीय होणा-या प्रव़ृत्तीविरोधात आहे. जनतेच्या कामाला कोण धावून जाते व कोण निष्क्रीय आहे, हे जनतेला चांगलेच माहिती आहे. त्यामुळे या लढाईत सर्व जनता माझ्या पाठिशी उभी राहिल, असा मला ठाम विश्वास आहे, असेही ते म्हणाले. यावेळी बोलताना ते भावूक झाले व त्यांना अश्रू अनावर झाले. 
शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विश्वास नांदेकर म्हणाले की, मी एक शिवसैनिक म्हणून राजकारण सुरु केले. आजही मी एक शिवसैनिकच आहे. गेल्या 30 वर्षांपासून मी राजकारणात आहे. राजकारणात असताना पदाची कधीही चिंता केली नाही. सोबत राहून पोटात खंजर खुपसण्याचे काम मी करीत नाही. त्यामुळे मी संजय खाडे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. या लढाईत माझ्यासोबत वणी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे तिन्ही तालुका प्रमुख आहेत. तर नरेंद्र ठाकरे म्हणाले की, संजय खाडे यांनी काँग्रेस पक्षासाठी कायम निष्ठेने काम केले. निष्ठेने काम करणा-यांच्या मी कायम सोबत राहिलो आहे. एकिकडे निष्क्रिय माणूस आहे तर दुसरीकडे सक्रिय माणूस आहे. त्यामुळे संजय खाडे यांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेतल्याचे ठाकरे म्हणाले.

महाविकास आघाडीत उभी फूट
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर, मारेगाव तालुका अध्यक्ष संजय आवारी, झरी तालुका अध्यक्ष चंद्रकांत घुगुल काँग्रेसचे नरेंद्र ठाकरे, पुरुषोत्तम आवारी, शंकर व-हाटे, तेजराज बोढे, पलाष बोढे, गौरीशंकर खुराणा यांच्यासह सुनील वरारकर, प्रशांत गोहोकार, पवन शाम एकरे यांनी त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पत्रकार परिषदेला काँग्रेस, शिवसेना व विविध संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मविला मोठा धक्का : अखेरपर्यंत अपक्ष उमेदवार ठाम

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी काँग्रेस चे सरचिटणीस तथा अपक्ष उमेदवार संजय खाडे हे आपले अर्ज मागे घेणार की, निवडणूक लढणार अशी जोरदार उत्सुकता मतदार संघात शिगेला पोहचली होती. आज (ता. 4) ला दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद आयोजित करून खुद अपक्ष उमेदवार खाडे यांनी आपण "शिट्टी" या चिन्हा वर निवडणूक लढणार असल्याची माहिती दिली. 
या पत्रकार परिषदेला शिवसेने (उबाठा) ला सोडचिट्टी दिलेले जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर, काँग्रेसचे जेष्ठ नेते नरेंद्र ठाकरे, सुनील वरारकर, पुरोषत्तम आवारी, प्रशांत गोहोकार, गौरीशंकर खुराणा, तेजराज बोढे, शंकर वऱ्हाटे, चंद्रकांत घुगुल, संजय आवारी, प्रसाद ठाकरे, तुळशीराम कुमरे, आदींची उपस्थिती होती. 
पुढे बोलताना ते म्हणाले,आपण या पंचवीस वर्षात काँग्रेस मध्ये निष्ठावान राहून पक्षासाठी काय काय कार्य केले हे सांगताना अपक्ष उमेदवार खाडे हे क्षणभर गहिवरले. उमेदवारी मागे न घेता ते लढणार यामुळे महायुती, महाविकास आघाडीच्या रणनीतीत मोठा बदल झाला आहे. 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानात याचा कसा परिणाम होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
मविआ ने आपले तिकिट कापल्यामुळे संजय खाडे नाराज झाले. अखेर पक्ष अपक्ष उमेदवारी दाखल करून पक्षाचा फार्म बाद झाला आणि अपक्ष म्हणून ते रिंगणात उतरले आहे. विशेष म्हणजे वणी हा काँग्रेस चा बालेकिल्ला असून खाडेंनी उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये या आग्रहास्तव कार्यकर्त्यामधून विनंती होती. 
आज सोमवारी वसंत जिनिंग येथे पत्रकार परिषदेत माहिती देताना त्यांनी सांगितलं की,मी काँग्रेस चा निष्ठावान कार्यकर्ता आहे. मी जनतेसाठी अपक्ष म्हणून निवडणूक लढणार आहे. माझ्या मायबाप जनतेसाठी सदैव तत्पर राहून त्यांचा आवाज बनणार, हा माझा दृढ निश्चय आहे. आणि हा लढा सर्वसामान्यांसाठी आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडी येण्याची शक्यता दिसत असून संजय खाडे यांच्यामुळे वणी मतदार संघात आता मात्र निवडणूक चूरशीची होण्याची शक्यता दाट आहे. या चौरंगी लढतीत अधिकृतांना चांगलाच घाम फुटणार आहे.


मीच पक्षाची मोट बांधली 
या मतदारसंघात गत तीस वर्षांपासून शिवसेनेचा डोलारा सांभाळला. कार्यकर्त्यांची खुली चर्चा करीत पक्षाची मोट बांधली. अप्रामाणिक नेतृत्वाकडे उमेदवारी बहाल झाल्याची खंत व्यक्त करीत मतदारसंघातील शिवसैनिकांनी संजय खाडे यांचा विजय सुनिश्चित करण्याचे आवाहन केले.
- माजी आमदार विश्वास नांदेकर
काँग्रेस गायब झाल्याची नाराजी 
परंपरागत काँग्रेस मतदारसंघ संघात ऐनवेळी कलाटणी मिळाली. काँग्रेसचा पंजा या मतदारसंघातून गायब होणे हा दुखवटा मनात रुचत आहे. मात्र, खाडे यांचेसमवेत काँग्रेस विचारी कार्यकर्ता व मतदार सक्रीय आहे. निश्चितच मतदार राजा हा निष्क्रिय व सक्रीय उमेदवारांचा गांभीर्याने विचार करेल. तशा आशयाची ताकद आम्ही निष्ठावान म्हणून लावू. 
- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेंद्र ठाकरे

संजय खाडे यांना वाढता पाठिंबा, जनमतात आघाडी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : ७६ -वणी विधानसभा मतदार संघात तिहेरी लढत होण्याची चिन्ह आहे. भाजप महायुती कडून संजीवरेड्डी बोदकुरवार महाविकास आघाडी कडून संजय देरकर, व मनसे कडून राजू उंबरकर मैदानात आहेत. त्यातच अपक्ष उमेदवार संजय खाडे यांनी नामांकन अर्ज दाखल केल्याने रंगत वाढली आहे. 

आज 4 तारखेला कोण उमेदवारी मागे घेणार याची चर्चा रंगली असतांना अपक्ष उमेदवार संजय खाडे यांना ही मतदार संघातील अनेकांनी मैदानात उभे राहा,असे बळ दिल्याने त्यांनी तयारी केल्याचे दिसते.

  मागील अनेक वर्षापासुन संजय खाडे या मतदार संघात कार्यरत आहे. त्यांनी अनेक माणसे जोडली. त्या मुळे तिहेरी वा चौरगी लढतीत त्यांना अधिक स्पेस राहील असा अंदाज व्यक्त होतो.




पांडव देवी मध्ये जाऊन संजीवरेड्डी बोदकुरवारांनी दिल्या दीपावलीच्या शुभेच्छा..!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : भाजप महायुती चे अधिकृत उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी आज (ता.1) रोजी दिवाळी निमित्त मारेगाव तालुक्यातील प्रसिद्ध मंदिर पांडव देवी येथे जाऊन आशीर्वाद घेतला
व भाविक, शेतकरी, मंजूर, नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासमवेत अविनाश लांबट कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, माजी ता.अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, अभिजित मांडेकर उपस्थित होते.
दि. 2 ऑक्टोबर ला आज सकाळी भाजप महायुती व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी दिवाळी, गोवर्धन पूजा निमित्ताने पांडव देवी येथील उपस्थित शेतकरी, पुजारी, मजूर, युवक, नागरिकांना यांना भेटून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी अनेक भाविक व शेतकऱ्यांनी या निवडणुकीत महायुतीच्या मागे उभे राहणार असल्याचे नारा दिला. त्याचबरोबर मंदिराचे विश्वस्त मंडळ, पुजारी व समर्थकांनी उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे जोरदार स्वागत केले.
यावेळी मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अविनाश लांबट, माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, अभिजित मांडेकर, गणेश खडसे, दादाराव ठोबरे, रवी टोंगे, प्रवीण बोथले, गणपत वऱ्हाटे, सुभाष खडसे, प्रवीण नान्हे, चंदू जवादे, प्रशांत नांदे, यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.



पांडव देवी दर्शनाला जाताना घडलेल्या अपघातातील दोन ठार, तर एकाला उपचार करून सुट्टी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

 मारेगाव : पांडव देवी येथे गोवर्धन यात्रा पाहण्यासाठी जात असलेल्या तिघांचा मारेगाव जवळील खडकी फाट्यावर अपघात झाला होता.  
या अपघातात तिघे जखमी झाले असून यातील दोघांची परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले होते.                   
तालुक्यातील पांडव देवी येथे गोवर्धन पूजेच्या दिवशी मोठी यात्रा भरते. ही यात्रा पाहण्यासाठी परिसरातील तसेच बाहेर जिल्ह्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणात नागरिक येथे येतात. येथे गाईची पूजा करून त्यांची मोठ्या प्रमाणात यात्रा काढली जाते. ही यात्रा बघण्यासाठी चोपण येथील रवींद्र हरिदास जोगी (39), शालिक चेंडकू जुनगरी (35) आणि संदीप कुडमेथे हे तिघेही शनिवार दि. 2 नोव्हेंबरला सकाळी (MH 29 AX 3682) या दुचाकीने पांडव देवी येथे जात होते. पांडव देवी जात असताना खडकी फाट्याजवळ अचानक दुचाकी अनियंत्रित होऊन यांची दुचाकी रस्त्याच्या बाजूला असलेल्या नालीमध्ये जाऊन आदळली. 
हा अपघात एवढा जबरदस्त होता की, यातील दोघे गंभीर होते. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी यांना मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले. ग्रामीण रुग्णालय येथे यांच्यावर उपचार करून पुढील उपचारासाठी यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले होतं. 
यातील संदीप बादलशाही कुडमेथे याचे उपचारादरम्यान दि.2 नोव्हेंबरलाच मृत्यू झाला तर रवींद्र हरिदास जोगी रा. चोपण याचाही खासगी दवाखान्यामध्ये उपचारादरम्यान रात्री 12.30 च्या दरम्यान मृत्यू झाला. संदीपच्या पश्चात पत्नी आणि तीन मुली तर रवींद्रच्या पाठीमागे आईवडील, पत्नी आणि दोन मुली असा आप्तपरिवार आहे. संदिप वर ओसरला येथे तर रवींद्र जोगी यांचेवर चोपण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.